News Flash

सॅण्डविच पिढी

दोन पिढय़ांचा दुवा होण्याऐवजी अनेकदा मधल्या पिढीचं सॅण्डविच झालेलं असतं.

जिथं तीन पिढय़ा एकत्र राहात आहेत त्या घरात होणारे वाद आणि उद्भवणारे प्रश्न यामध्ये मधल्या पिढीची वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही पिढय़ांना समजून घेताना दमछाक होत असते. स्वत:च्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यातील आनंद आणि स्वास्थ्य अनेक जण हरवून बसले असतात. त्यामुळे दोन पिढय़ांचा दुवा होण्याऐवजी अनेकदा मधल्या पिढीचं सॅण्डविच झालेलं असतं. का होतं असं आणि काय आहे त्यावर उपाय ते सांगणाऱ्या लेखांचा हा पूर्वार्ध.

प्रसंग १ – घर सीमा-माधवचं
सीमा – आत्ता कुठे चाललात?
माधव – आईच्या खोलीतील टय़ूब लाइट लागत नाहीये. ती दुरुस्त करण्यासाठी इलेक्ट्रिशियनला घेऊन येतोय.
सीमा – त्यासाठी आता दोन वाजता तळपत्या उन्हात कशाला जायचं?
माधव – इलेक्ट्रिशियन दोन वाजता अलका टॉकिजपाशी येऊन थांबणार आहे.
सीमा – त्याला गाठण्याआधी साहिलला नाही का बघायला सांगायचं?
माधव – गेले आठ दिवस तुझ्या चिरंजीवाच्या कानीकपाळी ओरडतोय, पण त्यांना कुठला वेळ व्हायला. बाप बसला आहे ना रिकामा.
सीमा – पण आईबाबांच्या खोलीतला एक दिवा चालतोय ना. टय़ूब लागली नाही तर त्यांचं एवढं काय नडतंय.
माधव – तिला तो प्रकाश पुरेसा वाटत नाही. तिला प्राचीसाठी भरतकाम का काय ते पूर्ण करायचं आहे.
सीमा – मग बरोबर आहे. मला नाही कधी ड्रेस भरून दिला. पण आता नातसुनेनं सांगितलं म्हणजे ते काम लगोलग पूर्ण व्हायला हवं. त्यासाठी स्वत:च्या मुलाला भरउन्हात पायपीट करायला लागली तरी चालेल.
माधव – अगं, कुठला विषय कुठे नेतेस तू. आणि पायपीट कसली? चांगलं स्कूटरवरून चाललो आहे.
सीमा – गेल्या महिन्यात मला सरोजकडे सोडा म्हटलं तर दोन वाजता बाहेर पडणं तुमच्या अगदी जिवावर आलं होतं. या घरात माझी कुणाला किंमतच नाही. प्राचीनं काही म्हटलं की तिचा शब्द झेलायला सगळे तयार. आईबाबांचा तर माधव म्हणजे काय श्रावणबाळच. जा वेळेत पोचा.
माधव – जाणारच. तुझी परवानगी नाही मागितलेली.
प्रसंग २ – घर सुभाष-अंजलीचं
सुभाष – हे काय तू अजून तयार नाहीस. आपलं ठरलंय ना की आजपासून पहाटे उठून फिरायला जायचं. आई-पपा उठायच्या आत परत यायला हवं.
अंजली – पाहातोयस नं हॉलमध्ये किती पसारा आहे ते. काल सारंग-योगिताची मित्रमंडळी ‘आयपीएल’ पाहायला आली होती. हॉलमध्ये ग्लासेस, वेफर्सच्या डिशेस तशाच पडलेल्या. ओटय़ावर सचीसाठी दूध गरम केलेलं पातेलं नि गाळणं. त्याला मुंग्या लागलेल्या.
सुभाष – तू कशाला आवरत बसलीस? आवरतील त्यांचं ते.
अंजली – त्यांचं ते आवरणार त्याला दहा उजाडतील. मी असा पसारा टाकून झोपले असते तर आईंनी माझ्या सात पिढय़ांचा उद्धार केला असता. त्यांना सिंकमध्ये न धुतलेला चमचासुद्धा ठेवलेला चालायचा नाही.
सुभाष – तू कर की मग योगिताच्या सात नाही तर चांगल्या चौदा पिढय़ांचा उद्धार.
अंजली – तुला चेष्टा करायला काय जातंय. सासूबाईंच्या राज्यात आम्हाला कोणी विचारत नव्हतं आणि सुनेच्या राज्यात आमची बोलायची हिंमत नाही.
सुभाष – खरं तर पोरांना चांगलं झापायला पाहिजे.
अंजली – पोरं होती तेव्हा तरी झापत होतास का कधी? आता त्यांना पोरं झाल्यावर काय बोलणार तू? सगळ्या अपेक्षा माझ्या एकटीकडून.
सुभाष – अरे बापरे, पपांच्या खोलीतला दिवा लागलेला दिसतोय. इतक्या लवकर कसे उठले ते? म्हणजे त्यांचा चहा..
अंजली – समजलं. म्हणजे आपला बाहेर पडायचा बेत कॅन्सल. नाहीतरी हा पसारा पाहून माझा मूड गेलाच होता.
प्रसंग ३ – घर मीना-अशोकचं
अशोक – पुढच्या वर्षी मी रिटायर्ड झालो की दर वर्षी मस्त ट्रिप करायची ठरवलीय.
मीना – रिटायर्ड होण्याचं सुख अनुभविण्यासाठी तरी मी नोकरी करायला पाहिजे होती. उगाच तुझं ऐकलं नि नोकरी सोडली.
अशोक – मी तुला नोकरी सोडायला सांगितली नव्हती.
मीना – डायरेक्ट सांगितलं नाहीस, पण विचारलं तेव्हा म्हणालास, ‘घरचं सांभाळून कर.’
सुभाष – मग त्यात काय चूक होतं?
अंजली – चूक नव्हती, पण त्या वाक्यातील खोच मला कळली नव्हती. फक्त मलाच नाही तर माझ्या पिढीतील अनेक जणींना. घर आणि नोकरी झेपेल का याची काळजी करत बसले. शिवाय तुमचे पिताश्री ऐकवायचे, ‘तुझ्या चार दमडय़ांवर घर चाललेलं नाही.’ मग काय सोडली नोकरी.
अशोक – हे बघ निर्णय तुझा होता. उगाच त्यांना दोष देऊ नकोस.
मीना – तुला त्यांचंच पटणार. पण त्या वेळीच ठरवलं की सुनेला जर नोकरी करायची असेल तर आपण तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं. आता वाटतं, आपण किती बाळबोध पद्धतीनं विचार करत होतो. आता नातसून नोकरी करणार हे सगळ्यांनी गृहीत धरून टाकलं. उलट तिचं १०/१२ तास घराबाहेर राहणं याबद्दल घरात कौतुक व्हायला लागलं आहे आणि तिच्या नोकरीपायी मी मात्र परत घरात अडकले आहे.
सुभाष – याला मात्र तूच जबाबदार आहेस. कारण जबाबदाऱ्या ओढवून घेण्यात तू पटाईत आहेस. आदित्यला पाळणाघरात ठेवायची त्यांची तयारी होती, पण त्याला तू कडाडून विरोध केलास. तिथं होऊ शकणारी खाण्यापिण्याची आबाळ, इन्फेक्शन..
अंजली – मग खोटं आहे का त्यात काही?
सुभाष – खऱ्याखोटय़ाचा प्रश्न नाही, पण त्यापायी तू पूर्णपणे घरात अडकलीस. आपली मुलं लहान असताना कुठे ट्रिपला जायचं असो वा साधं सिनेमानाटकाला, त्यांच्या शाळा, परीक्षा, क्लासेस यांच्याशी जुळवून घेताना दमछाक व्हायची. वाटलं होतं मुलांचं शिक्षण, लग्न झाल्यावर जरा मोकळीक मिळेल. पण आता तर आपण पूर्वीपेक्षा जास्त अडकलो आहोत. याला तूच जबाबदार आहेस.

तीन घरांतील हे तीन प्रसंग म्हणजे जिथं तीन पिढय़ा एकत्र राहात आहेत त्या घरात होणारे वाद आणि उद्भवणारे प्रश्न यांची प्रातिनिधिक उदाहरणे. यातील मधली पिढी ही वरची आणि खालची पिढी यामधील दुवा असते. प्रत्यक्षात मात्र दोन्ही पिढय़ांना समजून घेताना त्यांची दमछाक होत असते. ‘घरात माझी कुणाला किंमतच नाही’ असं म्हणून माधवशी वाद घालणारी सीमा, एकमेकांसाठी अर्धा तास न काढता आल्यामुळे त्रस्त झालेले सुभाष-अंजली आणि आपल्याला नोकरीची संधी नाकारली गेली याची खंत बाळगणारी मीना. या तिन्ही घरातले प्रश्न आयुष्य व्यापून टाकावेत इतके गंभीर नक्कीच नाहीत. पण तरीही त्यांच्या पडछायेमुळे निवृत्तीनंतरचं पतीपत्नीचं स्वास्थ्य झाकोळून गेलं आहे. आज वय वर्ष ५५ च्या पुढे असलेल्या बहुतांश जोडप्यांनी त्यांच्या तरुणपणी आपल्या वडील पिढीला जसं रुचेल, पटेल तसं वागण्याचा प्रयत्न केला असतो. प्रसंगी आपल्या मतांना मुरड घातली असते, परंतु आजची तरुण पिढी आपले निर्णय स्वतंत्रपणे घेताना दिसते. आपले वय झाले तरी वडील पिढीसंबंधीची आपली कर्तव्यं संपत नाहीत हे मधली पिढी समजून असते त्याच वेळी लहान पिढी आपल्यापेक्षा अनुभवानं कमी असूनही, त्यांना आपल्या मतांशी कर्तव्य नाही ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत राहते. एवढंच नाही तर ज्या गोष्टी आपल्याला नाकारल्या गेल्या त्या आपल्या मुलगा-सुनेच्या बाबत किती सहजपणे स्वीकारल्या जात आहेत याबद्दल मनात वैषम्यही असतं. सतत कुणाशी तरी केलेली तुलना, मनात धरलेले आकस आणि सर्वाना खूश ठेवण्याची धडपड यापायी दोन पिढय़ांचा दुवा होण्याऐवजी मधल्या पिढीचं सॅण्डविच झालेलं असतं. त्याग आणि समर्पणाच्या सांकेतिक कल्पना आणि लोक काय म्हणतील याचा बागुलबुवा यापायी स्वत:च्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यातील आनंद आणि स्वास्थ्य अनेक जण हरवून बसले असतात. अशा घरात डोकावल्यावर लक्षात येतं की इथे तीन पिढय़ा एका छपराखाली राहात असतात, पण म्हणून एकत्र राहात आहेत असं म्हणणं धाडसाचं ठरावं. मधल्या पिढीला जर आपल्या आवडीनिवडी जपून मोठय़ा पिढीला मान देण्याची आणि धाकटय़ा पिढीचे लाड करण्याची कला साधता आली असेल तर सर्वाचं मिळून एक अवकाश निर्माण होऊ शकतं. आजूबाजूला पाहिलं की अशी कुटुंबं दिसतात. निश्चित दिसतात. अशा कुटुंबामध्ये ही जबाबदारी नेमकी कुणी उचलली असते? त्यासाठी काय कल्पना लढवल्या असतात? प्रत्यक्षात कशा उतरवल्या असतात? यावर पुढच्या लेखात संवाद साधू या.
उत्तरार्ध पुढच्या (२१ मे) अंकात
chitale.mrinalini@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 1:25 am

Web Title: article on joint family problems
टॅग : Chaturang
Next Stories
1 मी आहे आई आणि..
2 या कातर वेळी, पाहिजेस तू जवळी
3 आभाळ सांधण्याची किमया
Just Now!
X