सध्या बाजारात सर्वाधिक विकले जातात ते स्मार्टफोन्स. फीचर्स फोन तर येत्या काही दिवसांत जवळपास सर्वच कंपन्या त्यांच्या उत्पादन व्यवस्थेतून बाद करतील, अशीच स्थिती आहे. या स्मार्टफोन्सच्या दुनियेमध्येही सध्या सर्वाधिक विकले जातात ते बजेट स्मार्टफोन्स जे साधारणपणे १० ते १२ हजारांच्या किमतीत मिळतात. हे आता अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या लक्षात आले आहे.  त्यामुळे त्यांनी या किमतीतील स्मार्टफोन्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यातही अलीकडे प्राधान्य आहे ते डय़ुएल सिम फोनना. त्यामुळे बाजारात येणारे स्मार्टफोन हे डय़ुएल सिम बजेट स्मार्टफोन आहेत. एलजी या प्रख्यात कंपनीनेदेखील आता याच पठडीत बसणारा एलजी ऑप्टिमस एल ४ डबलआय डय़ुएल हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
हा ऑप्टिमस मालिकेतील स्मार्टफोन असून तो अँड्रॉइडच्या जेली बीन या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. त्याचा टचस्क्रीन ३.८ इंचाचा आहे, तर या साठी १ गिगाहर्टझ्चा सिंगल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा ३ मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस असून मागच्या बाजूस असलेला कॅमेरा व्हीजीए आहे. त्यासाठी १,७०० एमएएच क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली असून ती तब्बल १० तास कार्यरत राहाते, असा कंपनीचा दावा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ९८५०/-