ग्रॅण्ड थेफ्ट सिटी, आयजीआय यांसारख्या गेम्सनी ‘इंटरअ‍ॅक्टिव्ह गेमिंग’चे विश्व विस्तारत नेले. आजघडीला इंटरअ‍ॅक्टिव्ह गेमिंग, ऑनलाइन गेमिंग यांच्या जोडीला स्मार्टफोनवर खेळता येण्यासारखे मोशन सेन्सर गेम्स अशा विविध प्रकारचे हजारो गेम्स उपलब्ध आहेत. याशिवाय संगणकीय तंत्रज्ञानाचाच वापर करून विकसित केलेले ‘एक्सबॉक्स’, ‘प्लेस्टेशन’ यांसारख्या ‘गेमिंग कन्सोल’बद्दल कमालीचे आकर्षण आहे; पण या साऱ्यांना मागे सोडून खेळणाऱ्याला वेगळय़ाच दुनियेत नेणाऱ्या ‘व्हच्र्युअल गेमिंग’ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. येत्या काळात येऊ घातलेल्या ‘व्हच्र्युअल गेमिंग’ क्षेत्रातील उपकरणांकडे पाहिल्यास भविष्यात ‘गेमिंग’ कुठे असेल, याची कल्पना करणे खरोखरच कठीण आहे.
‘व्हच्र्युअल गेमिंग’ची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. ‘व्हच्र्युअल’ अर्थात आभासी खेळ ही संकल्पना तर त्याही आधीपासूनची आहे. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांला थेट खेळाच्या पटावर नेऊन उभे करते. म्हणजे, एखादा ‘अ‍ॅक्शन’ गेम असेल तर तो खेळणाऱ्याच्या भोवती त्या गेमचे आभासी चित्र उभे राहते. मग तो धावतो, लपतो, गोळीबार करतो, हल्ला चुकवतो, अन्य खेळाडूंशी संवाद साधतो.. या यादीला मर्यादा नाही.
आभासी खेळाचे हे जग गेल्या दोन वर्षांपासून वास्तवात येत असल्याचे चित्र होते. मोठमोठय़ा टीव्ही स्क्रीनसमोरील प्लॅटफॉर्मवर उभे राहून हातातील दंडुक्यानिशी (स्टिक) हालचाली करून खेळण्याची मजा आपल्याला मोठमोठय़ा इलेक्ट्रॉनिक स्टोअर्समध्ये अनुभवता येते. ही उपकरणे महाग असली तरी त्यातून मिळणारा आनंद आणि खेळातला थरार प्रत्यक्ष शरीरात झिरपत असल्याचा अनुभव अनेकांना या किमतीपेक्षाही मोलाचा वाटतो. म्हणून तो खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हाताच्या बोटांना जोडलेले छोटे सेन्सर किंवा सेन्सरयुक्त जॅकेट किंवा सेन्सर असलेले बूट अशा उपकरणानिशी पडद्यावरील गेममध्ये प्रत्यक्ष उतरता येते. असे गेम्स गेल्या दोनेक वर्षांपासून उपलब्ध आहेत. मात्र, आता याही पुढे नेणाऱ्या ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ अर्थात ‘व्हीआर हेडसेट’ना आता मूर्तस्वरूप येऊ लागले आहे.

‘व्हीआर हेडसेट’ हे उपकरण एखाद्या गॉगलसारखे डोळय़ांवर चढवायचे असते. ते डोळय़ांवर चढवले की भोवतालचे वास्तव जग दिसेनासे होते आणि गेमच्या आभासी जगात प्रवेश होतो. आसपासचा आवाज ऐकू येईनासा होतो आणि गेमच्या जगातील सूक्ष्म आवाज कानाच्या पडद्यांवर आदळू लागतात. एकूणच भोवतालच्या जगाशी मानवाचा संपर्क ठेवणाऱ्या डोळे आणि कान या इंद्रियांना हे उपकरण व्यापते आणि आपण नकळत आभासी विश्वात शिरतो.
बऱ्याच काळापासून असे ‘व्हीआर हेडसेट’ येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता प्रत्यक्षात ‘ऑक्युलस रिफ्ट’च्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे. नाही म्हणायला, गुगलने ‘कार्डबोर्ड’सारख्या सुविधेच्या माध्यमातून ‘व्हच्र्युअल हेडसेट’च्या क्षेत्रात चंचुप्रवेश केला आहे. मात्र, हे उपकरण प्रत्येकाला स्वत:च बनवावे लागते. याउलट ‘ऑक्युलस रिफ्ट’ हे तयार उपकरण आहे. या उपकरणात ‘हेडसेट’सोबतच गेम हाताळण्यासाठी दोन उपकरणेही पुरवण्यात आली आहेत. यामध्ये एका हातातील उपकरणानिशी प्रत्यक्ष गेम खेळायचा असतो, तर दुसऱ्या उपकरणानिशी ‘एक्स्बॉक्स’ हे गेमिंग कन्सोल हाताळता येते. ऑक्युलस रिफ्ट बाजारात कधी येणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, तसेच त्याची किंमत काय असेल, हेही सांगण्यात आलेले नाही, मात्र हे उपकरण गेमिंग जगात नवीन क्रांती घडवेल, अशी चर्चा आहे.

सॅमसंगने आपल्या ‘गॅलक्सी एस६’साठी अशा प्रकारचे उपकरण विकसित केले आहे. ते सध्या अमेरिकेपुरतेच मर्यादित आहे. या उपकरणानिशी ‘गॅलक्सी एस६’वर ‘व्हच्र्युअल गेमिंग’चा आनंद घेता येतो. शिवाय, कोणतेही छायाचित्र किंवा व्हिडीओला ‘थ्रीडी’मध्ये पाहण्याची सुविधाही या उपकरणामुळे मिळते. अर्थात या उपकरणासोबत ‘कंट्रोलर’ नसल्याने ‘एस६’वर ‘टच’ करूनच तो खेळता येतो.

याशिवाय, ‘एचटीसी’ कंपनीचा ‘व्हाइव्ह’ हा ‘व्हीआर हेडसेट’ही सध्या चर्चेत आहे. ‘स्टीम’ या संगणकीय गेम क्षेत्रातील अग्रेसर कंपनीसोबत ‘एचटीसी’ने ‘व्हाइव्ह’ विकसित केले आहे. ‘व्हाइव्ह’ संगणकाशी जोडून ‘व्हच्र्युअल गेम्स’चा आनंद घेता येतो. ‘प्लेस्टेशन’च्या ‘प्रोजेक्ट मॉर्फेअस’चाही सध्या बोलबाला आहे. ‘प्लेस्टेशन’च्या प्लॅटफॉर्मवर खेळता येणारे हे उपकरण पुढील वर्षी बाजारात येईल.
‘गेमिंग’ला सध्या चांगले दिवस आहेत. संगणक, कन्सोल किंवा स्मार्टफोन यापैकी कोणत्याही उपकरणावर गेम्स खेळणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. विशेषत: शालेय किंवा किशोरवयीन मुलांमध्ये असे गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे त्यांचे पालक चिंताही व्यक्त करत आहेत. आसपासच्या परिसरात घटत चाललेली मैदानांची संख्या मैदानी खेळांपासून मुलांना दुरावत नेत आहे. अशा वेळी संगणकीय ‘गेम्स’च्या अमर्याद विश्वात
त्यांना मोकळेपणा मिळत आहे. अशातच आता ‘व्हच्र्युअल गेमिंग’ही संकल्पना मूर्तस्वरूपात येऊ घातली आहे. तसे झाल्यास खेळ हा ‘आभासी’च उरेल की काय, असा प्रश्नही सतावतोच.
asif.bagwan@expressindia.com