सध्याचा जमाना हा हायफंडू तंत्रज्ञानाचा असून यामध्ये नावीन्यपूर्ण संशोधन पुढे येऊ लागले आहे. कॅनन या कंपनीने गुरुवारी क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित इंकजेट प्रिंटर्स लाँच केले. यामध्ये पाच प्रकारचे विविध मॉडेल्स असून हे सर्व मॉडेल्स घरातील प्रिंटिंगसाठी सर्वाधिक वापरले जाणार असल्याचे कॅननचे म्हणणे आहे. या पाचही मॉडेल्समध्ये विविध प्रकार असून याची किंमत तीन हजार ९५० रुपयांपासून २० हजार ४९५ रुपयांपर्यंत आहे.
कॅननने आपल्या या प्रिंटर्सना ‘पिक्समा’ असे नाव दिले असून हे सर्व प्रिंटर्स पर्यावरणस्नेही बनविण्यात आले आहेत. याची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये ऑटो पॉवर ऑन बटन देण्यात आले आहे. यामुळे आपण जेव्हा प्रिंट कमांड देतो तेव्हा हे प्रिंटर सुरू होते, अन्यथा प्रिंटर बंद असते. यामुळे वीज बचत होते. एमजी ३५७०, एमजी६४७० आणि एमजी ७१७० या तीन मॉडेल्समध्ये आपल्याला पाठपोट प्रिंट करण्याची सोय देण्यात आली आहे. यामुळे आपण कागदाचीही बचत करू शकतो. या शिवाय या प्रिंटर्समध्ये आपल्याला इमेज गार्डन सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन देण्यात आले आहे, ज्याचा वापर करून आपण फोटो डिझाइन किंवा विविध प्रकारच्या गोष्टी करता येऊ शकतात. या शिवाय या प्रिंटर्सना क्लाऊड कनेक्टिविटी देण्यात आली आहे. यामुळे आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलो आणि आपले डिवाइस प्रिंटरशी कॉन्फिगर असेल तर आपण प्रिंट देऊ शकतो. यासाठी आपला प्रिंटर संगणक किंवा मोबाइलला जोडलेला असणे गरजेचे नाही.
प्रिंटरच्या किमती
पिक्समा एमजी २४७० – ३९५० रु.
पिक्समा एमजी २५७० – ४१५० रु.
पिक्समा एमजी ३५७० – ६४९५ रु.
पिक्समा एमजी ६४७० – १३४९५ रु.
पिक्समा एमजी ७१७० – २०४९५रू.