Who is Rishabh Agarwal: कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असल्यामुळे सर्वच टेक कंपन्या आता यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटानेही त्यांच्या सुपरइंटेलिजेंस लॅबसाठी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांनी या प्रकल्पासाठी घेतलेले कर्मचारी मात्र त्यांना सोडून जात आहेत. मार्क झकरबर्गची मालकी असलेल्या मेटाने दहा लाख डॉलर्स (भारतीय रुपयांत अंदाजे ८ कोटी रुपये) इतका भरभक्कम पगार देऊन ऋषभ अग्रवाल या एआय संशोधकाला घेतले होते. मात्र ऋषभ अग्रवालने केवळ पाचच महिन्यात नोकरीला राम राम ठोकला आहे.
ऋषभ अग्रवाल यावर्षी एप्रिल महिन्यात मेटामध्ये नोकरीला लागला होता. मात्र केवळ पाचच महिन्यात त्याने नोकरीला राजीनामा देत असल्याचे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यापुढे वेगळ्या पद्धतीची जोखीम उचलण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले.
मेटा सुपरइंटेलिजेंस अर्थात एमएसएलमधून बाहेर पडण्याचे कारण विशद करताना अग्रवालने म्हटले, “एमएसएल मधील हा माझा शेवटचा आठवडा आहे. सुपरइंटेलिजेंस लॅबमधून बाहेर पडणे हा माझ्यासाठी कठीण निर्णय होता. परंतु गुगल ब्रेन, डीपमाईंड आणि मेटामध्ये एकूण ७.५ वर्ष काम केल्यानंतर आता मला वेगळ्या प्रकारची जोखीम पत्करण्याची ओढ वाटत आहे.”

ऋषभ अग्रवालने मेटातून बाहेर पडल्याचे जाहीर केले असले तरी त्याच्या पुढील योजनांची माहिती दिलेली नाही. गेल्या काही काळात मेटाच्या लॅबमधून बाहेर पडणारा ऋषभ एकमेव संशोधक नाही. वायर्डने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच किमान तीन संशोधकांनी लॅबला राम राम ठोकला. त्यापैकी दोघेजण ओपनएआयमध्ये परतले आहेत.
यापैकी एक आहे अवी वर्मा. जो मेटामध्ये येण्यापूर्वी ओपनएआयम्ये होता. दुसरा संशोधक आहे इथन नाईट. हाही पूर्वी ओपनएआयमध्ये काम करत होता. त्यालाही ओपनएआयने पुन्हा मोठे पॅकेज देऊन घेतले आहे.
ऋषभ अग्रवाल कोण आहे?
ऋषभ अग्रवाल हा मुंबई आयआयटीचा माजी विद्यार्थी असून तो एआय संशोधक आहे. आयआयटीमध्ये त्याने संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचा अभ्यास केला होता. यानंतर कॅनडातील मिला-क्यूबेक आर्टिफिशियल इंजेलिजेंस इन्स्टिट्यूटमधून त्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये पीएचडी केली.
ऋषभने सावन्सच्या सर्च आणि अल्गोरिदम विभागात इंटर्न म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर टॉवर रिसर्च कॅपिटलच्या अल्गोरिदम ट्रेडिंग विभागात इंटर्नशिप केली.
जून २०१८ साली तो गुगल ब्रेनमध्ये वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाला. याठिकाणी त्याने पाच वर्षे काम केले. त्यानंतर त्याने गुगलच्या डीपमाइंडसाठी दोन वर्ष काम केले. यावर्षी एप्रिल महिन्यात तो मेटाच्या सुपरइंटेलिजेंस लॅब्समध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागला होता.