आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत अद्याप विचार केलेला नसून, पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर याबाबत विचार करेन, असे पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.
पाकिस्तानला शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह पाकिस्तान संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान देखील संपुष्टात आले. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्तीचे संकेत आफ्रिदीने याआधी दिले होते. मात्र, आज झालेल्या सामन्यानंतर त्याच्या निर्णयाबाबत विचारणा केली असता तो म्हणाला की, “निवृत्तीबाबत मी अद्याप विचार केलेला नाही. पण मी मायदेशी परतल्यानंतर याबाबत विचार करेन.”
दरम्यान, या विश्वचषक स्पर्धेनंतर आफ्रिदीला संघाच्या कर्णधार पदावरून दूर करणार असल्याचे संकेत पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने दिले आहेत. त्यामुळे मायदेशात परतल्यानंतर आफ्रिदी कोणता निर्णय घेणार याकडे साऱयांचे लक्ष आहे.