अॅपल दरवर्षी तंत्रप्रेमींसाठी नवी मेजवानी घेऊन येत असतो. येत्या वर्षात दाखल होणाऱया अॅपलच्या बहुचर्चित ‘आयफोन ६ सी’ या स्मार्टफोनचे फीचर्स लीक झाले आहेत. ‘आयफोन ६ सी’ हा ४ इंची स्मार्टफोन असणार असून, तो वॉटरप्रूफ असेल असे सांगण्यात येत आहे.
चीनमधील एका रिसर्च वेबपोर्टलने हा खुलासा केला आहे. ‘आयफोन ६ सी’मध्ये ए-९ प्रोसेसर, १६ जीबीची इंटरनल मेमरी आणि २ जीबीची रॅम असेल. याशिवाय, फोनमध्ये मल्टी टच, ३डी टच, ड्युअल कॅमेरा आणि इन-फिंगरप्रिंट या अद्ययावत सुविधांचाही समावेश असणार आहे. ‘आयफोन ६ सी’साठी आयफोन बनविण्यासाठी वापरण्यात येणारे मेटलसुद्धा बदलण्यात येणार आहे. नव्या आयफोनला आणखी हलके करण्याचा कंपनीचा मानस आहे. ‘आयफोन’चा ‘३.५एमएस’चा हेडफोन जॅक आयफोनमधून काढून टाकण्याचाही विचार अॅपल करत आहे. त्या हेडफोनच्या जागी नवा हेडफोन अॅपल डिझाईन करणार असल्याचे समजते. ‘आयफोन ६ सी’ हा स्मार्टफोन येत्या एप्रिलमध्ये दाखल होऊ शकतो.