News Flash

मंजुळा

मंजुळा आणि शरद यांचा प्रेमविवाह झालेला होता आणि सुदैवाने त्यांना अंधेरीच्या एका चाळीत जागा मिळाली होती

मंजुळेचे शरदवर प्रेम आहे. त्याची ओढ तिला वाटते. पण शरीरसौख्यासाठी वृत्ती अनुकूल हव्या असतात. स्त्रीलादेखील तिचे मन आणि शरीर उत्सुक असायला हवे असते. अरविंद गोखले यांची ही ‘मंजुळा’ प्रेमाच्या पुरुषाबरोबरदेखील समागमासाठी स्त्रीच्या वृत्ती बहरून यायला हव्यात हे स्पष्टपणे सांगणारी, आधुनिक काळातली पहिली स्त्री म्हणावी लागेल.

मंजुळा ही अरिवद गोखले यांच्या कथेतील व्यक्तिरेखा आहे. ‘मंजुळा’ ही कथा (सत्यकथा, मे १९५०) प्रकाशित झाली त्या काळात मुंबई हे शहर पांढरपेशा मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय, कामगार, हरकामे, पोट भरायला मुंबईत येणारे हजारो लोक यांनी गजबजू लागले होते. मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष नोकरी करू लागले होते; चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये राहात होते. सकाळची कामे उरकून कारकुनी करायला ऑफिसात जावे आणि संध्याकाळी दमून भागून लोकलमध्ये धक्के खात घरी परतावे हा मुंबईकरांचा दिनक्रम सुरू झाला होता. या मध्यमवर्गीय-निम्नमध्यमवर्गीय जीवनक्रमात अडकलेल्या माणसांचे चित्रण गंगाधर गाडगीळ आणि अरिवद गोखले या दोन नवकथाकारांनी आपल्या अनेक कथांतून केले आहे. त्यापैकी ‘मंजुळा’ ही विशेष गाजलेली कथा.

मंजुळा आणि शरद यांचा प्रेमविवाह झालेला होता आणि सुदैवाने त्यांना अंधेरीच्या एका चाळीत जागा मिळाली होती. पण ऑफिसात जाण्यासाठी आणि परतण्यासाठी दोघांनाही लोकलचा प्रवास अटळ होता. दररोज दोनदा नरकयातना अनुभवाव्या लागत. डब्यात जेमतेम जागा मिळे, अंग कितीही चोरले तरी कुणाचा तरी धक्का लागे. कधी खांदा चोळवटून निघे, मांडीला अनोळखी बोटं चिकटत. पावलांवर बुटांचे ठसे उमटत. इकडेतिकडे नजर फिरवायची सोय नसे. स्वस्थ उभं राहिलं तरी एकमेकांचे श्वास नि वास नाकातोंडात शिरून शिसारी येई. बुबुळांसमोर, नाकपुडय़ांसमोर, रंध्रारंध्रापाशी मुर्दाड मनांची आणि किळसवाण्या शरीरांची अगणित माणसं..

त्या संध्याकाळी रोजच्यासारखी मंजुळा डब्यातून बाहेर पडली. बरेचसे धक्के, खांदा दाबणं, दंडाला, मांडीला चिमटे, आंबाडय़ाला हिसका.. ती झपझप घराकडे चालू लागली. ओठ कोरडे पडले होते. काखा नि पोट घामाने चिकट झाले होते. टाइपरायटर बडवून बोटे दुखत होती. चालायच्या आधीच पाय दुखू लागले.. मंजुळेने वाटेत भाजी घेतली. घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता. पाणी भरायचं होतं. आंघोळ करावीशी वाटत होती नि भूकही लागली होती. मंजुळा चाळीपाशी पोचली तेव्हा दिवे पेटले होते. बिऱ्हाडांबाहेर पुरुष उघडय़ा अंगांनी बसले होते. त्यांच्याकडे बघून मंजुळेला ओकारी आली. डोकं फिरवणारे फोनो, लाऊडस्पीकर्स, रेडियो.. एकच गोंगाट सुरू होता.

ती घरी पोचली तेव्हा शरद आलेला होता. टेबलावर भाजी नि पर्स फेकून ती आतल्या खोलीत गेली. बादलीत पाणी नव्हतं. शरदने सगळी बादली संपवली नि पुन्हा भरूनही ठेवली नव्हती. ती बादली घेऊन बाहेर निघाली. तेव्हा पाणी आणून द्यायला शरद पुढे झाला नाही. पण तोंड धुतल्यावर तिला बरं वाटलं. तिकडे शरद वैतागला होता. त्याला बाहेर फिरायला जायचं होतं. ती लवकर तयार झाली नव्हती. आणि तिने चहादेखील विचारला नव्हता. संध्याकाळ अशी चिडचिडीत विरसून गेली. नंतर स्वयंपाक.. शरदला चहा देऊन तिने त्याला खुलवण्याचा प्रयत्न केला. पण तो तसाच शून्यपणे बिऱ्हाडाबाहेर गेला. तो साडेनऊ वाजले तरी आला नाही. मंजुळेने खिन्नपणे आपल्या संसारावर नजर टाकली. एकेक वस्तू हौसेने जमवलेली, पण आज कशातच मन रमेनासे झालेले.

जेवणे उरकून, खरकटे आवरून मंजुळा बाहेरच्या खोलीत आली. तेव्हा शरदने गाद्या पसरवून ठेवल्या होत्या नि तो सिगरेट फुंकत तिची वाट पाहात होता. मंजुळेच्या वृत्ती थिजून गेल्या. तिला भीती वाटली. चीडही आली. ती गादीवर पडली. दिव्याचा त्रास नको म्हणून तिने डोळ्यांवर आडवा हात ठेवला. सर्वत्र शांतता पसरली. जरा वेळाने शरद म्हणाला, ‘‘ये..’’ कसल्याशा वेदनेच्या सहस्र सुया मंजुळेच्या सर्वागाला टोचल्या. ती भीत होती ते भांडण भुतासारखं अंधारात उभं राहू लागलं.

शरीरसंबंधाला मंजुळा नकार देते त्यामुळे शरद भडकला होता. बोलण्याच्या ओघात तो म्हणतो, ‘‘मला तरी कुठे आवडते ही ओढाताण! पण काय करायचं! दिवसभराच्या दगदगीनं दमल्यावर शीण उतरायचा एकच उपाय आहे, तोही तू..’’ शरदचे ते शब्द ऐकताच मंजुळेचं मन चिरून निघालं. तिला घृणा आली. चीड आली. ती प्रतिसाद देत नाही हे पाहून शरद म्हणाला, ‘‘प्रेताशी शृंगार करता येत नाही मला.. तू आपणहून मला दूर केलं आहेस.. मला माझं सुख शोधलं पाहिजे. तुझी मिजास नको. मी जातो..’’ मंजुळा संतापून ओरडली, ‘‘जा. वाटेल तिथं जा. पर्समधले पैसे घे हवे तर! जा..’’ मंजुळेचा संताप अनिवार होत होता. डोकं फुटणार, अंग पेट घेणार असं तिला वाटू लागलं. संतापाच्या आणि दु:खाच्या ओढाताणीत तिची फरपट होऊ लागली. पण तिने स्वत:ला सावरले. तिने शरदची क्षमा मागितली, आणि तिने आपले मन मोकळे केले..

‘‘मन प्रसन्न असलं, शरीर टवटवीत असलं, स्वच्छ सुंदर वातावरण असलं तरच माझ्या वृत्ती मोहरून येतात. इथे आजूबाजूला चाळीतली वर्दळ असते, रडणीओरडणी, शिव्यागाळी ऐकून कसंतरीच वाटत असतं. अंग आंबून गेलेलं असतं. डोकं दुखत असतं. लोकलमधले स्पर्श, लोभट डोळे आठवत असतात अन् मग मन मरगळून जातं नि शरीर उत्सुक होत नाही. या व्यवहाराला जिकडेतिकडे किळसवाणी कळा आली आहे. पण मला पशू व्हायचं नाही. माझ्या भावनांना, वासनांना मी जपते. माझी विटंबना करू नकोस, शरद. माझी विटंबना करू नको.’’

आज, आजच नव्हे. हजारो वर्षांपासून हजारो बायका ही विटंबना सहन करीत आहेत. स्त्री-पुरुष संबंध ही आज तर ओरबाडून घेण्याची गोष्ट झाली आहे. दिवसभराचा शीण घालवण्यासाठीच नव्हे, तर विवाह संस्कारांनी उपलब्ध करून दिलेली हक्काची, उत्सर्जनाचा आनंद देणारी सोय हे या संबंधांचे कुटुंबव्यवस्थेतले एक रूप आहे. इच्छा नसताना, नकोसे वाटत असले तरी विवाहित स्त्रियांना पुरुषांचे हे आक्रमण सहन करावे लागते. विवाहांतर्गत बलात्काराची चर्चा आता थेटपणे, उघडपणे होऊ लागली आहे. या संबंधांत स्त्रीला आनंद होऊ शकतो, सुख मिळू शकते याची पुरुषांनाही व स्त्रियांनाही जाणीव नसते यासंबंधी स्पष्टपणे बोलले जाऊ लागले आहे.

मंजुळेचे शरदवर प्रेम आहे. त्याची ओढ तिला वाटते. पण शरीरसौख्यासाठी वृत्ती अनुकूल हव्या असतात. स्त्रीलादेखील तिचे मन आणि शरीर उत्सुक असायला हवे असते. दि. के. बेडेकरांनी या कथेच्या संदर्भात म्हटले आहे, मीलनामध्ये प्रियकराला सर्वस्व अर्पण करणारी प्रेयसी व कोणत्याही पुरुषाला केवळ शरीर देणारी वेश्या यांच्यामधली दरी नाहीशी करणारी राक्षसी किमया पाहून गोखले विस्मित होतात. त्यांना मानवी जीवनाच्या या भीषण, व्यस्त व विसंवादी स्वरूपाचे दर्शन घडते. हे दर्शन ‘मंजुळा’ या कथेतून त्यांनी प्रकट केले आहे.

अरविंद गोखले यांची ही मंजुळा प्रेमाच्या पुरुषाबरोबरदेखील समागमासाठी स्त्रीच्या वृत्ती बहरून यायला हव्यात हे स्पष्टपणे सांगणारी, आधुनिक काळातली पहिली स्त्री म्हणावी लागेल.

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 4:52 am

Web Title: article about women need from men in a relationship
Next Stories
1 शोभा
2 ‘डेस्डेमोना’च्या निमित्ताने
3 लक्ष्मी
Just Now!
X