News Flash

‘जीस्त करने का सलीक़ा भी जियाँ से आया’

‘श्रेयश्च प्रेयश्च..’ चिंतनशील लेखक या नात्याने पूर्वसुरींप्रमाणेच मलादेखील या संकल्पनेचा विचार करावा लागलेला आहे.

|| भारत सासणे

‘श्रेयश्च प्रेयश्च..’ चिंतनशील लेखक या नात्याने पूर्वसुरींप्रमाणेच मलादेखील या संकल्पनेचा विचार करावा लागलेला आहे. तुमचं लेखक असणं आणि तुमचं उच्चपदस्थ अधिकारी असणं याचा प्रेयस आणि श्रेयस या संकल्पनांशी काही नातं जोडलं गेलं आहे काय याचा विचार लेखक या नात्याने तुम्ही करता आणि काही उत्तरं शोधता. स्वत:ची भूमिका निश्चित करीत असताना आणि आपण ज्या वाटेवरचे प्रवासी आहोत त्या वाटेचं क्रमण तपासताना श्रेयस आणि प्रेयस या झगडय़ाबद्दल गांभीर्याने विचार करावा लागतो.

मुख्यत:, प्रेयस आणि श्रेयस यांचा झगडा मनाच्या अबोध पातळीवर सुरू झालेला असतो. कोणता पर्याय निवडायचा याबाबतचं विश्लेषण करण्याचं आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य निसर्गाने आपल्याला दिलेलं असलं तरी निवड योग्य झालेली आहे की नाही हे ठरवताना सजग असण्याची गरज असते. योग्य पर्यायाची निवड केली नाही तर माणसाच्या मनोजन्य दु:खाचा प्रारंभ होतो असं लेखक या नात्याने मी निरीक्षण नोंदवलेलं आहे. मनाच्या बोधावस्थेच्या पातळीवर येता येता हा झगडा ‘चतुर बुद्धीच्या स्वार्थी अंमला’खाली यायला लागतो. बुद्धी आपल्याला काय प्रिय आहे ते ठरवते आणि प्रेयस निवडण्यासाठी प्रभावी समर्थन सादर करते. अर्थातच, या प्रभावाच्या अमलाखाली आल्यानंतर आपण प्रेयसाची निवड करतो. आणि येथून पुढे विविध समस्यांची सुरुवात झालेली असते. प्रत्यक्षात, सुखद आणि हितकर यामधला फरक लक्षात घेण्याइतपत बुद्धिमत्ता सर्वाच्या वाटय़ाला जरी आली नसली तरी निसर्गप्रेरणेने प्राप्त झालेल्या विवेकाच्या आधीन राहून योग्य निर्णय आणि पर्यायाची योग्य निवड करणं श्रेयस असतं. उपनिषदातील ही संकल्पना व ज्ञान मृत्यूच्या देवतेने जीवनान्मुखी व्यक्तीला दिलेलं आहे ही गुंतागुंत लक्षात घ्यावी लागते. म्हणजे, श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही पर्याय नश्वर मनुष्याला निसर्गाने उपलब्ध करून दिलेले असतात. यांचे विश्लेषण करून बुद्धिमान व्यक्ती श्रेयसाची अर्थात हितकर पर्यायाची निवड करतो, पर्यायाने हितकराची निवड करणं माणसाच्या दृष्टीने श्रेयस आहे अशी उपनिषदाची संकल्पना.

सर्वसामान्य माणूस केंद्रिबदू मानून लेखन करीत असताना इतर लेखकांप्रमाणे मलादेखील मनुष्याच्या दु:खाची कारणं शोधावी लागलेली आहेत. हा शोध न संपणारा असल्यामुळे व अंतिम उत्तरं प्राप्त होणं देखील एका अर्थाने अशक्यच असल्यामुळे माणसाला समजून घेण्याचा माझा शोध अविरत सुरू आहे. तथापि या संदर्भात माझ्या लेखनातून मी काही संकल्पना मांडत राहिलो. त्यामुळे श्रेयस आणि प्रेयस या झगडय़ाच्या जवळ मला जाता आलं. वर्तुळात वर्तुळ रेखण्याची एक अमूर्त कल्पना आहे. त्यामुळे बाह्य़वर्तुळ आणि आंतरवर्तुळ असे जीवनाच्या कोडय़ाचे दोन भाग पडतात. तुम्ही जगत असताना मूल्य पाळता किंवा पाळत नाही. तरी देखील तुमचा मूल्यांशी संबंध येतोच. बाह्य़वर्तुळामध्ये काही अशाश्वत मूल्यांशी जोडले गेलेले घटक समाविष्ट असतात. उदाहरणार्थ, अहंकारजन्य अस्वस्थता, असुरक्षिततेची भावना, गरिबी आणि दारिद्रय़, त्यामुळे निर्माण झालेले विविध गंड, भीती, विश्वासघात, राजकारण, लैंगिक क्रौर्य, स्वार्थ, इत्यादी घटक अशाश्वत मूल्यांना घट्ट करीत राहतात. सर्वसामान्य माणूस आपल्या जगण्यातल्या छोटय़ा-मोठय़ा लढाया लढत राहतो, अस्तित्वाचा झगडा करीत राहतो आणि उपरोक्त अशाश्वत मूल्यांना कवटाळतो. प्रत्यक्षात, जीवनाच्या केंद्रस्थानी आंतरवर्तुळाची अमूर्त संकल्पना आहे. या आंतरवर्तुळात शाश्वत मूल्यांशी संबंधित असे घटक समाविष्ठ असतात. उदाहरणार्थ, अंतस्फूर्ती, प्रेरणा, सहानुभूती, दया, क्षमा, त्याग, सेवा, प्रेम, मानवता-अंतिमत: ईश्वर. श्रेयस आणि प्रेयस या झगडय़ामध्ये (आणि हा झगडा अविरत चाललेला असतो) योग्य पर्यायाची अर्थात श्रेयसाची किंवा हितकराची निवड करता आली नसेल आणि ‘स्वार्थी बुद्धी’ने भलावण आणि फसवणूक केली असेल तर सामान्यत:, माणूस बुद्धिजन्य आणि मनोजन्य दु:खाच्या जटिल अशा भ्रांतीजालामध्ये अडकून पडतो. अशा माणसाच्या सुखदु:खांच्या कारणांचा आणि त्याच्या एकूणच जगण्याच्या प्रेरणेचा शोध घेणं हे लेखकाचं आव्हान. निवडीचे स्वातंत्र्य तर आहे पण निवडीनंतरचे परिणाम बद्ध करतात हे ओळखण्याचे शहाणपण स्वीकारणं माणसाला मुळात श्रेयस्कर असतं.

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमतेस्तौ

सम्परीत्य विविनक्ति धीर:।

श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते

प्रेयो मन्दौ योगक्षेमाद्वृणीते॥

आता हे सगळं ज्ञान मर्त्य माणसाला ‘मृत्यूच्या देवते’ने प्रदान केलं आहे. विलक्षण असा हा विरोधाभास आपल्याला स्तब्ध करणारा आणि विचार करायला लावणारा असा आहे.

‘ही कुंडली जिल्हाधिकाऱ्याची आहे.. ’

माझं ‘अधिकारी असणं’ आणि ‘लेखक असणं’ या परस्पर विरोधी अशा बाबी आहेत की परस्पर पूरक अशा घटना आहेत याबद्दल कधी कधी चर्चा होते. ‘लेखक असण्या’चा क्रम निसर्गत: आधी आहे आणि ‘अधिकारी असण्या’चा क्रम त्यानंतर येतो. यापकी प्रेयस कोणते आणि श्रेयस कोणते असाही प्रश्न मला कधी कधी विचारण्यात येतो. अर्थात, तो इतक्या नेमकेपणाने विचारला जात नाही. माझं अधिकारी होणं हा एक व्यावहारिक अपघात असावा असाही समज काही मित्रांचा झालेला होता. लेखक असणं आणि अधिकारी असणं या दोन घटकांमध्ये काहीएक झगडा सुरू राहिला काय असाही प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे. हा मुळातून प्रेयस आणि श्रेयस याचाच झगडा आहे. सजग राहून त्यातून मला सतत योग्य पर्यायाची निवड करावी लागली.

माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांनी एका कानडी ज्योतिषाकडून कुंडली तयार करून घेतली होती. ती आजही उपलब्ध आहे. पिवळय़ा पडलेल्या जुन्या वहीच्या कागदावर कानडीमिश्रित अशुद्ध मराठीमध्ये लिहिलेल्या मजकुराची सातवी ओळ अशी-‘ही कुंडली जिल्हाधिकाऱ्याची आहे.’ आपण सगळे रूढ अर्थाने बुद्धिवादी असतोच. त्यामुळे काहीएक योगांना अवास्तव महत्त्व देण्याची आपली तयारी नसते. इतक्या वर्षांनंतर आणि ज्योतिषशास्त्राचंही वाचन केल्यानंतर त्या ज्योतिषाने इतक्या ठळकपणे आणि इतक्या आत्मविश्वासाने हे भाकीत कसं केलं असेल याचा उलगडा होत नाही. आज प्राप्त झालेल्या अल्प ज्ञानातून असं सांगता येतं की स्वत: कम्रेश, रवीबरोबर स्वगृहीच्या गुरूच्या सान्निध्यात युती करीत असल्यामुळे कर्मक्षेत्र प्रशासनाशी व राजदरबाराशी संबंधित असणार. काही जरी असलं तरी माझं अधिकारी असणं हे कदाचित विधीचं विधान असेल आणि म्हणूनच निसर्गाने काहीएक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ही संधी म्हणजे श्रेयसाची संधी. लेखनातला विवेक, संवेदनक्षमता, सहानुभूती आणि सहकंप आणि कदाचित करुणा, प्रशासनामध्ये आविष्कृत करण्याची संधी तुम्हाला श्रेयसाच्या, अर्थात व्यापक हिताच्या मार्गावर घेऊन जाते. या संधीचा वापर कसा करायचा हे सजगपणे ठरवायचं असतं. एखादा अर्ज एखादी कथा असते आणि एखादी फाइल कादंबरी असते असं मी काम करीत असताना नेहमी म्हणत आलेलो आहे. त्यामागे दडलेली वेदना, सामान्यांचे क्लेश वाचता आले तर माणूस शोधता येतो आणि कदाचित त्याच्या दु:खाचा परिहारदेखील करता येतो. हे काम मी करीत आलो त्यामुळे माझं अधिकारी असणं अहंकारजन्य व्याधीपासून मुक्त राहिलं. आणि म्हणून श्रेयस-प्रेयसचा कथित झगडासुद्धा परस्पर पूरक असा होत राहिला. अंतिमत:, अशा पर्यायांच्या निवडीनंतर निर्माण होणारं समाधान ही तुमची उपलब्धी असू शकते. ही उपलब्धी मला प्राप्त झालेली आहे.

लेखक असण्याचा मार्ग

लेखकाच्या लेखकपणाची सुरुवात त्याच्या बालपणीच झालेली असते. ‘यक्षनगरीच्या आठवणी’ हा बालपणींच्या आठवणींवर आधारित असा लेख मी लिहिला. हा लेख पहिल्यांदा ‘अनुष्टुभ’मध्ये प्रकाशित झाला. धुळे शहरात माझी बालपणीची काही र्वष गेलेली आहेत. अंत:प्रकाशात तत्कालीन शहर मला सुंदर भासलेलं आहे. या लेखात माझ्या संवेदना कशा तीव्र होत गेल्या आणि माझी ‘लेखक असण्याची बीजं’ कशी रुजत गेली याबद्दल मी लिहिलेलं आहे. ‘सटवाईचा लेख’ या माझ्या लेखसंग्रहामध्ये या लेखाचा समावेश करण्यात आला. अगदी लहान वयात आपल्याला दिव्य अशा सरस्वतीमातेने स्पर्श करून उठवलं अशी माझी त्यावेळेला धारणा झाली होती. ती माझी आठवण त्या लेखात मी जशी मांडली तशी येथे देतो आहे- ‘‘माझ्या वाचनाच्या वयात, त्याच वेळेला एकदा मला पहाटे स्वप्न पडलं की मला कुणीतरी ‘दिव्य देवता’ उठवते आहे आणि मी दचकून उठून बसलो. पहाट होती. पक्षी बोलू लागले होते. धूसर दिसू लागलं होतं. प्रसन्न वाटू लागलं. ही पहाटेची पहिली डोळस जाणीव. मी सांगण्याचा प्रयत्न केला की मला कुणीतरी उठवलं आहे. आठवत नाही, पण कुणी तरी म्हणालं- बहुधा आई, की, ‘सरस्वती देवीने उठवलं असेल की अरे हा झोपलाय.’ कुणीतरी चेष्टा केली की अरे, ‘मोलकरीण येते ना, तिनेच उठवलं असेल’. मी जे वाचत होतो, त्यामुळे माझा िपड बनायला लागला असणार. अद्भुततेचं मला आकर्षण निर्माण झालं होतं. मी हे मनातून मान्य केलं असणार की आपल्याला ‘सरस्वतीने’च उठवलं. ते ‘स्वयंसूचन’ मी स्वीकृत केलं असणार अचेतनात. आता, नंतरच्या इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर वाटतं की मोलकरणीने नक्कीच उठवलं नसणार. अचेतन मन जे स्वीकारतं तसं घडावं अशी मनाची इच्छा असते. त्या दिशेने मनाची वाटचाल सुरूही होते. कोणतीही घटना घडण्यापूर्वी ती अदृश्यात बीज रूपाने अस्तित्वात असतेच.’’

म्हणजे, माझं लेखक असणं हे लहानपणीच नक्की झालं होतं. हे पूर्वनियोजन किंवा कदाचित विधीचं विधान असणार. माझं लेखक होणं ही घटना श्रेयसाच्या जवळ जाणारीच. लेखकाला सत्याचा शोध घ्यावा लागतो. सत्य चराचरात दडलेलं असतं. मात्र, ते अवगुंठीत असतं. कलावंताचा, लेखकाचा स्पर्श झाल्यानंतर मायाच्छादित सत्य विघटीत होऊन वेगळं होऊ लागतं आणि गोचर होतं. या सत्याचा मागोवा आपण घेतो आहोत याचा अर्थ आपण श्रेयसाच्या मार्गावर आहोत याची सुदैवी जाणीव मला लवकरच झाली आणि मी स्तब्ध होऊन गेलो. आणि लेखन करताना तडजोडी करायच्या नाहीत, बाह्य़ दडपणाखाली दबून जायचं नाही हे सगळं मी न ठरवताच ठरत गेलं. माझं लेखन त्यामुळे आत्मनिष्ठ व्हायला लागलं. साहित्यांतर्गत आणि साहित्यबाह्य़ अशा टोळय़ांमध्ये मी सहसा सामील झालेलो नाही. याचं कारण असं की, लेखकाचा लेखनाचा प्रवास हा एकांडा असतो ही जाणीव. लेखनप्रवास समूहाने करता येत नाही आणि ज्याला त्याला आपापला क्रूस उचलावा लागतो याची जाणीव. आपला आत्मनिष्ठ लेखनाचा प्रवास चालू ठेवताना सामान्य माणसाचं जगणं आस्थाकेंद्रित करता येऊ शकतं याची जाणीवसुद्धा महत्त्वाची. मी माणसाचा आणि माणसाच्या सुख-दु:खाचा शोध घेऊ लागलो तेव्हा देवदुर्लभ अशा विश्वकरुणेचा स्पर्श माझ्या मनाला होऊ लागला. माझं लिखाण उपरोक्त अशा ‘शाश्वत मूल्यांशी’ जोडलं जाऊ लागलं आणि कदाचित, काहींच्या मते, श्रेष्ठत्वाच्या दिशेनेसुद्धा वाटचाल करू लागलं. म्हणजेच, प्रेयसाच्या ऐवजी मी कुठेतरी श्रेयसाची निवड केली असा माझ्यापुरता मी अर्थ लावला.

माणूस अशाश्वत मूल्यांशी स्वत:ला जोडून घेतो आणि प्रेयसची निवड करतो तेव्हा वरकरणी सुखद असलेले घटक नंतर मात्र त्याला अस्वस्थ आणि वेदनाग्रस्त अशा तुरुंगात ढकलतात याचंही आकलन लेखक या नात्याने होणं गरजेचं असतं. लेखक अथवा कलावंत सत्य शोधतो, विश्वकरुणेची उपासना करतो तेव्हा एका नवीन कोडय़ाला त्याला सामोरं जावं लागतं. प्रत्येक जीव आनंदाचा अधिकारी असला तरी तो आनंदापासून वंचित राहतो. कारण त्याला स्वत:च्या अस्तित्वाचं विस्मरण झालेलं असतं. हा आनंद कसा शोधता येईल हा देखील लेखकाच्या समोरचा प्रश्न. सुखाचा मूलमंत्र शोधणं, कदाचित दु:खाचा परिहार करण्याचं सूत्र देखील शोधणं हे लेखकाचं कार्य. आणि हे कार्य श्रेयस अशा संकल्पनेशी जोडलं गेलेलं आहे.

काही अस्वस्थ कालखंड भोवती प्रकट होत राहतात. लेखक, चिंतक, विचारवंत आणि सगळेच सामान्यजन मौनाच्या अवस्थेमध्ये कालक्रमण करतात. आपण बोललो तर आपण अडचणीत येऊ आणि क्षुद्र लाभापासून वंचित होऊ अशा काही भयापोटी न बोलणं हे प्रेयस. काही व्यक्ती श्रेयसाच्या मार्गाने जातात. गरजेनुसार बोलतात, त्याची किंमत मोजतात मात्र काळाच्या पटलावर स्वत:ला नोंदवून ठेवतात. अशा वेळेला श्रेयस आणि प्रेयस यांच्या निवडीबाबतचा झगडा तीव्रत्तम होऊन गेलेला असतो. याबाबत स्पष्ट अशी भूमिका लेखकानेच घ्यायची असते आणि त्यासाठी भयमुक्त मन आवश्यक असतं. लेखकाने भयमुक्त असणं हे श्रेयस. दु:खाचं कारण समजून घेणं, सुखाचा मूलमंत्र शोधणं, दु:खाचा परिहार करण्याचं सूत्र लेखनातून सांगण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातून आनंदप्राप्ती करून घेणं हे लेखकाचं श्रेयस. पण इतकंच नाही. प्रेयस आणि श्रेयस यांचा झगडा समाप्त होऊन दोन्ही घटक एकमेकांमध्ये विलय पावत जाणं ही लेखकाची अंतिम अशी उपलब्धी. मी स्वत: प्रेयस-श्रेयसच्या झगडय़ात अनेकदा जखमी झालो, स्वत:शी आणि भोवतालशी झगडलो, निर्मितीप्रक्रियेमधल्या टोकदार शिंगाच्या बलाबरोबर झुंज केली आणि घायाळ देखील झालो. तरी प्रेयस आणि श्रेयस एकच असल्याची भावना निर्माण झाली. दोघांचे एकत्व दृष्टिक्षेपात यायला लागलं याचं समाधान. म्हणजे, जे श्रेयस आहे तेच प्रेयस आहे याची दुर्मीळ जाणीव लेखकाची अंतिम उपलब्धी असते. मला हे तथ्य लवकर उमगलं.

माझी बकेटलिस्ट कोणती? मला कोणत्या गोष्टी करायच्या होत्या आणि कोणत्या करता आलेल्या नाहीत? माझं असमाधान कोणतं? माझ्या सवयीनुसार मनाच्या कागदावर तळाला, कोपऱ्यामध्ये ही यादी मी व्यवस्थित लिहून ठेवलेली आहे. त्यावर हळूहळू ‘टिकमार्क’ करण्याचं काम सुरू आहे. काही पराभव, काही पराजय, काही विश्वासघात, काही अपयश, काही अन्याय, काही उपेक्षा, काही अपमान इत्यादी असमाधानाचे मुद्दे अस्वस्थ करतातच. श्रेयसाच्या तुलनेने क्षुद्र हेतूंच्या अप्राप्तीतून असमाधान मिळवत राहण्यात कोणतीच बुद्धिमत्ता नसते. उदाहरणार्थ, काही मित्रांचं म्हणणं असं की, तुमची पस्तीसपेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यापेक्षा जास्त पारितोषिकं तुम्हाला मिळालेली आहेत. म्हणजेच सरासरी प्रत्येक पुस्तकाला पारितोषिक. मात्र, अमुक एक सन्मान किंवा अमुक एक पुरस्कार तुम्हाला मिळालेला नाही, तो का? माझं उत्तर असं की, अद्याप नाही. म्हणजे, केव्हा तरी मिळेल. त्यावर नाव कोरलं गेलं आहे. वेळ यायची आहे आणि ती येईल. आता, वेळेबद्दल बोलायचं तर काळ अनंत असणं, विपुल पृथ्वीची जाणीव असणं, सहधर्मीची भविष्यातली अटळ अशी भेट होणार असणं याबद्दल संस्कृत कवींनी दिलासा तर दिला आहेच. कवितादेवीची उपासना करणाऱ्या उर्दूकवीची कवितेबाबतची तक्रार अशी की, तू मला भेटतच नाहीएस. तेव्हा, ‘भेटेन शतवर्षांनी’ असं तिने कवितेतून उत्तर दिलं आहे. म्हणजेच, धीर धरण्याची तयारी लेखकाने बाळगली पाहिजे. ती बाळगणं श्रेयस. क्षुद्र मोह प्रेयस असला तरी हितकारक नसतो. प्रेयसचा मोह तात्कालिक, अल्प समाधान देणारा. हा मोह दु:खाला निमंत्रण देणारा असतो याची जाणीव चांगल्या लेखकाला असावी लागते. माझ्या मते, लेखनाच्या दीर्घ प्रवासात ही जाणीव माझ्यात निर्माण झाली हे श्रेयसभाग्य. नाहीतरी उर्दू कवीने म्हणून ठेवलं आहे की, ‘पगडी आणि पोषाख’ यातून प्राप्त होणाऱ्या सन्मानाची मी अपेक्षा का धरावी, कारण जीवन जगण्याची कला मला नुकसान सोसूनच शिकावी लागलेली आहे ना!

‘क्या करूँ खिल्अतो-दस्तार(१)

की ख़्वाहिश कि मुझे

जीस्त (२) करने का सलीक़ा भी

जियाँ(३) से आया’

(१-कपडे आणि पगडीचा सन्मान २-जीवन  ३-नुकसान)

प्रेयस आणि श्रेयस याचा झगडा लयाला जाणं, दोघात फरकच न राहणं, एकत्वाची जाणीव निर्माण होणं आणि यातूनच श्रेयसाचा मार्ग सापडणंही लेखकाची उपलब्धी. समाधानाची प्राप्तीही. या तुलनेने असमाधान जाणवत नाही. अलीकडे, लेखकाची ही उपलब्धी मला साध्य झाली आहे.

bjsasne@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 12:20 am

Web Title: amazing success story of bharat saasne
Next Stories
1 ‘कोणी निंदो वा वंदो’
2 वनस्पतींची कोडी उलगडली
3 समन्वयाचे जगणे
Just Now!
X