शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या मुकाबल्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर एका विकेटने मात केली. १०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चालरेट एडवर्ड्स आणि टॅमी ब्युमाऊंट यांनी ५९ धावांची खणखणीत सलामी दिली. चालरेटने ३० तर टॅमीने ३१ धावांची खेळी केली. ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडने सातत्याने विकेट्स गमावल्या. दुसऱ्या बाजूने सहकारी बाद होत असताना नताली शिव्हरने एका बाजूने चिवटपणे किल्ला लढवत नाबाद १९ धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजतर्फे शाक्वुना क्विंटायन आणि अ‍ॅफी फ्लेचर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने १०८ धावा केल्या.
पाकिस्तानची बांगलादेशवर मात
सिद्रा अमीन आणि बिसमाह मारुफ यांच्या संयमी खेळींच्या जोरावर पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वचषकात बांगलादेशवर नऊ विकेट्सनी मात केली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ११३ धावांची मजल मारली. फरगना होकने ३६ धावांची खेळी केली. सिद्रा अमीन आणि बिसमाह मारुफ यांनी ९९ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सिद्राने ४ चौकारांसह ४८ चेंडूंत ५३ तर बिसमाहने ५ चौकारांसह ४२ चेंडूंत ४३ धावांची खेळी केली. सिद्राला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर विजय
सांघिक कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने श्रीलंकेवर नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. श्रीलंकेने १२३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना एलियास व्हिलानी आणि मेग लॅनिंग जोडीने ९८ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिलाय व्हिलानीने ५३ तर लॅनिंगने ५६ धावा केली.