ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ॲमेझॉनने या वर्षी सलग दुसऱ्यांदा कर्मचारीकपातीची मोठी घोषणा केली. पुढील काही आठवड्यांत आणखी नऊ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचे कंपनीने सोमवारी (दि. २० मार्च) सांगितले. यामुळे वर्ष २०२३ मध्ये एकूण कर्मचारीकपातीची संख्या २७ हजारांवर पोहोचली आहे.

ॲमेझॉनच्या कर्मचारीकपातीच्या निर्णयामुळे युनायटेड स्टेट्समधील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. मेटा, ॲमेझॉन आणि गुगलसारख्या मातब्बर कंपन्यांनी मागच्या दशकात अतिशय वेगाने प्रगती साधली होती. पण आता या कंपन्या डळमळायला लागल्या आहेत. तंत्रज्ञान कंपन्या ज्या बँकेशी व्यवहार करायच्या ती सिलिकॉन व्हॅली बँकदेखील (SVB) काही दिवसांपूर्वी पत सांभाळू न शकल्यामुळे कोसळली. जागतिक स्तरावरील या गळतीचा प्रभाव भारतालादेखील जाणवणार आहे. एसव्हीबी बँक कोसळल्यामुळे भारतातील टेक स्टार्टअप क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. त्याची परिणती कामगारकपातीमध्ये होताना दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

ॲमेझॉनने पुन्हा कामगारकपात का केली?

ॲमेझॉनचे सीईओ अँडी जेसी (Andy Jassy) यांनी कर्मचाऱ्यांना एक मेमो पाठवून, कंपनी दुसऱ्या टप्प्यातील वार्षिक नियोजन करत असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. यामुळे आणखी काही नोकरकपात करावी लागणार आहे. तसेच काही मोक्याच्या विभागांत पुन्हा नवी नोकरभरतीदेखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी जानेवारी महिन्यातच ॲमेझॉनने जगभरातील १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी नोकरकपात ठरली.

आता नवीन नोकरकपातीचा परिणाम कंपनीच्या नफ्यावरदेखील होऊ शकतो. क्लाऊड कम्पुटिंग विभाग AWS आणि जाहिरात व्यवसायाशी निगडित विभागातील कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे. जेसी यांनी आपल्या मेमोमध्ये लिहिले आहे, “अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत आहे. ही अनिश्चितता येणाऱ्या काही वेळेत नक्कीच दूर होईल. त्यामुळे खर्च आणि पगार यांचा ताळमेळ साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”

“काही लोक विचारतात की, महिन्यापूर्वी जेव्हा पहिली नोकरकपात केली होती, तेव्हा ही भूमिका का जाहीर केली नाही? याचे उत्तर असे की, आमच्या सर्व विभागांनी त्यांच्या टीमचे विश्लेषण केले नव्हते. योग्य खबरदारी घेऊन मूल्यांकन न करता हा निर्णय घेणे योग्य नव्हते. आता हा निर्णय आम्ही सर्वांना कळविण्याचे ठरविले असून पुढील माहिती लवकरात लवकर कळविली जाईल,” असेही जेसी यांनी मेमोत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर व्हर्जिनीयामधील कंपनीच्या मुख्यालयाचे बांधकाम थांबविण्यात आले होते. मात्र तरीदेखील या वर्षी जून महिन्यात आठ हजार कर्मचाऱ्यांसह या मुख्यालयाचा पहिला टप्पा कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

टेक कंपन्यांसाठी संकटाचा काळ

मेटा कंपनीने आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ॲमेझॉनने हा निर्णय घेतला आहे. खालावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे संपूर्ण अमेरिकेतील कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत आहेत. वॉल स्ट्रिटवरील गोल्डमॅन सॅच्स, मॉर्गन स्टॅन्ली अशा मोठ्या बँका आणि गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या विशाल टेक कंपन्यांनीदेखील हजारोंच्या संख्येने नोकरकपात केली आहे.

महिन्याच्या सुरुवातीला, सिलिकॉन व्हॅली बँक कोसळली. स्टार्टअप सुरू करणारे नवउद्योजक तरुण या बँकेशी व्यवहार करत असत. यामुळे आगामी काळातील उद्यमशीलतेसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. पिन्टरेस्ट (Pinterest) आणि शॉपिफाय (Shopify) यांसारख्या कंपन्यांची मोठी रक्कम या बँकेत असल्यामुळे त्यांच्यावरदेखील गहिरे संकट घोंघावत आहे.

भारतालाही याचे हादरे बसणार

जागतिक स्तरावरील या मोठ्या कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद भारतातदेखील उमटणार आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यामुळे भारतीय स्टार्टअपवर मोठा परिणाम होणार आहे. रोकड उपलब्ध झाली नाही तर त्यांना आपला व्यवसाय थांबवावा किंवा बंद करावा लागू शकतो.

मोठ्या टेक कंपन्या आणि स्टार्टअपव्यतिरिक्त, तंत्रज्ञानाशी निगडित इतर कंपन्यांना सध्याच्या डगमगलेल्या अर्थव्यवस्थेशी जुळवून घ्यावे लागणार आहे. मागच्याच महिन्यात विप्रोने नवी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली होती. ज्या कर्मचाऱ्यांना वार्षिक ६.५ लाखांचे पॅकेज मिळाले होते, त्यांना वार्षिक ३.५ लाख पॅकेजवर काम करण्यास सांगितले गेले. इतर क्षेत्रातील मंदीचा स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास इतर उद्योग क्षेत्रालाही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Story img Loader