या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘देशभक्त सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’ ही आमची वसाहत खूप प्रेरित होणारी आहे, हे मी लिहिले होतेच. आता हे गायींचे प्रकरण घ्या. गायींना वाचवायचे ठरल्यावर आम्ही तत्काळ ठराव केला आणि गाईचा पुतळा उभारला. गायींना वाचवायचे ठरल्यावर आम्ही तत्काळ ठराव केला आणि गाईचा पुतळा उभारला.तिला एकदम शाश्वत करून टाकले. प्रत्येक समस्येवर पुतळा किंवा स्मारक हेच रामबाण औषध आहे हे लक्षात ठेवा. पुढे-मागे आम्हाला अपयश येऊन गायी नष्ट झाल्याच तर पाच हजार वर्षांनी उत्खनन करणाऱ्यांना तो पुतळा तर सापडेल व गाय कशी दिसत होती, हे तर कळेल! मग भविष्यकाळात गायीवर ‘गुरासिक पार्क’ हा चित्रपट कुणी काढू शकेल. शेवटी पुतळे उभारणे हेच आपल्या हातात. बाकी गायींचे नशीब बलवत्तर असेल तर वाचतील बापडय़ा. कलियुगाच्या शेवटी सगळे नष्ट होणार आहे. आपण तरी किती पुरे पडणार?

आम्ही गायी वाचवायच्या ठरवल्यावर विश्वशांती या सेक्युलर सोसायटीने अर्थातच त्याविरुद्ध पवित्रा घेतला व बीफ पाटर्य़ाचे आयोजन केले. बीफ खाता खाता कोण जास्त पुरोगामी, अशी स्पर्धा त्यांच्यात सुरू झाली. जो अधिक बीफ खाईल त्याला ‘गोब्राह्मण अतिपाचक’ ही पदवी देण्याचे ठरले. जे बीफ खाऊ  शकले नाहीत किंवा कमी खाऊ शकले त्यांना सोसायटीतून हाकलून देण्याचे ठरले. कारण ते छुपे हिंदुत्ववादी असतील अशी चर्चा सुरू झाली. मग अशा संशयितांनी वेळीच केंद्र सरकारविरोधी घोषणा देत दोन-दोन दिवस खाटिकखान्यात श्रमदान केले व आपले घर वाचवले. शिवाय येता-जाता दिसेल त्या गुरांना अर्वाच्य शिव्या देऊन आपली सेक्युलरिझमवरील निष्ठा सिद्ध केली आणि ‘आम्ही तुमच्यातलेच आहोत, आम्हाला आपले म्हणा’ अशी विश्वशांती सोसायटीला गळ घातली. त्यातल्या काहींनी तर एका बीफ पार्टीला गाई कमी पडल्या म्हणून म्हशींना फेयरनेस क्रीम लावून त्यांचे गाईत रूपांतर करून त्यांना खाल्ले! त्यांना अद्दल म्हणून आम्ही देशभक्त सोसायटीने मुद्दाम ‘मानवी विष्ठा आम्ही पवित्र मानतो व तिचे सेवन करण्यास डुकरांना बंदी करा..’ असा ठराव केला. त्यावर विश्वशांती सोसायटीतील काही अति उत्साहींनी केवळ आम्हाला विरोध करण्यासाठी उकिरडय़ावर जाऊन डुकरांच्या बरोबरीने.. पुढचे लिहवत नाही.. पाहूही शकलो नाही. ते जरी शत्रू असले तरी त्यांच्या या विष्ठावान शत्रुत्वाला सलाम!

मात्र, त्यांच्या वेळीच लक्षात आले की आपल्या हातून विषमता होते आहे. आपण फक्त गाई खाऊ  लागलो आहोत, हा गाईंवर अन्याय नसून इतर प्राण्यांवर अन्याय आहे. मग सर्वच प्राण्यांना खात त्यांनी आपल्या वर्तणुकीत समानता आणली. कोंबडय़ा, बकऱ्या, मासे अशा प्राण्यांची जाहीर खांडोळी व बार्बेक्यू करीत त्यांनी समानतेबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्य, सहिष्णुता व सेक्युलरिझम यांचे रक्षण केले. मी आमच्या देशभक्त सोसायटीला नेहमी त्यांच्या दाहकतेचे उदाहरण देत असतो. माणसाने नेहमी विद्यार्थी असावे.

या सर्व गदारोळात मूळ विषय जो गाय- त्याच्याविषयी काहीच माहिती समाजाला मिळाली नाही. प्रत्येक वेळी संशोधन म्हटल्यावर ते विश्वशांतीवालेच पुढे असतात, म्हणून मी या क्षेत्रात उतरलो व अत्यंत तटस्थ असे संशोधन करून आमच्या देशभक्त सोसायटीची वाहवा मिळवली. प्रत्येक वाक्याला प्रचंड टाळ्या व ‘अप्रतिम.. उत्तम’ असे उद्गार निघत होते, हे सांगायला नकोच. वाचकांनी कृपया नोंद घ्यावी व प्रत्येक वाक्यानंतर मनातल्या मनात तो प्रतिसाद कल्पावा. तर ते भाषण असे होते..

‘गाय ही एक स्त्रीलिंगी प्राणी आहे. बैल हा पुल्लिंगी असतो. त्यांना वासरू नावाचे पिल्लू होते- जे नपुंसकलिंगी असते, कारण आपण ‘ते वासरू’ असे म्हणतो. गाय ही गरीब असते, बैल श्रीमंत असतो. तरी त्यांचे लग्न होते. गाय दूध देते, बदल्यात गवत घेते. लहान मुलांना झोपवताना ‘गाई गाई’ असे म्हणण्याची प्रथा आहे. त्याने मुले झोपतात, पण गाईंची झोप उडते. त्यांना कळत नाही, की इतक्या रात्री आपल्याकडे कोण आले आहे?

आता आपण ‘गाय’ या शब्दाची उपपत्ती पाहू. हा शब्द ‘काय’ या शब्दाशी मिळताजुळता आहे. यावरून असे सिद्ध होते की, फार प्राचीन काळापासून या प्राण्याचे काय होणार, अशी चिंता माणसे करीत. पुढे पुढे तर या प्राण्याकडे बोट दाखवून करुण चेहऱ्याने ‘काय’ एवढाच शब्द लोक साश्रुनयनांनी काढू लागले. कालांतराने ‘काय’चा अपभ्रंश होऊन ‘गाय’ हा शब्द रूढ झाला! गायन कलेचे नावही गाईवरून पडले असावे. गाईला जे जमत नाही ते गायन.

इंग्रजीत गाईला ‘काऊ ’ म्हणतात. त्याचीही एक कथा आहे. आणि त्या शब्दाचे मूळ भारतात आहे, हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेल, ते बरोबर आहे. ज्ञानेश्वरकालीन महाराष्ट्रात एक इंग्रज प्रवासी आला होता. तो शेतकरी जीवनाचा अभ्यास करी. शेतकरी कुटुंबात कोंबडी, शेळी, बैल, गाय इत्यादी प्राणी असत. शिवाय कावळे, चिमण्या येऊन-जाऊन असत. एक दिवस त्या शेतकऱ्याच्या गाईच्या पाठीवर एक कावळा बसला. नेमके त्याचवेळी इंग्रजाने शेतकऱ्यास विचारले की, ते कोण? शेतकऱ्यास वाटले, इंग्रज कावळ्याची चौकशी करीत आहे, म्हणून तो म्हणाला- काऊ. इंग्रजास वाटले की, गाईला काऊ असे म्हणतात. असा एक मोठाच गैरसमज झाला व इंग्रज गाईला ‘काऊ ’ म्हणू लागले. कृपया, लक्षात घ्या की, ज्ञानेश्वरकाळी कावळ्याला ‘काऊ ’ हा शब्द होता व काही कावळे गे होते. संदर्भ- ‘पैल तो गे काऊ  कोकताहे..’ अर्थ- पलीकडे तो गे कावळा कोकलत आहे.

आपल्याकडे देवाच्या अवतारांत मासा, कासव, डुक्कर हे प्राणी झाले. पण त्यामुळे त्यांना संरक्षण मिळण्याऐवजी त्या अवतारांना उदरात जागा देण्याकडे माणसाचा कल झाला. हे वेळीच लक्षात आल्याने काही प्राणिप्रेमी ऋषींनी प्राण्यांना अवतार करणे थांबवले व पुढे नरसिंह, वामन, परशुराम, राम इत्यादी काही कठोर माणसे अवतार केली गेली. त्यामुळे गाईला अवतारात स्थान मिळाले नाही. ती उणीव थेट कृष्णावतारात भरून निघाली. त्यातही पूर्ण अवतार नाही, पण सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार तिला मिळाला. महाभारत या खूप टीआरपी असलेल्या पुस्तकात मानाचे स्थान मिळाले. तोपर्यंत मानाचे स्थान असलेले black and white काळातील स्टार असलेले मासा, कासव, डुक्कर हे पुढे ज्युनियर आर्टिस्ट झाले व ईस्टमन कलरयुगात गाय सुपरस्टार झाली.

तर अशी ही ऐतिहासिक गाय इतिहासात जमा होण्याचा धोका असून, आम्ही तिच्या रक्षणासाठी पुढील कठोर उपाय सुचवतो-

१) प्रत्येक घराचे ‘मातृकृपा, पितृकृपा’ वगैरे नावे रद्द करून ‘मातृगोठा, पितृगोठा’ हीच नावे देण्याची सक्ती करावी.

२) शक्य त्या राज्यांची नावे गायवाचक करावीत. जसे गोराष्ट्र, गोजरात, गुत्तरप्रदेश, गुरांचल, बैलनाडू इत्यादी. गोवा हे नाव तसेच राहील. खूप दूरदृष्टी दाखवून ते नाव ठेवले आहे. गोव्याचा विशेष सत्कार करावा.

३) रुपयाऐवजी ‘गोधन’ असे नाव चलनाला द्यावे. नाण्यांऐवजी गोवऱ्या वापराव्या.

४) जंगलाचा राजा हे पद बैलास द्यावे. कुणी हरकत घेतल्यास मधून मधून बैलास कमांडोंच्या संरक्षणात जंगलात फिरवून आणावे, ते फोटो पेपरात छापावेत.

५) राष्ट्रीय पक्षी जो मोर- त्याची पिसे गाईच्या शेपटास खोचून तिलाच राष्ट्रीय पक्षी बनवावे. मोर नाराज होऊ  नये म्हणून त्यास एखाद्या वनाचा वनपाल बनवावे.

६) वासरांच्या महत्त्वाकांक्षेची दखल घेऊन युवा गुरांना ‘गोवंश सेना’ काढून द्यावी. काही पालिका-महापालिकांच्या क्षेत्रात ते रस्त्यात मध्यभागी कोंडाळे करून बसले तर सहन करावे. काही कारण नसताना ते हंबरतील कदाचित; पण दिवसातून एक-दोनदा ‘तुम्ही खूप पवित्र’ असे म्हणावे, त्यांचा फार त्रास होणार नाही.

७) वरील एक-दोन प्राण्यांस प्राधान्य आल्यावर बाकीच्या प्राण्यांमध्ये चातुर्वण्र्य कॉम्प्लेक्स उत्पन्न होईल कदाचित. त्यांच्या असंतोषास वाट करून देण्यास जंगल आयोग स्थापावा. काही राखीव खाटिकखान्यांत फक्त तुमचीच कत्तल होईल असे आश्वासन द्यावे. ‘हा कसला न्याय?’ अशी कुरकुर झाल्यास मग नाइलाजाने कुरणे वा जंगले राखीव करावीत- ज्यात गोवंशास चरण्यास बंदी करावी.

८) एकूण परिस्थितीची दखल घेऊन प्राण्यांसही मतदानाचा हक्क द्यावा. राज्यसभेत काही जागा त्यांच्यासाठी राखीव करून त्यांचे प्रतिनिधी संसदेत बसवावेत. प्रथम एकदम ते बावरून जातील. सगळीकडून त्यांच्यासारखेच आवाज त्यांना ऐकू येतील. त्यांच्या प्रसाधनगृहांची अडचण होईल. संसदेच्या स्वच्छतेचा प्रश्न मोठा बिकट बनेल. पण तसेही संसदेत द्विपाद प्राणी जी घाण करतात ती आपण सहन करतो; तेव्हा चतुष्पादांच्या मलमूत्राचे वाईट वाटून घेऊ  नये!

lokrang@expressindia.com 

मराठीतील सर्व सुदाम्याचे ऑरगॅनिक पोहे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles on cow slaughter and some different information on cow
First published on: 06-03-2016 at 01:12 IST