|| प्रभा गणोरकर

आपल्या नवऱ्यालाच मूल नको आहे, म्हणून तो ते आपल्या ओटीत घालत नाही, असे तिला वाटते आहे. त्याचा तिला आता रागही येऊ लागला आहे. भोवतीचा सारा निसर्ग सृजनात, निर्मितीत तृप्त आहे आणि तिची कूस मात्र नापिक जमिनीसारखी कोरडी आहे. टोणा करणाऱ्या त्या चेटकिणींकडे ती जाते. नवऱ्याला न सांगता लपूनछपून. पण त्याला सुगावा लागतोच.

आपल्या दोन बहिणींसह तो तिथे पोचतो. आपली अब्रू तिने अशी चव्हाटय़ावर मांडली या जाणिवेने तो भयंकर संतापला आहे. रात्रीची ही अशी बाहेर पडते, आपल्या शेजारी पडून आढय़ाकडे पाहत राहते, आपल्याकडे जळजळीत कटाक्ष टाकते. तो संताप ओकू लागतो, ‘‘ती आपल्याला फसवते आहे, असं सारं गाव बोलू लागलं आहे, आता तर उघडपणे बोलायला लागतील. चारचौघात मी जातो तेव्हा मला पाहून सारे एकदम गप्प होतात.’’ दुसरीकडे आपल्या नवऱ्याला आपला निर्मळपणा का दिसू नये या भावनेने यर्मा कासावीस होते. त्याची करुणा भाकते, ‘‘तूच माझा देव आहेस, जीव की प्राण आहेस,’’ असे म्हणते. तो तिला झिडकारतो, दूर लोटतो. तेव्हा त्याच्या पायाशी कोसळून ती धाय मोकलून रडू लागते. शंभर पोरं मागणारं रक्त बापानं आपल्या देहात भरल्याबद्दल ती बापाला शिव्या देऊ लागते.

पहाट होऊ लागलेली असते. बाहेरून जाणाऱ्या माणसांची चाहूल लागते. नवरा तिला घराकडे जायला सांगू लागतो. ती जाते. पण ती थकली आहे. असहायतेने तिचे कशात लक्ष लागत नाही. जवळजवळ महिनाभर ती एकाच जागी बसून होती हे मारियाला कळते. मुले होण्यासाठी नवस करायला पहाडातल्या साधू-बराग्यांच्या वस्तीकडे बायका जात असतात. लहान-थोरांनाही मौजमजा करायला ते ठिकाण आवडते. यर्माही तिथे येते तेव्हा पूर्वी एकदा तिला भेटलेली एक म्हातारी तिला म्हणते, ‘‘किती रया गेली आहे तुझी. तुझ्या नवऱ्याच्या वंशातच खोट आहे. तो, त्याचा बाप, त्याचा आजा हे काही शुद्ध रक्ताचे नव्हतेच. त्याच्या सडक्या घरात कशाला राहतेस. माझ्याबरोबर चल, माझ्या पोराची बायको हो. घरात पाळणा हलेल.’’ तिच्या बोलण्याने संतापलेली यर्मा तिला सुनावते, ‘‘मी अशी दुसऱ्याचा हात धरून जाणारी नव्हे. मला काही मान, काहीच अब्रूची जाण नाही की काय.’’ म्हातारी कुजकटपणे म्हणते, ‘‘मग राहा अशीच वांझोटी.’’ त्या शब्दाने यर्मा घायाळ होते. तेवढय़ात तिच्यावर नजर ठेवून असलेला तिचा झिंगलेला नवरा येतो, म्हणतो, ‘‘तुझे हे वागणे आता मला अस झाले आहे. जे आपल्या दोघांच्याही हातात नाही, त्याचाच हट्ट तू घेऊन बसली आहेस. मला तर त्याचे कधीच काही वाटले नाही.’’

यर्माला हे ऐकून धक्का बसतो. खरे तर त्यालादेखील खंत वाटायला पाहिजे होती. तिची व्यथा त्याला समजायलाच पाहिजे होती. बायकोच्या दु:खाने त्याच्या काळजाला पाझर फुटत नाही. बायको म्हणजे जणू काही त्याच्यासाठी कोंबडीचे जेवण. खावेसे वाटेल तेव्हा पुढे ओढावे. नवरा आताही तिला ओढतच असतो. संतापाने तिचा तोल जातो. आपला हात हिसडून घेऊन दोन्ही पंजांनी ती त्याचा गळा पकडते आणि त्याचा जीव जाईपर्यंत आवळते. लोक भोवती गोळा होऊ लागतात, तेव्हा ती भानावर येते आणि म्हणते, ‘‘माझ्याजवळ येऊ नका.’’ आता ती खरीच कधीच न पिकणाऱ्या जमिनीसारखी कायमची कोरडी झाली आहे. मी माझ्या मुलालाच ठार केले आहे असा आकांत ती करू लागते. येथे नाटक संपते.

वर्षांनुवर्षे अपत्यासाठी झुरणारे स्त्रीचे मन लोर्काने आतून जाणून घेतले आहे. यर्माचे दु:ख, तडफड, कासावीस, हताशा तिच्या शब्दाशब्दातून व्यक्त होते. न झालेल्या बाळाशी चाललेले तिचे बोलणे, तिची अंगाईगीते यांतून तिचे वात्सल्य पाझरत राहते. वर्षे उलटत जातात तसतसा तिचा स्वत:चा आणि नवऱ्याचा तिरस्कार वाढत जातो. युआनशी लग्न केले नसते तर व्हिक्टर तिचा झाला असता असा विचार तिच्या मनात डोकावू लागतो. पण तिला सन्मानानेच राहायचे आहे. आपल्या इच्छेची तृप्ती करू शकणारे मोह तिच्या वाटेत येत असतात. पण ती फशी पडत नाही. हे नाटक यर्मा जपत असलेल्या आत्मगौरवाचे नाटक आहे. ती एका स्त्रीची व्यक्तिगत शोकात्मिका आहे. पण ती तेवढीच राहत नाही. अपत्यहीन बाईला समाज सुखाने जगू देत नाही. तिला बोल लावला जातो. तिची टवाळी होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. संसारातली उणीव हा तिच्या नवऱ्याच्या अब्रूचा प्रश्न बनतो. समाजाची मानसिकता, पती-पत्नीवर येणारा समाजाचा दबाव, त्यांतून दोघांमध्ये निर्माण होणारे ताण, आत्मकरुणा, मत्सर, संशय, संताप, नराश्य अशा भावनांची वादळे आणि त्यांनी उद्ध्वस्त होणारी जीवने असे व्यापक परिमाण या कौटुंबिक समस्येला येते.

लोर्काच्या ‘यर्मा’ या नाटकाचे आरती हवालदार यांनी केलेले रूपांतर ‘चांगुणा’ (मौज प्रकाशन, १९७५) हे ‘आविष्कार’तर्फे १९७४ मध्ये रंगभूमीवर आलेले आहे. रोहिणी ओक (हट्टंगडी) यांनी चांगुणाची भूमिका केली होती. या नाटकातील गीते आनंद यादवांनी लिहिली आहेत. यर्माच्या भोवतीचे ग्रामीण वातावरण उभे करण्यासाठी रूपांतरकर्तीने संपूर्ण नाटकात बोली वापरली आहे.

ही स्पॅनिश यर्मा मला परकी वाटलीच नाही. ती आपल्या देशातल्या कोणत्याही अपत्यहीन स्त्रियांमधलीच एक वाटली. अशा स्त्रीला जे सोसावे लागते ते केवळ एकपदरी दु:ख नसते. ती एकीकडे स्वत:ची प्रबळ जैविक प्रेरणा असते. आपल्या हाडामांसाचे, आपले कुणी तरी, आपल्या कुशीतून यावे अशी मानसिक ओढ असते. त्याचबरोबर समाजाने, संस्कृतीने तिच्यावर सोपवलेल्या मातृत्व या पवित्र संकल्पनेचे ओझे असते. शरीरामुळे निसर्गत: येणारी जबाबदारी असते. ती शारीरिक-मानसिक वेदना असते. एक अहोरात्र घेरून टाकणारी मनोवस्था असते, एकटेपण असते, रिती पोकळी असते. हळूहळू काळ बदलत चाललेला असला तरी जुन्या कल्पना कवटाळून बसलेल्या आपल्या समाजात अपत्यहीन स्त्रियांना आप्त, शेजारीपाजारी आणि भोवतीचा समाज वेगळे काढतो. एकदा यर्माला वाटते, नुकतेच मूल झालेली आपली मत्रीण मारिया मुलाला घेऊन आपल्या दारावरून भरकन जाते. आपली नजर तिला लागू नये म्हणून तर ती अशी घाईने जात नाहीना? अद्यापही लेकुरवाळ्या अपत्यहीन बाईकडे अवहेलनेने बघतात. रिकामटेकडय़ा बायकांचा चवीने चघळण्याचा हा एक विषय असतो. मूल न होण्याचा दोष पुरुष स्वत:कडे घ्यायचे टाळतात. तपासणीला नकार देतात. सारे खापर बाईवर फोडले जाते. मग अशा बायका जादूटोणा, जंतरमंतर, नवससायास, बुवा-बरागी यांच्या नादी लागतात. त्यांना नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला मान तुकवावी लागते. बाई आहे तर मूल जन्माला घालण्यातच तिच्या बाईपणाचे सार्थक आहे. म्हणून विज्ञानाचे साहाय्य घेतले जाते. शहरात फर्टिलिंटी सेंटर्सची संख्या आणि तत्संबंधित गरव्यवहार फोफावत आहेत, त्यामागे ही मानसिकता आहे.

यर्मा वाचताना मला एकदम आठवली ती फार पूर्वी वाचलेली सरिता पदकी यांची ‘बारा रामांचे देऊळ’ ही कथा, (याच शीर्षकाच्या संग्रहात समाविष्ट), जीएंची ‘काजळमाया’तील आपल्या जन्माचे भयंकर सत्य एकदम लक्षात आलेल्या करेव्वाची व्यथा सांगणारी ‘वंश’ ही कथा, आणि शहरी सुशिक्षित विनापत्य तरुणीचा उद्वेग व्यक्त करणारी प्रिया तेंडुलकर यांची ‘फर्टिलिंटी सेंटर’ ही कथा.

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com