OpenAI to launch Web Browser : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय – कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानामुळे जगभरातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी उलथापालथ चालू आहे. यामुळे अनेक कंपन्यांच्या कामाची पद्धत बदलली आहे. बरीचशी कामं आता चुटकीसरशी होऊ लागली आहे. त्यामुळे कित्येक कंपन्यांमध्ये नोकरकपात करण्यात आली आहे. दरम्यान, आता ओपनएआय आणखी एक मोठं पाऊल टाकणार आहे. कंपनी एआय-पॉवर्ड ब्राउजर सादर करण्याची तयारी करत आहे. एआय पॉवर्ड ब्राउजर गुगल क्रोमसह इतर इंटरनेट ब्राउजर्सना टक्कर देईल.
जगभरातील ३०० कोटींहून अधिक लोक सध्या गुगल क्रोमचा वापर करत आहेत. हा जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउजर आहे. परंतु, ओपनएआयचा एआय सक्षम ब्राउजर क्रोमसह इतर सर्व वेब ब्राउजर्सपेक्षा अधिक शक्तीशाली असेल असं म्हटलं जात आहे. ओपनएआयचं हे पाऊल इंटरनेट जगताची दिशा बदलू शकतं. जगभरात क्रोमचा दबदबा आहे. ओपनएआय कंपनी हा दबदबा मोडून काढू पाहतेय.
कसा असेल एआय सक्षम ब्राउजर?
ओपनएआय ब्राउझर केवळ वेगवान आणि सुरक्षितच नव्हे तर एआय आधारित सर्च, रिअल-टाइम वेब अॅक्सेस व चॅटजीपीटी इंटीग्रेशनसारख्या फीचर्ससह सुसज्ज असेल. हा ब्राउजर पारंपरिक वेब ब्राउजर्सपेक्षा खूप वेगळा असेल. यामध्ये युजर्सना वेबसाइट अॅक्सेस तर मिळेलच, यासह हा ब्राउझर एका इंटेलिजंट सहाय्यकाप्रमाणे काम करेल. युजर्सना स्मार्ट सजेशन, कॉन्टेंट समरी व क्विक रिझल्ट्स देईल.
ओपनएआयने चॅटजीपीटी व इतर एआय आधारित टूल्सच्या आधी बाजारात स्वतःची ओळख बनवली आहे. आता कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एआयच्या फीचर्ससह ब्राउजर सादर करण्याची तयारी करत आहे. या ब्राउजरमध्ये चॅटजीपीटीसारख्या एआयच्या क्षमता इंटीग्रेट केल्या जातील. तुम्ही कुठलीही वेबसाइट ओपन करण्याआधी एआयला प्रश्न विचारून माहिती घेऊ शकता. हा पर्याय गुगल सर्चप्रमाणेच काम करेल. तसेच युजर्सना त्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरं मिळतील.
वेळेची बचत होणार
हा वेब ब्राउजर युजर्सना कोणत्याही वेब पेजची समरी (Summary) देण्यास सक्षम असेल. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं न्यूज आर्टीकल (बातमी) ओपन केली. एआय लगेच तुम्हाला त्या वेबपेजवरील माहितीची समरी (सारांश) प्रदान करेल. त्यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल. तुम्हाला संपूर्ण बातमी वाचत बसावं लागणार नाही.