औषधी वनस्पती, मसाला पिके (लवंग, कांदा, लसूण, आले, कढीपत्ता) द्राक्ष (मनुका) टोमॅटो पावडर, मेथी व कोथिंबीर पावडर, मिरची पावडर, इत्यादी पदार्थावर सूर्याची किरणे पडल्यास त्याचा रंग व सुगंध हवेत उडून जाण्याचा संभव असतो. वरील सर्व पदार्थ सुकविण्यासाठी सौरऊर्जेचा उपयोग इनडायरेक्ट सौर ड्रायरद्वारे शक्य आहे. या प्रकारच्या सौर ड्रायरचे मुख्य भाग पुढीलप्रमाणे आहेत.
(१) सौर संकलक (२) सुकवणी ट्रे (३) हवाबंद काचेचे आवरण व स्टँड.
या प्रकारच्या संयंत्रामध्ये सौर संकलक हा अत्यंत महत्त्वाचा व मुख्य भाग आहे. यामध्ये पदार्थ सुकविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करून गरम हवा पदार्थापासून दूर इतरत्र तयार करण्यात येते. या प्रणालीमध्ये सौरकिरणे पदार्थावर न शोषल्यामुळे पदार्थाचा रंग व सुगंध टिकवून राहण्यास मदत होते. सौर संकलकामध्ये तांब्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या पातळ पत्र्यावर खास प्रकारच्या काळय़ा रंगाचे आच्छादन असते. त्याला ‘सिलेक्टिव्ह कोटिंग’ असे म्हणतात. सिलेक्टिव्ह कोटिंग किंवा काळा रंग उष्णताशोषक असून तो सूर्यप्रकाश शोषून त्याचे रूपांतर उष्णतेमध्ये करतो. संपूर्ण सिलेक्टिव्ह कोटिंग हे एका हवाबंद पेटीमध्ये बंदिस्त असून पेटीला खालच्या व बाजूच्या कडून ग्लासवूलचे उष्णतारोधकचा थर दिलेला असतो. संकलकाच्या वरील बाजूस ४ मिलिमीटर टफन्ड काचेचे आवरण दिलेले असून, त्या पारदर्शन काचेमधून सूर्यकिरणे आतमध्ये प्रवेश करतात. सूर्यप्रकाशाच्या गुणधर्मानुसार प्रकाश किरणे सिलेक्टिव्ह कोटिंगवर शोषले जाऊन कमकुवत होतात. ही कमकुवत सूर्यकिरणे परावर्तित होतात. परंतु, काचेच्या आवरणाबाहेर जाऊ शकत नाहीत. या प्रक्रियेमध्ये संकलकाचे सिलेक्टिव्ह कोटिंग व काचेचे आवरण याच्यामधील जागेतील हवा गरम होऊन उष्ण हवेचा झोत वरच्या बाजूने सरकतो. संकलकाला जोडूनच एकाच पेटीमध्ये पदार्थ सुकविण्यासाठी ४ साठवणी ट्रेची रचना करण्यात आलेली असते. या साठवणी ट्रेमध्ये पदार्थावर सूर्याची किरणे आवश्यक असल्यास पारदर्शक काचेमधून पडतात व आद्र्रता कमी होते.विविध पदार्थ ज्यांची गुणवत्ता, जसे सुगंध व रंग टिकवणे आवश्यक असते असे पदार्थ सुकविताना साठवणी ट्रेवरील सील पारदर्शक आवरण कापडाने किंवा कागदाने झाकण्यात येते. प्रत्यक्ष सूर्यकिरणे पदार्थावर पोहोचत नसल्यामुळे या ड्रायरच्या संकलकामध्ये तयार होणाऱ्या गरम हवेमुळे आद्र्रता कमी होण्यास मदत होते. म्संकलकाच्या पेटीची तसेच स्टँडची दर २-३ वर्षांनी गंजरोधक रंग लावून काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रकारच्या ड्रायरमध्ये औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती तसेच फळभाजी पावडर इत्यादींचा रंग व सुगंध टिकवण्यास मदत होते.  
सौर ड्रायरचे फायदे
१)    या प्रणालीमध्ये सौरकिरणे पदार्थावर सरळ न  शोषल्यामुळे त्या पदार्थाचा रंग व सुगंध टिकवून राहण्यास मदत होते. हा इनडायरेक्ट सौर ड्रायरचा मुख्य व महत्त्वाचा फायदा आहे.
२)    औषधी वनस्पती, मसाला पिके, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर पावडर, मिरची पावडर यांचा रंग व सुगंध हवेत उडून न जाता ड्रायरमध्ये सुकविता येतात.
३)    औषधी वनस्पती, मसाला पिके, मिरची पावडर इत्यादी सुकविल्यामुळे नुकसान कमी होते.
४)    या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अतिरिक्त ऊर्जा वापरली जात नाही.
५)    औषधी वनस्पती, मसाला पिके हवाबंद बंदिस्त संकलकामध्ये सुकविल्यामुळे पक्ष्यांपासून तसेच किडय़ांपासून संरक्षण होते.
६)    पदार्थाची आद्र्रता कमी केल्यामुळे साठवणीच्या काळात पदार्थाला बुरशी लागण्याचे प्रमाण नगण्य असते.
७)    विजेची बचत होऊन विजेचा खर्च वाचतो. कारण सौर ड्रायरमध्ये विजेचा वापरच नसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar dryer
First published on: 29-10-2013 at 09:30 IST