ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी थरारक विजय
छोटय़ा धावसंख्येचा बचाव कसा करायचा याचा आदर्श वस्तुपाठ सादर करत न्यूझीलंडने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर अवघ्या आठ धावांनी विजय मिळवला. विश्वचषक अभियानाची सुरुवात यजमान भारताला पराभवाचा धक्का दिल्यानंतर न्यूझीलंडने ट्रान्स-टास्मानियन द्वंद्वांत सरशी साधत बाद फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. न्यूझीलंडने १४२ धावा केल्या. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सुस्थितीत होता. मात्र भेदक गोलंदाजी आणि चोख क्षेत्ररक्षणाच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला १३४ धावांतच रोखले. तीन बळी घेणाऱ्या मिचेल मॅकलेघानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
१४३ धावांचा पाठलाग करताना उस्मान ख्वाजा आणि शेन वॉटसन यांनी ४४ धावांची सलामी दिली. मॅक्लेघानने वॉटसनला बाद करत ही जोडी फोडली. भरवशाच्या स्टीव्हन स्मिथला फिरकीपटू मायकेल सँटनरने फसवले. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात उस्मान ख्वाजा धावचीत झाला. त्याने २७ चेंडूंत ६ चौकारांसह ३८ धावांची खेळी केली. धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला गप्तीलकडे झेल देण्यास भाग पाडत सँटनरने ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. ग्लेन मॅक्सवेल विल्यमसनच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने २२ धावा केल्या. सहाव्या विकेटसाठी मिचेल मार्श आणि अ‍ॅश्टॉन अगर यांनी २१ धावा जोडत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. १९व्या षटकात मॅक्लेघानने मार्श आणि अगरला बाद करत सामना न्यूझीलंडच्या बाजूने फिरवला. त्याने या षटकांत केवळ तीन धावा दिल्या. अखेरच्या षटकांत १९ धावा करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. ऑस्ट्रेलियाने १३४ धावांची मजल मारली. न्यूझीलंडतर्फे मिचेल मॅक्लेघानने १७ धावांत ३ बळी घेतले. तत्पूर्वी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गप्तील आणि केन विल्यमसन जोडीने ६१ धावांची खणखणीत सलामी दिली. गप्तीलने २७ चेंडूत ३९ धावा केल्या. पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलने विल्यमसनला तंबूचा रस्ता दाखवला. सलामीवीर माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडने सातत्याने विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जेम्स फॉकनर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १४२ (मार्टिन गप्तील ३९, ग्लेन मॅक्सवेल २/१८, जेम्स फॉकनर २/१८) विजयी विरूद्ध ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ९ बाद १३४ (उस्मान ख्वाजा ३८, मिचेल मॅक्लेघान ३/१७, कोरे अ‍ॅण्डरसन २/२९)