गेल्या वर्षभरात स्मार्टफोनने बराच पल्ला गाठला आहे. प्रथम त्याचा स्क्रीन आकाराने मोठा होत गेला. तेव्हा सुरुवातीस अनेकांनी प्रश्न केला की, एवढा मोठा स्क्रीन असलेला फोन हातात कसा पकडणार? पण त्याच वेळेस बाजारात मोठय़ा प्रमाणावर आलेल्या टॅब्लेट्सची भुरळ बहुधा ग्राहकांना पडलेली असावी. शिवाय आकाराने काहीशा मोठय़ा असलेल्या त्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ई-मेल वाचणे, फेसबुक पाहणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटो आणि व्हिडीओ पाहणे याची मजा काही औरच होती, असेही सर्वाच्या लक्षात आले होते. अखेरीस तो मोठय़ा आकाराचा स्क्रीन बाजारपेठेत स्थिरावला. अर्थात त्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सॅमसंगसारख्या बडय़ा कंपन्यांनी त्यांच्या अतिमहागडय़ा स्मार्टफोन्ससाठी ईएमआयच्या माध्यमातून बाजारपेठ खुली केली.
सध्या बाजारपेठेत चर्चा सुरू आहे ती म्हणजे नवे काय? भविष्यातील स्मार्टफोन कसा असणार? खरे तर अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीच त्या संदर्भातील आडाखे व्यक्त झाले होते. त्यात भविष्यातील स्मार्टफोन प्रोजेक्टर फोन असेल असे म्हटले होते. ही संकल्पना जाहीर झाली, त्या वेळेस बाजारपेठेत त्या फोनबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले होते. त्यानंतर काही कालखंडाने सॅमसंगने बीम नावाचे त्यांचे उत्पादन बाजारात आणलेदेखील. मात्र त्याला म्हणावे तसे यश आले नाही. शिवाय आणखी दोन-तीन कंपन्यांनी प्रोजेक्टर फोन बाजारात आणले, पण ग्राहकांना ते भावलेच नाहीत. अखेरीस ग्राहकांनी पाठ फिरकल्यामुळे हे उत्पादन बाद झाल्यातच जमा होते. सॅमसंग बीमची किंमत साधारणपणे ३० हजार रुपयांच्या घरात होती. त्याच्या अपयशानंतर सॅमसंगने त्यांचे लक्ष गॅलेक्सी मालिकेतील मोठय़ा स्क्रीनच्या स्मार्टफोन्सवर केंद्रित केले.
आजवर केवळ संगणकाधारित उत्पादनांशी संबंधित असलेल्या आयबॉल या कंपनीने प्रथम आयबॉल अँडी या फोनच्या माध्यमातून बाजारपेठेत प्रवेश केला. त्यानंतर अँडी कोबाल्टच्या माध्यमातून त्यांनी बाजारपेठेत चांगलेच पाय रोवले आणि आता आयबॉल अँडी प्रोजेक्टर फोन ४एच्या माध्यमातून एक नवे उत्पादन बाजारपेठेत आणले आहे.
प्रोजेक्टर फोन असे म्हटले की, असे वाटते हा आकाराने जाडा असलेला असा फोन असणार, पण प्रत्यक्षात तो केवळ यापूर्वीच्या आयबॉल अँडीपेक्षा चार मिलिमीटरनेच अधिक जाडा आहे. अर्थात त्याचे वजनही थोडे वाढले आहे, मात्र ते जाणवण्याइतके नाही. एकुणात हा स्मार्ट प्रोजेक्टर फोन तसा आटोपशीर आकाराचा आहे. दिसायलाही तो नेहमीच्या स्मार्टफोनप्रमाणेच दिसतो.
या स्मार्टफोनचा स्क्रीन ४ इंचांचा असून तो आयपीएस प्रकारात मोडणारा आहे. त्यामुळे कोणत्याही कोनातून पाहिले तरी चित्र सुस्पष्ट व व्यवस्थित दिसते. हा डब्लूव्हीजीए स्क्रीन ८०० गुणिले ४८० पिक्सेल्स या रिझोल्यूशनचा आहे, तर त्याची पिक्सेल घनता ही २३३.२४ पीपीआय एवढी आहे.
या फोनसाठी १ गिगाहर्टझ्चा डय़ुएल कोअर कोर्टेक्स ए ९ हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यामुळे नियमित वापरादरम्यान फोन व्यवस्थित आणि चांगल्या वेगात काम करतो. प्रोजेक्टर सुरू असतानाही कामात कोणतेही अडथळे येत नाहीत किंवा तो कमी वेगातही काम करत नाही. त्याचा चांगला वेग कायम राहतो, ही जमेची बाजू आहे. एकाच वेळेस अनेक अॅप्स सुरू केल्यानंतरही त्याच्या वेगात फरक पडत नाही.
या फोनसाठी अँड्रॉइडची जेली बीन ४.१.१ ही नवीन आवृत्ती वापरण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये अपडेटची सोय दिसत नाही. अँडीच्या या नव्या आवृत्तीमध्ये डॉक्युमेंटस टू गो, व्हॉटस्अॅप, फेसबुक आदी काही महत्त्वाची अॅप्स प्रीलोडेड स्वरूपात देण्यात आली आहेत.
या फोनसोबत मिळणाऱ्या उपकरणांमध्ये ट्रायपॉड स्टॅण्डचाही समावेश आहे. त्यामुळे प्रोजेक्टरची सुविधा वापरताना त्याचा फायदा होतो. अलीकडे आयबॉलने त्यांच्या अनेक उत्पादनांसोबत फ्लिप कव्हरही देण्यास सुरुवात केली आहे. मात्र या फोनसोबत ते कव्हर दिलेले नाही.
या फोनमध्ये ब्लूटूथ ए२डीपी व ३ एचएसयूपीए, थ्रीजी, वाय-फाय आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवाय यामध्ये जीपीएस असल्याने गुगल मॅप्सचा वापर करणेही सहज शक्य आहे.
प्रोजेक्टर
या फोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोजेक्टर. त्यामुळेच हा फोन प्रोजेक्टर फोन म्हणून ओळखला जातो. साधारणपणे फोनच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूस तीन बटनांची सोय देण्यात येते. त्यातील होम बटन वगळता इतर दोन टच पद्धतींवर काम करतात. या फोनमध्ये त्याच ठिकाणी स्क्रीनच्या खालच्या बाजूस तीनऐवजी चार बटनांची सोय देण्यात आली आहे. त्यातील चौथे बटन टच पद्धतीचे असून ते केवळ प्रोजेक्टरसाठी आहे. त्यावर दोन मिनिटे बोट ठेवून दिले की, प्रोजेक्टर सुरू होतो आणि याच पद्धतीने बंदही होतो. फोनच्या सर्वात वरच्या बाजूला उजवीकडे ऑन-ऑफ बटन आहे, तर डावीकडे प्रोजेक्टरची लेन्स आहे. त्यामुळे प्रोजेक्टर म्हणून वापरताना हॅण्डसेट आडवा जमिनीला समांतर असा पकडावा लागतो. फार काळ हातात स्थिर धरता येणार नाही हे लक्षात घेऊन सोबत एक ट्रायपॉडही देण्यात आला आहे. मात्र हा तितकासा समाधानकारक वाटला नाही.
या प्रोजेक्टरचा वापर १० फूट अंतरापर्यंत केला जाऊ शकतो, तर त्याची प्रोजेक्शन क्षमता १० गुणिले ८ फूट एवढी आहे. शिवाय हा ३५ ल्युमेन्स क्षमतेचा आहे, त्यामुळे जे चित्रण पाहायचे ते अधिक उजळ असणे आवश्यक आहे. सध्या बाजारात असलेला कोणताच फोन ३५ ल्युमेन्स क्षमतेचा नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या फोनमध्ये हा सर्वात चांगली क्षमता असलेला फोन आहे. फोनच्याच डाव्या बाजूला एक लहानशी गोल चकती असून तिचा वापर स्क्रीनच्या फोकसिंगकरिता केला जाऊ शकतो. यावर ७२०पीचे व्हिडीओ व्यवस्थित पाहता आले. १०८० पीचे व्हिडीओ पाहण्यासाठी मात्र तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमधून इतर प्लेअर्स डाऊनलोड करावे लागतात. घरगुती पाहण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. एरवी फोनचा महत्त्वाचा वापर म्हणजे फोन करणे आणि संदेश पाठविणे. या दोन्ही गोष्टी यामध्ये चांगल्या पद्धतीने करता येतात. फोनचे सिग्नल रिसेप्शनही चांगले आहे. आवाजाची गुणवत्ताही चांगली आहे. आयबॉलने यापूर्वीच्या मॉडेलमध्ये दिलेला कॅमेरा आणि या मॉडेलमधील ८ मेगापिक्सेलचा मागचा कॅमेरा याच्या चित्रणामध्ये फारसा फरक नाही. सूर्यप्रकाशातील फोटो चांगले येतात. प्रकाश नसताना मात्र थोडा फरक पडतोच. या फोनची इंटर्नल मेमरी ४ जीबीची असून त्यातील २ जीबी ही यूजर फाइल्ससाठी आहे, तर एक्स्टर्नल मेमरी तब्बल ३२ जीबीपर्यंत एसडी कार्डाच्या माध्यमातून वाढविता येण्याची सोय आहे. याची बॅटरी १५०० एमएएच क्षमतेची आहे. एरवी ही बॅटरी तुम्हाला थ्रीजी सुरू असताना सलग १०-१२ तास वापरता येऊ शकते, पण प्रोजेक्टर सुरू केल्यानंतर ती फार तर अडीच तासच तग धरू शकते आणि नंतर पुन्हा चार्जिगला लावावी लागते. याची बॅटरी क्षमता वाढली तर ते अधिक उपयुक्त ठरू शकेल.
आयबॉल अँडी ४ ए प्रोजेक्टर तांत्रिक माहिती
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
आयबॉल अँडी ४ए
गेल्या वर्षभरात स्मार्टफोनने बराच पल्ला गाठला आहे. प्रथम त्याचा स्क्रीन आकाराने मोठा होत गेला.

First published on: 20-09-2013 at 09:27 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I ball andy 4a