रिलायन्स जिओच्या ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मोफत इंटरनेट डेटा वापरायला मिळत असल्याने त्यांची सध्या तरी धम्माल आहे. पण ३१ डिसेंबरला जिओची वेलकम ऑफर संपल्याने ग्राहकांना दिवसाला १ जीबी फोर जी डेटाच वापरता येत आहे. पण ग्राहकांना निराश होण्याची गरज नाही. इंटरनेटचा पूरेपूर वापर करणाऱ्यांसाठी रिलायन्स जिओने बुस्टर पॅकची ऑफर देऊ केली आहे. हॅप्पी न्यू इयर ऑफरनुसार, दिवसाला १ जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतर १२८ केबीपीएसच्या वेगाने डेटाचा वापर करता येणार आहे. पण हो, त्यासाठी तुम्हाला काही पैसैही मोजावे लागणार आहेत.

दिवसाला एक जीबीपेक्षा अधिक डेटा वापरणाऱ्या ग्राहकासाठी रिलायन्स जिओने ही बुस्टर पॅक ऑफर देऊ केली आहे. त्यानुसार, ५१ रुपये मोजून दिवसाला एक जीबी फोर जी अतिरिक्त डेटा वापरू शकतात. तर ३०१ रुपयांत ६ जीबी फोरजी अतिरिक्त डेटा वापरू शकतात. हा डेटा तुम्ही २८ दिवस वापरू शकता.

रिलायन्स जिओने आंतरराष्ट्रीय कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठीही आयएसडी कॉम्बो पॅकची घोषणा केली आहे. त्यानुसार, ग्राहकांना ५०१ रुपयांचा रिचार्ज करून विदेशी कॉल करण्यासाठी ४३५ रुपयांचा बॅलेन्स मिळेल. त्याची वैधता २८ दिवसांची आहे. तसेच सध्या जिओकडून दिवसाला १०० एसएमएस पाठवण्यासाठी ग्राहकाकडून पैसै आकारले जात नाहीत. पण ज्यांना १०० पेक्षा जादा एसएमएस पाठवायचे आहेत, त्यांच्यासाठीही ऑफर देऊ केली आहे. त्यासाठी ग्राहकांना २० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. यात त्यांना १७५ एसएमएस पाठवता येणार आहेत. या बॅलेन्समधून प्रत्येक राष्ट्रीय एसएमएससाठी ८५ पैसे , तर आंतरराष्ट्रीय एसएमएससाठी ५ रुपये आकारले जातील.

बुस्टर पॅक घेण्यासाठी काय कराल?

बुस्टर पॅक घेण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये मायजिओ अॅप डाऊनलोड करावा लागेल. जिओ आयडीवरून अॅप लॉग-इन केल्यानंतर रिचार्ज ऑप्शनवर जा. त्यावर ब्राऊज प्लॅन सेक्शनमध्ये बुस्टर टॅब मिळेल. तिथे तुम्ही आवश्यक प्लॅन निवडू शकता आणि जिओमनी किंवा इतर बँकींग पर्यायाद्वारे पेमेंट करून प्लॅन घेऊ शकता.