मेमरीच्या ढगात

‘लो मेमरी स्पेस’ असा संदेश बहुतांश स्मार्टफोन वापरकर्त्यांना येत असतो. मोबाइलमध्ये इनबिल्ट मेमरी चार ते आठ जीबी आहे

‘लो मेमरी स्पेस’ असा संदेश बहुतांश स्मार्टफोन वापरकर्त्यांना येत असतो. मोबाइलमध्ये इनबिल्ट मेमरी चार ते आठ जीबी आहे. शिवाय सोळा किंवा बत्तीस जीबीचे मेमरी कार्डही आहे, पण आपल्याकडे येणारी माहिती साठविण्यासाठी मोबाइलमधील मेमरी कमी पडते आणि मेमरी स्पेसची अडचण सुरू होते. परिणामी, मोबाइल हळू चालू लागतो. कारण एवढय़ा माहितीसाठय़ामुळे त्याचा सीपीयूची काम करण्याची क्षमता मंदावते. मग आपण अनेक गोष्टी डिलीट करण्यास सुरुवात करतो. अशा वेळी तुम्हाला क्लाऊड स्टोअरेज मदत करू शकते. अॅप्सच्या बाजारात अनेक क्लाऊड स्टोअरेज अॅप्स उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही माहिती साठवू शकता याचबरोबर ती कुठेही शेअरसुद्धा करू शकता. पाहू या काही अॅप्सविषयी..
बॉक्स
अरोन लेवीन या तरुणाने वयाच्या एकोणिसाव्या वर्षी बॉक्स क्लाऊड स्टोअरची निर्मिती केली. त्याची संकल्पना व्यावसायिक रूपात आणण्यासाठी मार्क क्युबन यांनी त्याला अर्थसाहाय्य केले. बाजारात गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठय़ा कंपन्या असताना लेवीनने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही बॉक्स क्लाऊड स्टोअरेजवर लॉग इन करू शकता. एकदा लॉगइन केले की तुम्हाला दहा जीबीपर्यंतची स्टोअरेज स्पेस मोफत मिळते. याशिवाय हे अॅप असलेल्या दुसऱ्या कोणत्याही उपकरणावर आपण त्यातील फाइल्स आणि इतर अनेक गोष्टी शेअर करू शकतो. या क्लाऊड स्टोअरेजवर पैसे भरून अतिरिक्त स्टोअरेज क्षमता आणि सुविधाही घेऊ शकता. हे अॅप इतर अॅपच्या तुलनेत जलद गतीने काम करत असते. यात व्हर्जनिंगसारख्या अनेक सुविधा आहेत, पण त्या पैसे भरून सुविधा घेणाऱ्यांसाठी आहेत. मोफत सुविधा घेणाऱ्यांसाठी फोटो अपलोडिंग, फाइल अपलोडिंग आदी सुविधा सहज आणि जलद गतीने वापरता येऊ शकतात.
अॅप कोणत्या ओएसवर उपलब्ध – अँड्रॉइड, विंडोज, ब्लॅकबेरी, आयओएस.

ड्रॉपबॉक्स
ड्रॉपबॉक्सची सुविधा मोबाइल तसेच ऑनलाइनही उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही लॉगइन करून ड्रॉपबॉक्सची सुविधा घेऊ शकता. सुरुवातीला दोन जीबीपर्यंतची स्टोअरेज क्षमता मोफत दिली जाते. यामध्ये तुम्ही फोटो शेअर करणे, डॉक्युमेंट्सच्या फाइल्स एडिट करणे आदी कामे करू शकता. तुम्हाला ड्रॉपबॉक्समधली एखादी फाइल  जर ई-मेलद्वारे पाठवायची असेल तर तुम्ही ती फाइल थेट ड्रापबॉक्समधून ई-मेलला जोडू शकता. याचबरोबर या माध्यमातून तुम्ही संगणकावरील तुमच्या फाइल्स मोबाइलमध्ये तर मोबाइलमधील फाइल्स संगणकावर ओपन करू शकता. यामध्ये विविध स्टोअरेज क्षमतेनुसार विविध प्रकारचे पॅकेजेस उपलब्ध आहेत.
अॅप कोणत्या ओएसवर उपलब्ध – अँड्रॉइड, विंडोज, ब्लॅकबेरी, आयओएस.

गुगल ड्राइव्ह
गुगल ड्राइव्ह ही गुगलची सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. जर आपण मोबाइलवर याचे स्वतंत्र अॅप डाऊनलोड केले तर मोबाइलवरही ही सेवा उपलब्ध होऊन मोबाइलमधील फोटो, व्हिडीओज, पीडीएफ फाइल्स आदी गोष्टी आपण सहजपणे ड्राइव्हवर सेव्ह करून ठेवू शकतो. या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर सहज शेअर करू शकतो. तसेच जीमेलवरच्या अटॅचमेंट्स आपण थेट गुगल ड्राइव्हवरच डाऊनलोड करू शकतो. जेणेकरून आपल्या संगणकात किंवा अन्य कुठे वेगळी स्टोटरेज जागा खर्च करण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला गुगल आपल्याला पंधरा जीबीचे क्लाऊड स्टोअरेज मोफत उपलब्ध करून देते. याशिवाय गुगलच्या विविध सुविधा तुम्ही वापरल्या तर त्यावरही तुम्हाला ड्राइव्हची स्टोअरेज स्पेस मोफत दिली जाते. उदाहणार्थ तुम्ही क्विक ऑफिस डाऊनलोड केले तर तुम्हाला दहा जीबीचे अतिरिक्त क्लाऊड स्टोअरेज उपलब्ध होऊ शकते. तसेच विविध मोबाइल कंपन्यांच्या असलेल्या टायअपमुळे आणखी स्टोअरेज क्षमता मिळणे शक्य होते. यामध्ये एका कंपनीशी असलेल्या सहकार्य करारानुसार गुगल शंभर जीबीची स्टोअरेज जागा मोफत देते. तर वीस हजार गाण्यांचा साठा असलेली गुगल म्युझिकची सुविधा क्लाऊड स्टोअरेजच्या स्पेसव्यतिरिक्त दिली जाते. म्हणजे ही गाणी साठवण्यासाठीची क्षमता आपल्याला मोफत मिळते.
अॅप कोणत्या ओएसवर उपलब्ध – अँड्रॉइड, विंडोज, ब्लॅकबेरी, आयओएस.

वन ड्राइव्ह
वन ड्राइव्ह म्हणजे पूर्वीचे स्काय ड्राइव्ह. मायक्रोसॉफ्टने स्काय ड्राइव्हचे नाव बदलून वन ड्राइव्ह असे ठेवले आहे. या अॅपमधून वापरकर्त्यांला एखादी फाइल सेव्ह करणे व ती विविध उपकरणांच्या माध्यमातून वापरण्याची मुभा मिळते. यामध्ये तुमच्या फाइल्स सेव्ह करणे किंवा त्या एडिट करणे अगदी सोपे आहे. यामध्येही सुरुवातीला आपल्याला पंधरा जीबीची स्टोअरेज सुविधा मोफत दिली जाते. याशिवाय तुम्ही जर तुमच्या मित्रांना वन ड्राइव्हचा पर्याय सुचविला आणि त्यांनी तो स्वीकारला तर तुम्ही पाचशे एमबीपर्यंतची स्टोअरेज सुविधा मोफत मिळवू शकता. अर्थात ही सुविधा मायक्रोसॉफ्टने काही काळापुरतीच मर्यादित ठेवली होती. तुम्ही वन ड्राइव्ह मोबाइल फोन आणि संगणक दोन्हींवर लिंक केला तर तुम्हाला तीन जीबीची अतिरिक्त स्टोअरेज स्पेस फोटो सेव्ह करण्यासाठी मिळते. तुम्ही मायक्रोसॉफ्टचे ऑफिस 365 जर विकत घेतले तर त्याच्या सोबत तुम्हाला एक टीबीची वन ड्राइव्ह स्टोअरेज सुविधा मोफत मिळते.
अॅप कोणत्या ओएसवर उपलब्ध – अँड्रॉइड, विंडोज, ब्लॅकबेरी, आयओएस.

अँड्रॉइडवर चालणारे इतर काही क्लाऊड स्टोअरेज अॅप्स
मेगा-  ही क्लाऊड सेवा फाइल ब्राऊझिंग, फोल्डर्स तयार करणे, अपलोडिंग आणि डाऊनलोडिंग अशा विविध सुविधांसाठी उपयुक्त आहे. या अॅपमध्ये सर्चसारखे पर्याय खूप सोपे आहेत. यामध्ये सुरुवातीला पन्नास जीबीची स्टोअरेज क्षमता मोफत उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय आठ जीबीची फाइल स्टोअरेज आणि आठ जीबीची बॅकअप सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्लाऊड सुविधेवर अपलोड केलेली माहिती सुरक्षित आणि एनक्रिप्टेड असते.
क्यूबी – यामध्ये महत्त्वाची डॉक्युमेंट्स, फोटो, मूव्हीज या गोष्टी सेव्ह करू शकतो. या अॅपद्वारे तुम्ही हे अॅप असलेल्या तुमच्या मित्रासोबत अख्खे फोल्डर शेअर करू शकता. ही प्रक्रिया अगदी सोपी होते. यामध्ये पाच जीबीची स्टोअरेज स्पेस मोफत मिळते.
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cloud storage apps information