सोनी या जपानी कंपनीने आपला कम्प्युटर अक्सेसरीज आणि वायो हा प्रसिद्ध लॅपटॉप श्रेणीचा विभाग बंद करायचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. त्यानंतर आता सोनीने पूर्ण ताकदीनिशी पोर्टेबल कॅमेरे आणि डी.एस.एल.आर वर लक्ष केंद्रित केले आहे. व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांची वाह-वाह मिळवणाऱ्या ए-५७ या अल्फा सिरीज च्या कॅमेऱ्यानंतर आता एसएलटी ए-५८ कॅमेरा बाजारात आणला आहे. हा कॅमेरा हौशी आणि शिकाऊ छायाचित्रकारांसाठी अत्युत्तम पर्याय ठरू शकतो.
सध्या सोनीचा भर मिररलेस कॅमेऱ्यांवर दिसतो. मिररलेस कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य काय तर, लेन्सच्या मागे मिरर नसतो. त्यामुळे डोळे ठेवायचा व्ह्यु फाइंडर हा ऑप्टीकल नसून डिजिटल आहे. याने बॅटरीवर थोडाफार परिणाम होतो मात्र, छायाचित्रांचा दर्जा खूपच सुधारतो. या मिररलेस प्रणालीमुळे तुम्हाला चलछायाचित्रण करताना देखील ऑटो-फोकस मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात तुम्हाला एका सेकंदात चक्क ८ छायाचित्र काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्ह्यु फाइंडरमुळे तुम्हाला फोटो काढताना ऑन-स्क्रीन सेटिंग देखील बदलता येतात.

या कॅमेऱ्याचे वजन कमी असून, आकार देखील लहान आहे. मात्र, लहान बॉडीफ्रेमचा हा कॅमेरा दणकट वाटतो. एवढ्या छोट्या बॉडीफ्रेम मध्ये तुम्हाला २०.१ मेगापिक्सेलची लेन्स मिळते. सोबत फिरवता येईल असा उच्च दर्जाचा डिस्प्ले देखील उपयोगी पडतो. कामेऱ्याची बॉडी चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकने बनवलेली आहे व रबराचा पट्टा असलेली ग्रीप आरामदायक आणि सटीक वाटते.
२० मेगापिक्सेलच्या सेन्सरमधून मिळणारी छायाचित्रे निश्चितच उच्च दर्जाची आहेत. या छायाचित्रांची सरासरी मेमरी साईझ ७ एम.बी च्या आसपास आहे. या कॅमेऱ्यामध्ये आय.एस.ओ. (ब्राईटनेस सेटींग) १०० ते १६००० इतक्या विस्तृत पट्ट्यात मिळतो. याचा इन-बिल्ट फ्लॅश व चांगल्या दर्जाचा सिमॉस सेन्सर तुम्हाला कमी प्रकाशात देखील उच्चदर्जाचे फोटो देतो. स्टेडीशॉट नावाच्या यंत्रणेमुळे हाताच्या किंवा कॅमेऱ्याच्या हालचालीचा परिणाम छायाचित्रावर जास्त होऊ देत नाही, त्यामुळे छायाचित्र स्पष्ट आणि जिवंत उमटतात.
एसएलटी ए-५८ कॅमेरा अ-माऊंट या श्रेणीमधील असल्याने मिनोल्टा किंवा कोनिका-मिनोल्टा लेन्स देखील या कॅमेऱ्यासोबत वापरता येतात. याच्या डिजिटल व ऑप्टीकल विशेषतेमुळे हा कॅमेरा वापरायला सोपा आणि व्यावसायिक दर्जाचे छायाचित्रे काढणारा ठरतो. या कॅमेऱ्याची किंमत एका लेन्सकीट सोबत ३९,४०० रुपये आहे. ही किंमत या श्रेणीतल्या डी.एस.एल.आर साठी जास्त वाटू शकते. मात्र, हा कॅमेरा तुम्हाला पुरेपूर परतावा मिळवून देणारा असाच आहे.