ऑस्ट्रेलिया-बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा सामना आज
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश समोरासमोर येतील ते स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी. पहिल्या सामन्यात या दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हे दोन्ही पहिल्या विजयाचा प्रतीक्षेत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझीलंडकडून ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला होता. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना न्यूझीलंडचे माफक आव्हानही पेलवता आले नव्हते. शेन वॉटसन आणि मिचेल मार्श या अष्टपैलू खेळाडूंनी गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर वॉटसन आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सलामीही करून दिली होती, पण ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. कर्णधार स्टिव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल हे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात आरोन फिंचला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांगलादेशला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने बांगलादेशच्या गोलंदाजीची पिसे काढली होती. त्याबरोबर शकिब अल हसनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नव्हती. शकिबने एकाकी झुंज देत नाबाद अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यामुळे या सामन्यात शकिबकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. पण फक्त त्याच्यावरच अवलंबून बांगलादेशला चालणार नाही. त्यांना जर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला नमवायचे असेल तर गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्यांना चांगलाच घाम गाळावा लागेल.

संघ
ऑस्ट्रेलिया : स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅश्टॉन अ‍ॅगर, नॅथन कल्टर-निले, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, जॉन हॅस्टिंग, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, पीटर नेव्हिल, अ‍ॅण्ड्रय़ू टाय, शेन वॉटसन, अ‍ॅडम झाम्पा.
बांगलादेश : मश्रफी मुतर्झा (कर्णधार), शकिब अल हसन, अबू हैदर, अल-अमिन होसेन, महमुदुल्लाह, मोहम्मद मिथून, मुस्ताफिझूर रहमान, नासिर होसेन, नुरूल हसन, शब्बीर रहमान, सौम्य सरकार आणि तमीम इक्बाल.

* स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम
* वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्