स्टार ट्रेक, स्टार वॉर्स या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही उडणाऱ्या वाहनांना बघितलेच असेल. त्यावेळी आपल्यालाही असा प्रवास करता येणार का, असे झाल्यास हवेत उडताना किती मज्जा येईल, अशी भावना तुम्ही व्यक्त केलीच असणार. तुमचे हे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते. कारण अशा वाहनांच्या चाचण्या सुरू असून यात एका चीनी कंपनीने यश मिळवल्याचे दिसून आले आहे. दुबईमध्ये एका चीनी कंपनीने उडणाऱ्या कारची चाचणी केली आहे. या चाचणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वाहनात इतकी लोक बसू शकतात

चीनमधील गुआंगझाऊ येथील एक्सपेंग आयएनसीने ही उडणारी कार तयार केली आहे. xpeng x2 असे या कारचे नाव आहे. सोमवारी कंपनीने दुबईमध्ये या वानाची मानवरहित हवाई चाचणी घेतली. या कारमध्ये दोन प्रवाशी बसू शकतात. एक्स २ मध्ये ८ प्रोपेलर्स बसवण्यात आले आहेत जे तिला हवेत उचलण्यासाठी मदत करतात. एक्स २ हे इलेक्ट्रिकवर चालत असून ती जागेवरून सरळ वरच्या दिशेने उड्डाण घेते आणि लँड करते. म्हजेच ती व्हर्टिकल टेकऑफ करते.

(IPHONE युजरना ५ जी सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार, ‘या’ महिन्यात मिळणार सॉफ्टवेअर अपडेट)

सोमवारी झालेली चाचणी ही पुढील पिढीच्या वाहन निर्मितीसाठी महत्वाचा पाया असल्याचे कार निर्मात्याचे म्हणणे आहे. आम्ही एक एक पायरी चढत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रवेश करत आहोत. दुबई हे जगातील सर्वात नाविन्यपूर्ण शहर असल्याने त्याची निवड आधी करण्यात आल्याचे एक्सपेंग एर्होट कंपनीचे जनरल मॅनेजर मिंगुआन क्यू यांनी सांगितले. @lovindubai नावाच्या ट्विटर हँडलने या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

ही आहे वाहनाची सर्वोच्च स्पिड

सोमवारी मानवरहित चाचणी घेण्यात घेण्यात आली होती. मात्र जुलै २०२१ मध्ये मानवयुक्त उड्डाण चाचणी घेतली होती, असेही कंपनीने सांगितले. वाहनाची सर्वोच्च गती १३० किमी प्रति तास असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे वाहन लोकांसाठी उपलब्ध झाल्यास वाहतूक कोंडीपासून सुटका मिळू शकेल. तसेच, नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचण्यात देखील मदत होऊ शकते. ही चाचणी हवेत वाहन चालवण्याच्या स्वप्नांना बळ देत आहे. लवकरच ती ग्राहकांच्या सवेत दाखल होण्याची शक्यता आहे.