News Flash

टेक्नॉलॉजीचा कुंभमेळा

अद्भूत, अद्वितीय, अचाट, अभूतपूर्व. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये भरलेल्या ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’चं (सीईएस) मोजक्या विशेषणांत वर्णन करायचं झालं

| January 11, 2014 04:17 am

अद्भूत, अद्वितीय, अचाट, अभूतपूर्व. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये भरलेल्या ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’चं (सीईएस) मोजक्या विशेषणांत वर्णन करायचं झालं तर हे चार शब्दही तोकडे पडतील. आजघडीला जगातील सर्वात वेगवान अशी गोष्ट असलेल्या टेक्नॉलॉजीचा हा कुंभमेळा गेली ४७ वष्रे भरत आहे. पण प्रत्येक वेळी या प्रदर्शनात जे पहायला मिळतं ते आधी कधीही, कुठेही पाहिलेलं नसतं, हे नक्की.उत्तर ध्रुवावरून आलेल्या अतिथंड वाऱ्यांनी अमेरिकेतील ५० राज्यांना गोठून टाकले असताना दक्षिणेकडील नेवाडा प्रांतातील लास वेगास शहरात मात्र गेले तीन दिवस हवा चांगलीच तापली आहे. लास वेगासमधील १९ लाख चौरस फूट जागेवर भरवण्यात आलेलं ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो’ हे तंत्रज्ञान प्रदर्शन त्याचं कारण आहे. अनेक प्रोग्रॅम्स हाताळू शकणाऱ्या एका सुक्ष्म कम्प्युटर चीपपासून १०५ इंचाच्या टीव्हीपर्यंत तब्बल ३२१० उपकरणे/ संशोधनांचे प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. ७ ते १० जानेवारीपर्यंत भरलेलं हे प्रदर्शन म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनव्या कल्पना व आविष्कारांचा जागतिक कुंभमेळाच आहे.
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी भरवण्यात येणारं हे प्रदर्शन म्हणजे येत्या काळातील तंत्रज्ञानाची चाहूल करून देणारं व्यासपीठ आहे. सर्वसामान्य जनतेला या प्रदर्शनात प्रवेश नसतो. पण देशविदेशातील टेक्नॉलॉजी कंपन्या, तज्ज्ञ, नामवंत मंडळी आणि पत्रकार यांची येथे जत्राच भरते. यावर्षी या प्रदर्शनासाठी तब्बल दीड लाख जणांनी नोंदणी केली. यावरून या प्रदर्शनाची लोकप्रियता लक्षात येईल. पण या प्रदर्शनात काय आहे, यावर नजर टाकल्यास दीड लाख प्रेक्षक हा आकडा नगण्य वाटेल.
येत्या काळात वाढत जाणाऱ्या ‘वेअरेबल गॅझेट्स’ची यंदाच्या प्रदर्शनात जोरदार चर्चा आहे. याबरोबर टॅब्लेट, लॅपटॉप, स्मार्टफोन, कम्प्युटर यांच्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानेही हे प्रदर्शन व्यापलं आहे. पण टीव्ही, म्युझिक सिस्टिम, फ्रीज, घरगुती उपकरणे अशा परंपरागत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही नाविन्य पहायला मिळतं. ही सगळी वर्गवारी जुनी असली तरी ‘सीईएस’मध्ये आपण हे नवंच पाहतोय, असं जाणवू लागतं. यासोबतच काही अचाट कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन बनवलेली तंत्रसाधनेही यंदा भरपूर आढळतात. येत्या काळात सर्वसामान्यांच्या हातात येणारं तंत्रज्ञान कसं असेल, काय असेल हे या प्रदर्शनातून समजतं. यातली सगळीच संशोधन बाजारात येतात, असं नाही. पण क्षणाक्षणाला नाविन्यतेचा शोध घेणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही संशोधनं म्हणजे नवीन वाट असते. अशाच काही संशोधनांविषयी :
डोळे हे पासवर्ड गडे.
आयलॉक या कंपनीने प्रदर्शनात मांडलेले मायरिज (८१२) तंत्रज्ञान म्हणजे भविष्यातील तुमच्या ईमेल किंवा बँक अकाउंटचा पासवर्ड ठरवणारे उपकरण ठरू शकते. डोळय़ांच्या बुबुळांच्या केंद्राकडून काठापर्यंत वर्तुळाकार पसरलेल्या रेषा म्हणजे ‘आयरिज’ या प्रत्येक व्यक्तिच्या वेगवेगळय़ा असतात. त्यामुळे ‘आयरिज’ हे एखाद्या व्यक्तिची ओळख पटवून देण्यासाठी चांगला पासवर्ड ठरू शकतो. हीच कल्पना केंद्रस्थानी ठेवून आयलॉकने मायरिज आणले आहे. माउसच्या आकारातील हे उपकरण यूएसबीने संगणकाला जोडावे लागते. त्यानंतर कोणत्याही वेबसाइटवर तुम्ही लॉग इन करतेवेळेस या उपकरणातील सेन्सरमध्ये पहायचे. बस्स! तुम्ही तुमच्या अकाउंटवर लॉग इन होता. हे बायोमेट्रिक तंत्रज्ञान हातांच्या ठशांपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे उपकरण येत्या जूनपर्यंत बाजारात येणार आहे. पण भविष्यात हे तंत्रज्ञान संगणक किंवा अन्य उत्पादनांतच बसवून त्याची विक्री करण्याचा कंपनीचा विचार आहे.
आज्ञाधारक, सल्लागार फ्रीज
‘आज काय बनवायचे?’ हा गृहिणींना दररोज पडणारा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या पतीराजांकडेही नसतं. पण तुमचा फ्रीज या प्रश्नाचं उत्तर देत असेल तर?. कल्पना अचाट आहे पण ती एलजीने प्रत्यक्षात आणली आहे. एलजीने सीईएसमध्ये मांडलेल्या ‘होम चॅट स्मार्ट प्लॅटफॉर्म’च्या मदतीने एलजीची सर्व घरगुती उपकरणे तुम्ही केवळ टेक्स्ट मेसेज किंवा तोंडी आज्ञा देऊन नियंत्रित करू शकतात. म्हणजे फ्रीजमध्ये काय सामान आहे हे पाहण्यासाठी फ्रीज उघडायची गरज नाही. तुम्ही फ्रीजला एक मेसेज पाठवताच तो त्याचं उत्तर देईल. इतकंच काय, फ्रीजमधील नेहमीच्या वस्तू संपल्यास त्याची तो पूर्वसूचनाही देईल.
खराखुरा ‘होमथिएटर’
थ्रीडी टीव्हीचं आकर्षण बाजारात अजूनही कायम असताना टीव्ही कंपन्यांनी आता ४००० पिक्सेल इतकं रेसोल्युशन असलेल्या अल्ट्रा एचडी टीव्हींकडे आपला मोर्चा वळवला आहे. सर्वसामान्य एचडी टीव्हीच्या चौपट स्पष्ट आणि प्रभावी चित्र दाखवणारया अल्ट्रा एचडी टीव्हीला आता बाजारात मागणी येऊ लागली आहे. पण एलजीने ‘सीईएस’मध्ये सादर केलेला १०५ इंचांचा अल्ट्रा एचडी एलसीडी टीव्ही म्हणजे अप्रूपच आहे. याच प्रदर्शनात सॅमसंगने ११० इंचाचा टीव्ही मांडला आहे, हे विशेष. पण एलजीच्या 4के टीव्हीची बातच और आहे. सिनेमागृहातील पडद्यावरील्१ चित्रासारखी अनुभूती देणारा हा टीव्ही बसवण्यासाठी सिनेमागृहाइतकाच मोठा हॉल असावा लागेल. पण मोठमोठय़ा आकारातील फ्लॅट टीव्हींची वाढती क्रेझ पाहता, ६९,९९९ डॉलरच्या या टीव्हीला ग्राहक मिळेल, यात शंका नाही.
चलती का नाम सोलरकार
इंधन दिवसेंदिवस महाग आणि कमी होत चाललं आहे. पण त्यावर अजूनही सक्षम पर्याय पुढे आलेला नाही. सौरउर्जेवर चालणारी वाहने ही संकल्पना त्यामुळे खूप आधीपासून मूळ धरत आहे. परंतु, वाहनांवर बसवलेले मोठमोठे सौरनियंत्रक पाहिल्यावर ही कल्पना प्रत्यक्षात येणे कठीण असल्याची आजवरची प्रतिक्रिया होती. फोर्डच्या सी-मॅक्सने हे चित्र पूर्णपणे पालटण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या छतावर बसवलेले आणि कोणताही अडथळा न करणारया सौरनियंत्रकांच्या साह्याने ही गाडी धावते. या सौरनियंत्रकांमुळे जवळपास ७५ टक्के प्रवास हा सौरउर्जेवर करणे शक्य आहे, असा फोर्डचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 4:17 am

Web Title: technology festival
टॅग : Tech It,Technology
Next Stories
1 हातातला खेळ
2 tech संवाद: स्मार्टफोन ग्राहकांची गरज भागवणारे असावेत
3 tech नॉलेज: व्हॉट्स अॅप हवे आहे
Just Now!
X