मुले आता अकबर, चाणक्य, जवाहरलाल नेहरू, जेआरडी टाटा यांच्यावरील चित्रकथा टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर वाचू शकणार आहेत. अमर चित्रकथेने या क्षेत्रात डिजिटलायझेशन करून या कथा वेगळ्या स्वरूपात आणल्या आहेत. एसीके कॉमिक्सने अमर चित्रकथाची प्रथम सुरुवात केली. विंडोज ८, आयओएस व  अँड्रॉइडसह इतर अनेक ऑपरेटिंग सिस्टीमवर डिजिटल स्टोअर अॅप म्हणून ते अधिकृत उपलब्ध करून दिले आहे. किमान ३०० पुस्तके त्यात उपलब्ध केली असून हे अॅप आता अॅप ९ डिजिटल स्टुडिओने विकसित केले आहे. त्यांच्या नाइन स्टार इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजीज या डिजिटल विभागाने त्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. वापरकर्त्यांना चाणक्य, अशोक, अकबर, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, बिरबल, जेआरडी टाटा, सुब्बलक्ष्मी, गणेश, हॉकीपटू ध्यानचंद यांच्यावरील १० कॉमिक मोफत डाऊनलोड करता येतील. अमर चित्रकथा ही सर्वात मोठी कथामालिका म्हणून पुस्तक रूपात लोकप्रिय झाली. भारतीय व अनिवासी भारतीयांत ती लोकप्रिय आहे, असे अमर चित्रकथाचे मुख्य अधिकारी मानस मोहन यांनी सांगितले. अमर चित्रकथा मालिकेचे डिजिटलायझेशन हा पुढचा टप्पा असून आता आमची कॉमिक्स नेट प्रेमी पिढीला अॅपच्या रूपात उपलब्ध करून देत आहोत. लाखो वाचकांपर्यंत त्यामुळे पोहोचता येईल. भारतीय कथांचा खजिना आता बोटाच्या एका स्पर्शात तुम्ही पडद्यावर पाहू शकाल. प्रत्येक पुस्तकाचे नूतनीकरण करून डिजिटल वाचनाचा छान अनुभव मुलांना मिळणार आहे. डिजिटल जगात आम्ही उशिरा प्रवेश करीत असलो, तरी अॅपवर व पुस्तकांच्या रूपात मुलांचे आमच्यावर असेच प्रेम राहील, असे त्यांनी सांगितले. अमर चित्रकथा डाऊनलोड करण्यासाठी ९९ सेंट लागतील, आयओएस व अँड्रॉइडसाठी त्याचे दर सारखेच आहेत. भारतात ते १२०० रुपये संकेतस्थळामार्फत भरल्यावर उपलब्ध होणार आहे. किमान १ लाख जण दीड महिन्यात डाऊनलोड करतील अशी अपेक्षा आहे. पुस्तकांच्या रूपात अमर चित्रकथाचा खप महिन्याला ५ लाख आहे. अॅपच्या माध्यमातून अमर चित्रकथा डिजिटल केल्याने आम्हाला वर्षांला उत्पन्नात ३० ते ४० टक्के महसूलवाढ होईल असे मोहन यांनी सांगितले.
अमर चित्रकथा डाऊनलोडिंगचे दर
परदेशात ९९ सेंट
भारतात १२०० रु.
( संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार)

पुस्तकांच्या रूपात खप महिन्याला ५ लाख
डाऊनलोडसोबत १० चित्रकथा मोफत