एके काळी विश्वचषक, पाकिस्तान आणि सचिन तेंडुलकर यांचं गहिरं नातं असायचं. पाकिस्तानी गोलंदाजीवर जोरदार हल्ला करून भारताच्या विजयात योगदान देणाऱ्या सचिनच्या खेळी या क्रिकेटरसिकांच्या स्मृतिपटलावर आजही ताज्या आहेत. सचिन आणि शोएब अख्तर यांच्यातली मैदानावरील ‘ठस्सन’ पाहणे, हा क्रिकेटमधील अत्युच्च आनंददायी अनुभव असायचा. सचिनच्या निवृत्तीनंतर त्याचं हेच स्थान आता विराट कोहलीनं घेतलं आहे. भारताचे माजी संघनायक सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं की, ‘‘सचिनचे सर्व विश्वविक्रम एक भारतीय क्रिकेटपटूच मोडू शकेल. भारतीय संघातील विराटकडे ही क्षमता आहे.’’ गावस्कर यांचे बोल आता खरे ठरू लागले आहेत. विराट तेजानं तळपू लागला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत तो आपल्या अभिजात फलंदाजीचा ठसा उमटवू लागला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर १९ मार्चला होणाऱ्या लढतीत पाकिस्तानला सर्वात मोठा धोका हा विराटपासून असणार आहे. याचं कारण म्हणजे ‘विश्वचषक, पाकिस्तान आणि विराट’ हे निर्माण झालेलं नवं समीकरण. सचिनच्या क्रिकेटविश्वातील तीन विश्वचषक सामन्यांचा विराट हा समान धागा होता. कोलंबोत २०१२च्या विश्वचषकातील सामन्यात विराटनं नाबाद ७८ धावा केल्या होत्या. मग ढाका येथे २०१४च्या विश्वचषकात विराटनं नाबाद ३६ धावांची खेळी साकारली. एकदिवसीय विश्वचषकातसुद्धा विराट पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडला होता. गेल्या वर्षी १५ मार्चला अ‍ॅडलेड येथे झालेल्या सामन्यात विराटनं १०७ धावांची शतकी खेळी उभारली होती. त्यामुळेच धावांचे त्रिशतक उभारणाऱ्या भारताला विजय मिळवता आला होता. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झाल्यास २७ फेब्रुवारीला आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पध्रेतील भारत-पाकिस्तान लढतीतसुद्धा विराटच विजयाचा शिल्पकार ठरला होता. दुर्दैवानं भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे गेली अनेक वष्रे या दोन संघांमध्ये कसोटी सामना झालेला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळण्याचा भाग्य विराटला लाभलेलं नाही. मात्र पाकिस्तानविरुद्ध १० एकदिवसीय सामन्यांत त्यानं ३७३ धावा केल्या असून, यात दोन शतकांचा समावेश आहे. मीरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर २०१२च्या आशिया चषक क्रिकेट स्पध्रेतील ‘विराटरूप’ साऱ्यांनाच थक्क करणारं होतं. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर गौतम गंभीर भोपळासुद्धा फोडू शकला नव्हता; परंतु सचिनच्या साथीने विराटनं जिद्दीनं पाकिस्तानी माऱ्याचा सामना केला. २२ चौकार आणि एका षटकारासह विराटनं १४८ चेंडूंत १८३ धावांची वादळी खेळी साकारली आणि भारताला हा सामना जिंकून दिला. ट्वेन्टी-२० प्रकारात पाकिस्तानविरुद्धच्या ५ सामन्यांत विराटनं ६६.३३च्या धाव सरासरीनं १९९ धावा काढल्या आहेत. हा सारा लेखाजोखा पाकिस्तानविरुद्ध भारताचं ‘विराट अस्त्र’ किती आक्रमकपणे अवतरते, याची साक्ष देते. त्यामुळेच ईडन गार्डन्सवर आणखी एका विराट खेळीची चाहत्यांना अपेक्षा आहे.