आजकाल सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI (एआय)ची जोरदार चर्चा सुरू आहे. एआयसह लोकांच्या कामाची पद्धत अधिक साधी, सोपी व सरळ व्हावी हा एआयचा उद्देश आहे. पण, याचा दुरुपयोगही तितकाच सर्रास सुरू आहे. तर आता यादरम्यान आणखीन एक माहिती समोर येत आहे की, तुम्ही कधी नोकरी सोडणार हेसुद्धा आता AI तुमच्या बॉसला सांगणार…

जपानी संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल तयार केलं आहे. या टूलसह कंपनीतील एखादा कर्मचारी किती दिवस ही नोकरी करणार आणि कधी ही नोकरी सोडणारं हे AI आधीच तुमच्या बॉसला कळविणार आहे. हे नवीन टूल तयार करण्यासाठी टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक नरुहिको शिराटोरी यांनी एका जपानी भांडवलावर आधारित स्टार्ट-अपबरोबर हातमिळवणी केली आहे. कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यापासून थांबविणे हा या टूलचा उद्देश असणार आहे.

हेही वाचा…लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार

तर नवीन एआय टूल कसे काम करणार?

एआय टूल कंपनीतील कर्मचाऱ्यांचा डेटा, त्यांच्या उपस्थितीच्या नोंदीपासून ते वय, लिंग यांसारख्या वैयक्तिक माहितीपर्यंतचा डेटा गोळा करील. हे टूल प्रत्येक फर्मचे टर्नओव्हर मॉडेल तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सुटीचा पॅटर्न, कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्यांच्या डेटाचा अभ्यास करून एक अहवाल तयार करील. त्यानंतर एआय टक्केवारी गुणांमध्ये (Percentage points) कोण नोकरी सोडून जाईल याचा अंदाज लावेल. त्यामुळे मॅनेजरला कोण नोकरी सोडणार आहे हे समजेल आणि तो त्या कर्मचाऱ्यास कदाचित थांबवून, त्याची समजूत काढू शकेल, असे टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक नरुहिको शिराटोरी यांनी शुक्रवारी एएफपीला सांगितले.

सध्या अनेक कंपन्यांसाठी या एआय टूलची चाचणी केली जाते आहे आणि प्रत्येकासाठी एक मॉडेल तयार केलं जात आहे. हे साधन तयार करण्यासाठी संशोधकांनी एआय वापर करून, मागील अभ्यासावर आधारित विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा अंदाज लावला. त्यामुळे आता ते अपग्रेडची योजना आखत आहेत. त्यानुसार एआय टूल नवीन कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या वेळी दिलेल्या मुलाखतींमधील माहिती आणि वैयक्तिक डेटा यांचे विश्लेषण करून, त्यांना नोकरीसाठी योग्य असाइनमेंट (Assignment) सुचवू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जपानी व्यावसायिकांच्या निरीक्षणातून असे समोर आले की, प्रत्येक वर्षी अनेक पदवीधरांना कामावर घेतले जाते. पण, महाविद्यालयांत नवीन भरती झालेल्या १० टक्क्यांपैकी एकाने वर्षभरात नोकरी सोडली आणि कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सुमारे ३० टक्के लोक तीन वर्षांत त्यांची कंपनी सोडतात, अशी माहिती सरकारी डेटामधून दिसून येत आहे. तर ही बाब लक्षात घेता, कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडू नये म्हणून बहुतांश वेळा एआय टूलची मदत घेतली जाणार आहे.