ऊर्मिला पवार pawar.urmila@yahoo.com

मी तिसरीत असताना वडील वारले, पण त्यांच्या इच्छेनुसार आईने आम्हा मुलींनाही आयदानं विणून, विकून, आमच्या पायावर उभं राहण्याइतकं शिकू दिलं. अर्थात शिक्षणात आरक्षण होतं म्हणून शिकलो हेही तितकंच खरं. आईने मुलगी म्हणून खास ‘वळण’ लावलं नाही. पण मुंबईहून गावी येणारे कार्यकत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदेश न चुकता सांगायचे तो म्हणजे, ‘‘अजूनपर्यंत मागे होतो आता मागे राहायचं नाही’’ पुढे बाबासाहेबांचं चरित्र वाचलं, त्यांचे विचार ऐकले. आणि मग कुठे होते, हे मागे वळून पाहत पाहतच इथवर आले..

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

मी कथा लिहायला लागले आणि कुणीच नसलेल्या मला थोडीशी ओळख मिळाली. मी लिहिलेल्या ‘कवच’ नावाच्या आंबेवालीच्या कथेमुळे तर मी एकदम प्रकाशझोतात आले. पत्रकारांनी मुलाखती घेणं, वर्तमानपत्रात छापणं वगैरे प्रथमच घडलं. त्या कथेत मी बाजारात आंबे विकणाऱ्या बाईला आंब्यावरून काही आंबटशौकीन लोकांकडून कसे द्वयर्थी अपमानकारक अश्लील शब्द ऐकावे लागतात त्यावर प्रकाश टाकला आहे. मी एक बाई आहे म्हणून काही शब्द टाळून, गाळून वापरले पाहिजेत, असं मला कधीच वाटलं नाही. म्हणूनच त्या विशिष्ठ लोकांनी उच्चारलेल्या द्वयर्थी पण अश्लील शब्दांचाही त्या कथेत मी बेधडक उल्लेख केला आहे. त्यामुळे काही लोकांकडून ती कथाच अश्लील ठरवली गेली. अर्थात या अनुभवाचा मी अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. असो.

‘ग्रंथालीने’ प्रकाशित केलेल्या ‘आयदान’ या माझ्या आत्मकथनातही मी ज्या गावखेडय़ात वाढले तिथल्या स्त्रियांची वेदना सांगताना त्यांचं शिवराळ बोलणं मी जसंच्या तसं मांडलं. तसंच माझ्या स्त्री म्हणूनच्या जाणिवाही मी उघडपणाने लिहिल्या आहेत. उदा. वर्गातले हुशार मुलगे मित्र म्हणून आवडणं, माझ्या जातीमुळे की जाडेपणामुळे त्यांनी मला भाव न देणं, पुरुषांशी मोकळेपणाने बोलण्याचा लोकांनी गैरसमज करून घेणं, पहिली पाळी येणं, पहिली रात्र वगैरे. त्यामुळे बाईची लैंगिक संवेदना, शोषण थेट मांडणारी मी एक बोल्ड लेखिका असंही काहींना वाटलं. माझं लेखनातलं हे धाडस लक्षात घेऊन की काय प्रा. डॉ. प्रज्ञा पवार या आघाडीच्या कवयित्री आणि लेखिकेने आपल्या ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ या आपल्या तशाच बोल्ड कथासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेत थोर लेखिका कमल देसाई यांच्यासोबत माझंही नाव लिहिलं आहे. माझ्या या स्पष्ट आणि थेट स्वभावाच्या जडणघडणीचा मी आज माझ्या वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी विचार करते तेव्हा साधारण शंभरएक वर्षांपूर्वी जन्मलेल्या माझ्या आई वडिलांचे त्या काळातही थोडेसे पुढारलेले विचार कारणीभूत असावेत, असं मला वाटतं. वडील खेडय़ात राहूनही मिशनरी शाळेत सहावी, सातवी शिकले. मास्तर झाले. पुढे त्यांनी आम्हा तीन बहिणींनाही माझ्या तीन भावांसोबत शहरात आणून शिकवलं. मुलींनी सायकल चालवायला शिकावं, असंही त्यांना वाटत होतं. मी तिसरीत असताना वडील वारले पण त्यांच्या इच्छेनुसार आईने आम्हा मुलींनाही आयदानं विणून, विकून, कोंडय़ाचा मांडा करून आमच्या पायावर उभं राहण्याइतकं शिकू दिलं. अर्थात शिक्षणात आरक्षण होतं म्हणून शिकलो हेही तितकंच खरं. आईने मुलगी म्हणून खास वळण लावलं नाही. पण मुंबईहून गावी येणारे कार्यकत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदेश न चुकता सांगायचे तो म्हणजे, ‘‘अजूनपर्यंत मागे होतो, आता मागे राहायचं नाही’’ पुढे बाबासाहेबांचं चरित्र वाचलं त्यांचे विचार ऐकले. आणि मग कुठे होते, हे मागे वळून पाहात पाहातच इथवर आले.

आई आणि गावातल्या, नात्यातल्या ज्या स्त्रियांना मी बघत होते, त्यांच्या अपार कष्टातून त्यांचं सुखदु:ख ऐकण्यातून कोणत्याही परिस्थितीत न डगमगता टक्कर घेण्याच्या स्पष्ट बोलण्यावागण्याच्या कितीतरी आठवणी माझ्यासोबत होत्या. पुढे त्यात दलित व स्त्री चळवळीमुळे समानता, मानवता, स्त्री हक्क, स्त्रीस्वातंत्र्य, स्वतंत्र व्यक्ती वगैरे विचारांची थोडीशी रुजवण झाली. दलित स्त्रिया अदृश्यच आहेत त्यांची दखल घेतली गेलेली नाही हेही जाणवलं. मीनाक्षी मूनसोबत आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या मुलाखती घेऊन ‘आम्हीही इतिहास घडवला’ हे संशोधनात्मक पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने ज्या स्त्रियांना मी प्रत्यक्ष भेटले त्यात शांताबाई दाणी, कौसल्या बसंत्री, मुक्ता सर्वगोड इत्यादी स्त्रियांबरोबरच चंद्रिका रामटेके, शांताबाई सरोदे, सीताबाई पाटील अशा तिघी-चौघी पेहेलवान स्त्रियाही होत्या. घरच्या आखाडय़ात जोर बठका काढून त्यांनी आपले शरीर घडवले होते. समाज आणि कुटुंबातील ताणतणाव सहन करूनही त्या चळवळीत उतरल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा संमेलनावर आणि दलित वस्तीवर होणारे तथाकथित उच्चवर्णीयांचे हल्ले परतवून लावण्याचं कामही त्या करत होत्या. त्या स्त्रियांच्या निर्भय, बेधडक वृत्तीनेही मी प्रभावित झाले.

१९७५ पासून स्त्रीमुक्तीचा विचार घेऊन ज्या संघटना उभ्या राहिल्या तेव्हा आकलनात भर पडावी, जमेल ते करावं म्हणून त्यातील काही संघटनांशी मी स्वत:ला जोडून घेतलं. स्त्री प्रश्नावर घेतलेल्या सभा आणि मोच्र्यामध्ये जमेल तसा भाग घेतला. मथुरा, भंवरीदेवीवर झालेल्या बलात्काराच्या आणि रुपकुंवर सती गेल्याची घटना आणि तशा अनेक अन्याय अत्याचारांच्या घटनांप्रसंगी मुंबईत निघालेल्या निषेध मोर्चात मी सामील झाले. याच वेळी कवयित्री हिरा बनसोडे यांची ओळख झाली आणि दलित स्त्रियांना लिहिण्या-बोलण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने ‘संवादिनी’ या संघटनेची आम्ही स्थापना केली. आजच्या ‘मी टू’ चळवळीच्या मुळाशी असलेल्या ‘तू बोलेगी, मुँह खोलेगी, तबही जमाना बदलेगा’ या स्त्री चळवळीतील घोषवाक्याचा पाठपुरावा आम्हीही ‘संवादिनी’तून करत होतो.

दलितांवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधासाठीही मी उभी होते. भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील सुरेखा, प्रियंका, प्रियंकाचे भाऊ राकेश, रमेश यांच्यावर अनन्वित अत्याचार करून सर्वाना ठार मारण्यात आलं. ती घटना मला स्वस्थ बसू देणारी नव्हती. थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन जाब विचारायला मंत्रालयावर लीना गेडाम, प्रा. अस्मिता अभ्यंकर, ममता अडांगळे, सविता सोनावणे, संध्या वाघमारे इत्यादींनी काढलेल्या धडक मोच्र्यात प्रा. डॉ. कुंदा प्र. नि., उषा अंभोरे अशा काही लेखिकांसोबत मीही सामील झाले. आम्हाला अटक झाली. एक दिवसाची पोलीस कस्टडी होऊन जामिनावर सोडण्यात आलं. पुढे अनेक वर्ष ती केस भिजत पडली होती. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी पण फाशी होऊ नये अशी आमची मागणी होती. गौतम बुद्धांनी धम्मपदातील सतराव्या वग्गातील तिसऱ्या गाथेत म्हटलं आहे की, ‘वाईट कृत्य हे वाईट कृत्य केल्याने थांबत नाही तर त्याविरोधी आचरण केल्याने ते थांबते. क्रोधाला क्रोधातून नाही समुपदेशनाने शांत करता येते,’ महात्मा गांधीजीसुद्धा एका ठिकाणी म्हणाले आहेत, ‘डोळ्याला डोळा काढा ही शिक्षा असेल तर सर्व जग लवकरच आंधळे होईल.’ खैरलांजी केसमधील आठ आरोपींना शिक्षा झाली आणि तिघांची पुराव्याअभावी सुटका झाली.

त्यानंतरही सोनई, खर्डा, जवखेडा, कवलापडा वगैरे ठिकाणी दलितांच्या लागोपाठ हत्या झाल्या. त्या वेळीही अन्याय, अत्याचाराविरोधात झालेल्या आंबेडकर भवनातील सभा आणि आझाद मदानावरील आंदोलनात मी भाग घेतला. माझ्याप्रमाणेच छाया खोब्रागडे, प्रा. निशा शेंडे, प्रा. आशालता कांबळे, छाया कोरेगावकर, हिरा पवार, लता इंगळे, शारदा नवले, प्रा. संध्या रंगारी, कविता मोरवणकर, प्रा. प्रतिभा अहिरे, अशा आंबेडकरी विचार आणि स्त्री प्रश्नातून समाजाचं, स्वत्वाचं भान आलेल्या काही कवयित्री, लेखिका, कार्यकर्त्यां याही घटनाविरोधात बोलत होत्या. लिहीत होत्या आणि काहीजणी त्या त्या ठिकाणी     अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरही उतरल्या होत्या. पुढे ती प्रकरणं न्यायालयात गेली आणि तारखांच्या सत्रात अडकली. मला वाटतं लिहिणाऱ्यांनी, कलावंतांनी गरज असेल तिथे असं रस्त्यावरही उतरावं. पीडिताला आपलं सोबत असणं धीर आणि बळ देणारं असतं. खरं तर असंही वाटतं की कुणालाही रस्त्यावर उतरायला लागावं असं काही घडूच नये. पण..

.. तर माझ्या थेट लिहिण्यामुळे असेल कदाचित ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेलं ‘आयदान’ हे माझं आत्मकथन लोकांना आवडलं. बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. डॉ. माया पंडित यांनी ‘द विव्ह ऑफ माय लाइफ’ या नावाने ‘आयदान’चं इंग्रजीत भाषांतर केलं. ‘पॉप्युलर प्रकाशन’ आणि ‘स्त्री समया’ने ते छापलं. ‘शल्य’, ‘गोष्ट शैशवाची’ वगैरे माझ्या काही निवडक कथांना अमेरिकेच्या

प्रा. डॉ. वीणा देव यांनी इंग्रजी कोट घातला आणि फणसवळे या रत्नागिरीतल्या खेडय़ातलं माझं विमान परदेशातही फिरू लागलं. मॉरिशस, नेपाळ, स्वीडन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्र्झलड वगैरे देशात माझ्या लेखनावर बोलायला, चच्रेला वगैरे जाण्याची मला संधी मिळाली तेव्हा माझ्यातल्या लेखिकेची पाठ थोपटावी असं वाटलं. विशेषत: मी मुंबई ते स्वीडनमधील गोथंबर्ग एअरपोर्ट प्रवास एकटीने केला तेव्हा..

काही आंबेडकरी साहित्यिकांचं साहित्य २००६ मध्ये ‘स्वीडिश’ भाषेत भाषांतरित झालं होतं त्यात उत्तर दक्षिण भारतातल्या लेखकांबरोबर माझी ‘गोष्ट शैशवाची’ ही कथाही होती म्हणून तिथे भरलेल्या जागतिक ग्रंथ जत्रेत उपस्थित राहण्याचं निमंत्रण मलाही मिळालं. दिल्लीच्या डॉ. विमल थोरात, चित्रकार स. वि. सावरकर आणि अशाच एक-दोन लेखकांसोबत मी दिल्लीहून जाणार होते पण मला व्हिसा उशिरा मिळाल्यानं मुंबईहून एकटीलाच जावं लागलं. अर्थात मला तिकडे उतरून घ्यायला कुणीतरी येणार होतं त्यामुळे अनेकांच्या सूचना, सल्ले गाठीशी बांधून मी मुंबईहून निर्धास्तपणे निघाले. इंग्रजीशी वाकडं असल्याने इंग्रजीतलं नीट वाचण्याची सवय नव्हती. आमचा सगळा तोंडी कारभार. ती सवय त्या प्रवासात नडली. विमान जर्मनीला मुनिच विमानतळावर उतरताना अनाउन्समेंट झाली की गोथंबर्गला (स्वीडनला) जाणाऱ्यांनी इथे उतरून एका तासात दुसऱ्या विमानात बसावं. काही माणसं उतरली त्यांच्यासोबत मीही उतरले आणि तिथे दुसरं विमान कुठे उभं आहे ते मी पाहू लागले. दूरवर काही विमानं दिसली. त्यातलं नेमकं शोधणं कठीण वाटलं. बाजूच्या भव्य इमारतीत सोबतीही कुठे तरी गुडूप झाले. कुणाला तरी विचारावं म्हणून मीही आत शिरले तर महाभारतातला चक्रव्यूह म्हणतात तो हाच असावासं वाटलं. एका तासाच्या मर्यादेचा गोळा पोटात घेऊन याला त्याला हातातले पेपर्स दाखवून डोक्यावरचे इंग्रजी, जर्मनी बोर्ड बघता बघता इथे तिथे एक्सलेटरवरूनही धावता धावता माझी दमछाक झाली. अखेर धापा टाकत मी एका टेबलाआड बसलेल्या दोन हिटलर टाइप ऑफिसरांच्या समोर गेले. त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं. त्यांनी माझे पेपर्स शांतपणे उलटसुलट करून पाठीमागे कुठेतरी चेकिंगला पाठवले. विमान तासाभरात सुटण्याचं टेन्शन होतं. माझ्या पोटातला तासाचा गोळा क्षणाक्षणाला वाढू लागला आणि मी ओरडले, ‘‘अरे हे काय चाललंय काय, माझं निमंत्रण पत्र तुमच्या हातात आहे. पासपोर्ट, व्हिसा, तिकीट सगळं आहे, विमान सुटायला अगदी थोडा वेळ उरलाय, ते विमान कुठे ते दाखवायचं सोडून तुम्ही तपासताय काय डोंबल आपलं?’’ आणि हे सगळं मी माझ्या इंग्रजीतून बोलले. त्याच्या परिणामातून नाही पण माझा अवतार बघून एकाने आत जाऊन माझे पेपर्स आणले आणि नवा बोìडग पास माझ्या हातात देऊन तो घाईघाईनं म्हणाला, ‘‘गेट नंबर एट, गो गो’’ मी ओरडले, ‘‘व्हाट गो गो? गेट अप अ‍ॅण्ड शो मी.’’ तसा त्याचा चेहरा मवाळ झाल्यासारखा वाटला आणि त्याने थोडंसं झुकून दाखवलेल्या दिशेनं माझ्या नावाची बोंब करणारं गेट नंबर आठ, माझ्यासाठी थांबलेली एअर बस, रनवेवरचं विमान आणि पुढे स्वीडन मी एकदाचं गाठलं. त्या एका प्रवासानं माझ्यातला आत्मविश्वास इतका कणखर केला की त्यानंतर मी आस्ट्रेलियाला, इंग्लंड, लंडन वगैरे ठिकाणी एकटीच गेले. वावरले. खरं तर माझे वडील मिशनरी स्कूलमध्ये शिकत असताना त्यांची शिक्षिका त्यांना इंग्लंडला नेणार होती पण आजोबांनी मोडता घातला कारण आपला मुलगा साता समुद्रापलीकडे गेला तर कदाचित आपल्याला दिसणार नाही असं आजोबांना वाटलं आणि वडिलांचं आणि त्यांच्या पोटी कदाचित जन्माला येणाऱ्या आमचं स्वप्न भंगलं होतं ते पूर्ण झालंसं वाटलं.

मम्मटाने काव्याचे अर्थात साहित्याचे फायदे सािंगतल्याप्रमाणे  लेखनाने यश, कीर्ती, व्यावहारिक दृष्टी, चांगल्या-वाईटाची जाण, संरक्षण आणि प्रेमळ पत्नीच्या उपदेशाप्रमाणे साहित्याचा लाभ होतो, असं म्हटल्याचं एम.ए.ला शिकत असताना वाचलं होतं. त्यात मला आपल्या भोवतीच्या सीमा आणि दु:ख यातूनही बाहेर पडण्याचा मार्ग याही फायद्यांची भर घालावीशी वाटते. जेव्हा जेव्हा दु:खद घटनांनी मला घेरलं तेव्हा तेव्हा काहीतरी लिहिण्यात, शब्दात मी मनाला गुरफटवून टाकते. मी जे लिहिलं, लिहिते त्याची गुणवत्ता काय हे मला माहीत नाही पण माणसाला त्याच्या दु:खाची धग कमी करणारा शब्दांचा, कुठल्यातरी कलेचा आधार असायला हवा असं मला वाटतं. माझ्या दोन्ही मुली

प्रा. डॉ. मालविका ही गाण्यात आणि मानिनी कथक नृत्यात विशारद आहेत. हे मला त्यांच्या महाविद्यालयीन पदव्या, नोकऱ्या आणि उपजीविकेच्या साधनाइतकंच गरजेचं आणि मोलाचं वाटतं. तितकंच मोलाचं म्हणून असंही वाटतं की, प्रत्येकाने स्वत:ला कुठल्या ना कुठल्या चळवळीशी जोडून घ्यावं. त्यातून आजूबाजूचा समाज कळतो आणि दुसऱ्याने आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसं वागण्याचं भान येतं. मिळवलं, हरवल्याची जाण येते मात्र ही चळवळ भारतीय संविधानात्मक मूल्यांवर उभी असावी इतकंच!

chaturang@expressindia.com