मार्स रिकॉनिसन्स् ऑरबायटरच्या नंतर दोन वर्षांनी म्हणजे ८ ऑगस्ट २००७ रोजी ‘फिनिक्स लँडर’ ने पृथ्वी सोडली आणि सुमारे १० महिन्यांचा प्रवास करून २५ मे २००८ रोजी ते सुखरूप मंगळावर उतरले. फिनिक्स हा  ग्रीक कथेतील काहीसा गरूडासारखा दिसणारा पौराणिक पक्षी आहे, जो स्वतच्या राखेतून परत परत जन्म घेतो. आणि या लँडरमध्ये काही अशी उपकरणे आणि यानाचे घटक वापरलेले होते ज्यांचा विकास पूर्वीच्या मोहिमांसाठी करण्यात आला होता  पण काही कारणांमुळे त्यांचा वापर झाला नव्हता. आणि म्हणून या लँडरला ‘फिनिक्स’ नाव देण्यात आले.
अत्यंत विचारपूर्वक ही मोहीम रोव्हर ऐवजी ‘लँडर’ पद्धतीची ठरवण्यात आली होती. या मोहिमेचा खर्च कमी ठेवण्याकरता आधी तयार केलेल्या उपकरणांचा वापर करण्यात आला होता. ज्या भागात फिनिक्सला उतरवण्याचे ठरले होते तो भाग तुलनेने सपाट आणि एकसमान असल्यामुळे रोव्हर उतरवून मोठय़ा प्रमाणात नवीन माहिती मिळण्याची शक्यता कमी होती. त्याला मंगळावर फिरत ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या उपकरणांचे वजन घटल्यामुळे वैज्ञानिक प्रयोगांसाठी चांगल्या प्रतीची उपकरणे ठेवता आली. त्यामुळे मंगळावर जीवाणूसाठी योग्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी उपकरण ठेवण्यात आले. या लॅण्डरचे एकूण वजन ३५० किलो होतं. याचा एकूण आकार, त्याचे विद्युत ऊर्जेसाठी लागणारे  सोलार पॅनल धरून साडेपाच मीटर तर सर्व शास्त्रीय उपकरणे फक्त दीड मीटरच्या वर्तुळात होती. त्याची उंची फक्त २.२ मीटर होती, ही उंची हवामानाची नोंद घेण्याकरता लावलेल्या खांबाची उंची समाविष्ट करून आहे.
फिनिक्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा यांत्रिक (रोबोटिक) हात.  याचे काम  मंगळावरची माती खोदून ती वरच्या उपकरणांपर्यत पोचवण्याचे होते. ज्या दिवशी हे लँडर मंगळावर उतरवले तेव्हा हा यांत्रिक हात अडकून बसला होता. पण फक्त २४ तासातच याला सोडवण्यात यश आले. आणि अर्थातच दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा पॅनोरॅमिक कॅमेरा.
या मोहिमेची दोन मुख्य ध्येय होती – एक म्हणजे मंगळावरील पाण्याचा  भूगर्भीय इतिहास शोधणे, ज्यामुळे मंगळाच्या वातावरणात झालेल्या बदलांच्या रहस्याची माहिती आपल्याला मिळू शकेल आणि दुसरे म्हणजे जुन्या आणि सध्या मंगळावरील बर्फाच्छादित आणि त्याचा जमिनीच्या भागांच्या सीमेवर संभाव्य वस्तीसाठी मूल्यांकन करणे. या शिवाय फिनिक्सवर मंगळाच्या जैविक इतिहासाचा शोध घेऊ शकणारी यंत्रणाही होती.  
नासाने मंगळावर पाठवलेल्या ७ लँडर मोहिमांमधली ही सहावी मोहीम यशस्वी  ठरली होती. तसेच मंगळाच्या ध्रुवीय भागावर उतरून माहिती पाठवणारे ही पहिली मोहीम होती. या मोहिमेचा कालावधी ९० दिवसांचा आखण्यात आला होता, त्याप्रमाणे ‘फिनिक्स’ ने आपले ध्येय ऑगस्ट महिन्यापर्यंत साध्य केले होते. पण फिनिक्सची एकंदरीत ‘ठणठणीत प्रकृती’ बघता या मोहिमेचा कालावधी आणखी दोन महिन्यांनी वाढवण्यात आला.
जेव्हा यानाचा विद्युत पुरवठा काही कारणांमुळे कमी होतो किंवा अशी काही परिस्थिती निर्माण होते, की ज्यामुळे यानाला धोका होऊ शकतो तेव्हा यानाची यंत्रणा आपोआप सुरक्षित अवस्थेमध्ये जाण्याची सोय असते. या अवस्थेमध्ये यानाची फक्त अतिमहत्त्वाची यंत्रणा कार्यरत असते, ज्या पृथ्वीशी संपर्क साधणे हे पण असतं. तर २८ ऑक्टोबर २००८ रोजी फिनिक्स यान सुरक्षित अवस्थेमध्ये (सेफ मोड) गेले. कारण होतं विद्युत पुरवठय़ाचा अभाव, जे अनपेक्षित नव्हतं आणि ही मोहीम वाढीव कार्यकाळातच काम करत होती.  नंतर असंही लक्षात आलं की धुळीच्या वादळांनी सूर्यापासून विद्युत पुरवठा करणाऱ्या सोलार सेलवर धूळ बसल्यामुळे याची क्षमता कमी झाली आहे. शेवटी मोहीम बंद झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मोहिमेच्या कालावधीतील फिनिक्सने लावलेले शोध महत्त्वाचे होते. ‘व्हायकिंग’ आणि ‘पाथफाइंडर’ मोहिमांनी पाठवलेल्या छायाचित्रात मंगळाचा जो भूप्रदेश दिसला होता त्यापेक्षा जिथे फिनिक्स उतरले तो भूप्रदेश सपाट होता, पण तिथे २ ते ३ मीटरच्या भागात बहुआयामी भाग दिसत होते आणि दोन भागात  २० ते ५० सें.मी.चे खड्डे होते. जमिनीवर अशा प्रकारची रचना त्यातील बर्फाच्या प्रसरणाच्या आणि आकुंचन पावण्यामुळे होते, जे अर्थातच तापमानातील मोठ्या बदलांमुळे होतं. या शिवाय फिनिक्सला या भागावर मातीवर लाटांच्या खुणा दिसल्या नाहीत जशा इतर ठिकाणी दिसल्या होत्या. तसेच इथे पडलेल्या बर्फाचे हळूहळू संप्लवन क्रियेमुळे (घन अवस्थेतून वायू अवस्थेत जाण्याची क्रिया) उडून गेल्याच्या खुणापण स्पष्ट दिसत होत्या. त्याच बरोबर फिनिक्सने वावटळीचेही निरीक्षण केले होते. त्याने मंगळावर प्रक्षाभ मेघातून बर्फ पडल्याचे स्पष्ट केले होते. असे हे मेघ आपल्याला उदबत्तीच्या धुरासारखे आकाशात दिसतात. हा बर्फ पाण्याचाच असला पाहिजे, कारण इथे तापमान उणे ६५ अंश सेल्सियस असतं, तर कार्बन डाय ऑक्साईडचे बर्फ बनण्यास तापमान उणे १२० किंवा कमी लागतं.  मंगळावर वायूच्या वेगाची सरासरी नोंद दर तासाला ३६ कि.मी. करण्यात आली होती. हवेचा हा वेग  कमीत कमी ११ तर जास्तीत जास्त ५८ कि.मी. होता. पृथ्वीवरच्या हवेच्या वेगाच्या तुलनेत हा वेग जास्त वाटत असला तरी मंगळाच्या वातावरणाची घनता पृथ्वीच्या वातावरणाच्या तुलनेत फक्त १ टक्का आहे, त्यामुळे या हवेचा दाब यानावर खूप कमी होता. यानाने तापमानाचे आकडे पाठवले त्यात जास्तीत जास्त तापमान उणे १९.६ अंश तर कमीत कमी तापमान उणे ९७.७ अंश सेल्सियस नोंद झालं होतं.फिनिक्सने पाठवलेल्या आकडय़ातून शास्त्रज्ञानी अंदाज केला आहे, की मंगळाचा पृष्ठभाग नजीकच्या इतिहासात ओला आणि उष्ण असला पाहिजे. मंगळाच्या मातीत परक्लोरेट रसायनाची मात्रा  सापडली आहे. पृथ्वीवरील काही जीवाणू हे रसायन खाद्य म्हणून वापरतात. पण शास्त्रज्ञ या रसायनाचा वेगळाच उपयोग बघत आहेत आणि तो म्हणजे रॉकेटच्या इंधनासाठी. भविष्यात जेव्हा मानव इथे वस्ती करण्याचा प्रयोग करेल तेव्हा या रसायनाचा उपयोग प्राणवायू मिळवण्यासाठीही कदाचित होऊ शकेल. एकीकडे जरी आपल्याला मंगळावर सजीवांसाठी पोषक अशी स्थिती दिसत असली तरी हे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.