दक्षिण आफ्रिकेवर ३ विकेट्स राखून थरारक विजय
नागपूरच्या जामठा मैदानावर प्रत्येक सामना रोमांचकारी होऊ शकतो, याचा प्रत्यय वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने दिला. आफ्रिकेच्या माफक १२३ धावांचा पाठलाग करताना फॉर्मात असलेल्या वेस्ट इंडिजला अखेरच्या षटकापर्यंत वाट पहावी लागली. वेस्ट इंडिजने आफ्रिकेवर तीन विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे, या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सुरुवातीलाच धक्का बसला. धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला (४) कागिसो रबाडाने त्रिफळाचीत केले. जॉन्सन चार्ल्स (३२) आणि मार्लन सॅम्युअल्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. डेव्हिड वीसेने चार्ल्सला बाद करत ही जोडी फोडली. ड्वेन ब्राव्हो (८) व आंद्रे रसेल (४) धावांवर बाद झाले आणि वेस्ट इंडिजची अवस्था ५ बाद १०० अशी झाली. एका बाजूने चिवटपणे खेळ करणारा सॅम्युअल्स मोठा फटका मारण्याच्या नादात १९व्या षटकांत बाद झाला. त्याने ६ चौकारांसह ४४ धावांची खेळी साकारली. शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या चेंडूवर कालरेस ब्रेथवेटने (नाबाद १०) षटकार खेचत सामना वेस्ट इंडिजच्या बाजूने फिरवला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला केवळ १२२ धावांची मजल मारली. पहिल्या षटकात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात हशीम अमला धावबाद झाला. कर्णधार फॅफ डू प्लेसिस, रिले रोसू, एबी डी’व्हिलियर्स आणि डेव्हिड मिलर हे स्वस्तात तंबूत परतले. एका बाजूने सहकारी बाद होत असताना क्विंटन डी कॉकने नेटाने किल्ला लढवला. त्याने डेव्हिड वीसेसह सहाव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. डी कॉकने ३ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावांची खेळी केली. वीसेने २६ चेंडूत २८ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ८ बाद १२२ (क्विंटन डी कॉक ४७, डेव्हिड वीसे २८, ड्वेन ब्राव्हो २/२०, ख्रिस गेल २/१७) पराभूत विरूद्ध वेस्ट इंडिज : १९.४ षटकांत ७ बाद १२३ (मार्लन सॅम्युअल्स ४४, जॉन्सन चार्ल्स ३२, इम्रान ताहीर २/१३)
सामनावीर : मार्लन सॅम्युअल्स