Geoffrey Hinton On AI : जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ते(AI) चा वापर झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. एआयच्या वाढत्या वापराबाबत अनेकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केल्या आहेत. पण जेव्हा स्वतः एआयचे गॉडफादर मानला जाणारा व्यक्ती याबद्दल इशारा देतो, तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. एक मोठे कंप्युटर शस्त्रज्ञ जेफ्री हिंटन (Geoffrey Hinton) यांनी भविष्यातील एआय चॅटबॉट्सना कशा प्रकारे प्रशिक्षित करणे आवश्यक आहे याबद्दल मत व्यक्त केले आहे. त्यांनी भविष्यातील प्रगत एआय प्रणाली मातृत्व भावनेसह डिझाइन केल्या गेल्या पाहिजेत असे सुचवले आहे. असा सल्ला देण्यामागे त्यांचा नेमका विचार काय आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
लास वेगास येथील Ai4 परिषदेत बोलताना हिंटन यांनी नियंत्रण आणि दडपशाही याच्यामध्यमातून एआयवर वर्चस्व टिकवून ठेवण्याचे धोरण फेटाळून लावले. एआयची प्रगती ज्या वेगाने होत आहे ती पाहता ही रणनिती कुचकामी आहे असा युक्तीवाद त्यांनी केला. याच्या एवजी त्यांनी नवीन संकल्पना सादर केली, त्यांनी सुचवले की मानव-एआय संबंध हे आई आणि तिचे मुल यांच्या धर्तीवर असले पाहिजेत.
“योग्य मॉडल आहे ज्याचे आपल्याकडे एकमेव उदाहरण आहे ज्यामध्ये एक कमी बुद्धिमान गोष्ट अधिक बुद्धिमान गोष्टीवर नियंत्रण ठेवते, ते म्हणजे आई जी तिच्या मुलाकडून नियंत्रित केली जाते.” असे हिंटन म्हणाले. “जर ते माझे पालनपोषण करणार नसेल, तर ते माझी जागा घेईल,”असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
यामध्ये संकल्पना अशी आहे की, जसे एक मूल ज्याची बुद्धिमत्ता मर्यादित आहे, ते त्याच्या अधिक बुद्धिमान आईकडून मार्गदर्शन आणि काळजी करवून घेऊ शकते, त्याचप्रमाणे मानवतेची काळजी एका अतिबुद्धिमान एआयकडून घेतली जाऊ शकते.
मानवांसाठी तंत्रज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी हिंटन यांनी सुचवले की मानवतेने पूर्णपणे एआयला स्मार्ट बनवण्यावर लक्ष दिले पाहिजे याबरोबरच एआयला ‘मातृत्वाची वृत्ती (maternal instinct)’ दिली पाहिजे, जेणेकरून ते “खऱ्या अर्थाने आपल्याबद्दल, त्यांच्या मुलांची काळजी करेल,” असेही ते म्हणाले.
हिंटन यांनी युक्तीवाद केला की आपल्याला एआय असिस्टंट पेक्षा एआय मदर्सची गरज आहे. त्यांनी आधी दिलेल्या उदाहरणाचा संदर्भ देत हिंटन म्हणाले की “एका असिस्टंटला तुम्ही कामावरून काढू शकता. सुदैवाने, तुम्ही तुमच्या आईला कामावरून काढू शकत नाहीत.”