Internet Free Messaging App: जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा WhatsApp आता एका नव्या अ‍ॅपसमोर मोठ्या आव्हानात सापडू शकतो. कारण ट्विटर (आता X) चे सहसंस्थापक जॅक डोर्सी बाजारात एक भन्नाट इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येत आहेत. या अ‍ॅपचं नाव आहे “Bitchat” आणि त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे अ‍ॅप इंटरनेटशिवायसुद्धा काम करतं.

कसं वेगळं आहे Bitchat?

Bitchat मेसेजिंगसाठी ब्लूटूथ मेश नेटवर्कचा वापर करतं, म्हणजेच इंटरनेट नसलं तरीही तुम्ही आपल्या मित्र-परिवाराशी जोडलेले राहू शकता. हा कम्युनिकेशनचा एक अनोखा प्रकार आहे, जो हाय-टेक एन्क्रिप्शन अंतर्गत पूर्ण सुरक्षित असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या अ‍ॅपमधून मेसेजेस जवळपास ३०० मीटरच्या परिसरात ट्रान्समिट केले जाऊ शकतात, तर साधारण ब्लूटूथची मर्यादा फक्त १०० मीटर असते.

यात तुम्ही Twitter प्रमाणेच mention टाकू शकता, वेगवेगळ्या टॉपिक-बेस्ड चॅटरूम्स तयार करू शकता आणि आवडलेले मेसेजेस Favourites मध्ये जतनही करू शकता. डोर्सी यांनी याचा Testflight वर्जन Apple युजर्ससाठी आधीच उपलब्ध करून दिलं आहे.

जास्त प्रायव्हसीची हमी

Bitchat इंटरनेटवर अवलंबून नसल्यामुळे तुमच्या डेटाचा गैरवापर होण्याची भीतीच नाही, कारण सर्व्हरवर कोणतीही माहिती साठवली जात नाही. WhatsApp प्रमाणे अ‍ॅड्स, चॅनेल्स किंवा इतर व्यावसायिक अ‍ॅक्टिव्हिटी इथे नाहीत, त्यामुळे युजर्सना खऱ्या अर्थाने प्रायव्हसी मिळेल असं मानलं जातं.

डोर्सींचा पुढचा डाव

डोर्सी सतत नवे प्रयोग करत आहेत. त्यांनी आधी Bluesky नावाचं मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आणलं, तसेच ते Bitcoin आणि Decentralized Technology ला नेहमीच सपोर्ट करत आहेत. आता Bitchat च्या माध्यमातून ते पुन्हा एकदा युजर्सना नवा अनुभव देणार आहेत.

सर्वांसाठी कधी उपलब्ध होणार?

सध्या हे अ‍ॅप बीटा टेस्टिंग स्टेजमध्ये आहे आणि केवळ काही iOS युजर्ससाठी TestFlight वर उपलब्ध आहे. लाँच होताच १०,००० युजर्सची मर्यादा क्षणात पूर्ण झाली.

जॅक डोर्सी यांनी याचे व्हाईटपेपर व बीटा इनवाइट्स X (पूर्वी ट्विटर) वर शेअर केले आहेत. अधिकृत लाँच डेट अद्याप जाहीर झालेली नाही, पण Android व्हर्जनवर काम सुरू आहे.

म्हणजेच, भविष्यात इंटरनेटशिवाय मेसेजिंगचा नवा क्रांतिकारी अध्याय सुरू होणार आहे. व्हॉट्सअॅपसारख्या दिग्गजांना खऱ्या अर्थाने स्पर्धा देणारा हा अ‍ॅप ठरेल का, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे!

काय होणार WhatsApp चं?

WhatsApp सध्या जाहिराती, चॅनेल्स आणि विविध फीचर्समुळे हळूहळू इन्स्टाग्रामसारखं होत चाललं आहे. पण, Bitchat मात्र एकदम वेगळ्या पद्धतीचं, सुरक्षित आणि ऑफलाइन मेसेजिंगचं अनोखं प्लॅटफॉर्म ठरणार आहे.

आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न – Bitchat खरंच WhatsApp ला टक्कर देऊ शकेल का? याचं उत्तर येत्या काही दिवसांत नक्कीच मिळेल!