उपांत्य फेरी गाठण्यासाठी विंडीजला, तर आव्हान टिकवण्यासाठी आफ्रिकेला विजय हवा
‘गेल खेल में..’ हीच अनुभूती शुक्रवारी नागपूरकरांना घेता येणार आहे. उपांत्य फेरीची कास धरणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघात सलामीवीर म्हणून ख्रिस गेलचे पुनरागमन हेच त्यांच्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत बलस्थान ठरणार आहे.
क्षेत्ररक्षण करताना मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज फटके खेळणाऱ्या गेलला फलंदाजीमध्ये सहावा क्रमांक देण्यात आला होता. विंडीजला गेलची मुळीच आवश्यकता भासली नाही. कारण प्रभारी सलामीवीर आंद्रे फ्लेचरने नाबाद ८४ धावांची खेळी उभारल्यामुळे बंगळुरू येथे विंडीजने सात विकेट्स राखून विजय मिळवला.
वानखेडे स्टेडियमवर गेलने ११ षटकारांच्या साहाय्याने साकारलेल्या शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून पहिल्या विजयाची नोंद केली होती. त्यामुळे चार गुणांसह पहिल्या गटात गुणतालिकेतील अग्रस्थान भूषणवणाऱ्या विंडीजने दक्षिण आफ्रिकेने हरवल्यास ते उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करू शकतील. आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत गेल आणि फ्लेचर विंडीजच्या डावालाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. तर जॉन्सन चार्लस तिसऱ्या स्थानावर उतरेल.
‘‘मी फ्लेचरसोबत अनेक सामन्यांत सलामीला उतरलो आहे. तो अतिशय स्फोटक फलंदाज आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे,’’ असे गेल म्हणाला.
दोन सामन्यांत एक विजय मिळवणाऱ्या आफ्रिकेला मात्र उपांत्य फेरीच्या आशा टिकवण्यासाठी विंडीजविरुद्ध विजयाची नितांत आवश्यकता आहे. इंग्लंडने २३० धावांचे लक्ष्य पेलून हरवल्यानंतर आफ्रिकेने दुबळ्या अफगाणिस्तानचा पराभव करून गुणतालिकेतील तिसरे स्थान मिळवले आहे. जर आफ्रिकेला शुक्रवारची लढत जिंकण्यात अपयश आले तर इंग्लंडच्या आशा बळावणार आहेत. जीन-पॉल डय़ुमिनीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
* स्थळ : व्हीसीए स्टेडियम, नागपूर
* वेळ : सायं. ७.३० वा.पासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.
दक्षिण आफ्रिका : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), कायले अॅबॉट, हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी कॉक, ए बी डी’व्हिलियर्स, इम्रान ताहीर, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर, आरोन फँगिसो, कॅगिसो रबाडा, रिली रोसोऊ, डेल स्टेन, डेव्हिड विसी.
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्लस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसॉन होल्डर, अॅशले नर्स, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, मार्लन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर, एव्हिन लेविस.