तंत्रज्ञान जगतासाठी ऑगस्ट महिना दोन अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींनी व्यापला होता. त्यातली एक घटना होती मायक्रोसॉफ्ट या हार्डवेअर क्षेत्रातील अव्वल कंपनीने नोकिया या दिग्गज मोबाइल कंपनीवर मिळवलेल्या ताब्याची. सुमारे पाचेक वर्षांपूर्वी मोबाइल हँडसेट बाजाराचा ४० टक्के वाटा असलेल्या नोकिया कंपनीचा हॅण्डसेट उद्योग मायक्रोसॉफ्टने ७.१७ अब्ज डॉलरला खरेदी केला. मायक्रोसॉफ्टच्या या हालचाली सुरू असतानाच गुगल कंपनीने दोन वर्षांपूर्वी सुमारे १२.५ अब्ज डॉलरला खरेदी केलेल्या मोटोरोला या कंपनीमार्फत ‘मोटो एक्स’ हा मोबाइल हॅण्डसेट बाजारात दाखल केला. या दोन घटनांचा वरकरणी एकमेकींशी थेट संबंध नाही. पण तंत्रज्ञान जगतासाठी विशेषत: मोबाइल क्षेत्रासाठी या दोन घटना म्हणजे भविष्यात घडू पाहणाऱ्या मोठय़ा ‘पॉवरगेम’ची नांदी आहे.
सुमारे पाचेक वर्षांपूर्वी नोकियाचा मोबाइल प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जात होता. एकूण मोबाइल बाजारपेठेत त्यांचा हिस्सा जवळपास निम्मा होता. त्यामुळे नोकियाची खरेदी करून मायक्रोसॉफ्टने या लढाईसाठी तगडा भिडू आपल्याकडे घेतला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अर्थात, आज नोकिया अत्यंत विरुद्ध टोकाला आहे. आयफोन आणि स्मार्टफोनच्या स्पध्रेत स्वत:ला टिकवणं कंपनीला शक्य झालं नाही आणि पाच वर्षांत कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा जवळपास ३० टक्क्यांनी घसरला. छोटय़ा आणि खालच्या श्रेणीतील मोबाइलमध्ये कंपनीचा जम अजूनही असला तरी मुळात त्याकडे असणारा ग्राहकांचा ओघच आता कमी होऊ लागला आहे. त्यामुळे प्रचंड फोफावत चाललेल्या स्मार्टफोन बाजारात नोकियाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवणं, हे मायक्रोसॉफ्टसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यातच खुद्द मायक्रोसॉफ्टच्या नफ्याचा आलेखही उतरणीच्या मार्गावर जात आहे. ही उतरण फारशी गंभीर नसली तरी आता नोकियाचा गाडा घेऊन मायक्रोसॉफ्टला प्रगतीचा चढ चढायचा आहे. हा रस्ता तितका सोपा नाही. कारण गुगलच्या अ‍ॅन्ड्रॉइडसमोर मायक्रोसॉफ्टच्या िवडोजला अपेक्षेइतका प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच मायक्रोसॉफ्टशी हातमिळवणी करून नोकियाने आणलेले लुमिया श्रेणीतील हॅण्डसेट बाजारावर प्रभाव पाडू शकलेले नाहीत. अशात स्मार्टफोनची संपूर्ण बाजारपेठ हलवेल किंवा प्रस्थापित स्मार्टफोनना धक्का देईल, अशी मोबाइलनिर्मिती करण्याचं आव्हान मायक्रोसॉफ्टपुढे आहे.
पहिल्या पावलावर भवितव्य
मोबाइल हॅण्डसेट क्षेत्रात गुगलचा प्रवेश दोन वर्षांपूर्वी झाला. त्या वेळी त्यांनी मोटोरोला ही कंपनी साडेबारा अब्ज डॉलर मोजून खरेदी केली. मोटोरोला ही एके काळी मोबाइल जगतातील सामथ्र्यशाली आणि नवनवीन प्रयोग करणारी कंपनी होती. पण गेल्या काही वर्षांत कंपनीचा पुरता बोऱ्या वाजला आहे. बाजारात पार रसातळाला गेलेली ही कंपनी गुगलने खरेदी केली आणि तिला नवी भरारी मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली. २०११ मध्ये मोटोरोला गुगलच्या दावणीखाली बांधली गेल्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही कंपन्यांच्या ‘मीलना’तून साकारलेला ‘मोटो एक्स’ बाजारात दाखल झाला आहे. दहा मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा मोटो एक्सचे मोठे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे. पण त्याहून विशेष म्हणजे, या फोनमध्ये असलेली ‘व्हॉइस कमांड’ सुविधा आतापर्यंतच्या कोणत्याही स्मार्टफोनमधील अशा सुविधेपेक्षा सरस आहे. ही सुविधा केवळ ‘ओके गुगल नाऊ’ (‘ ॅॅ’ी ल्ल 6) एवढे बोलल्यावरच सुरू करता येते. फोन करण्यासाठी, मेसेज करण्यासाठी, इंटरनेटवर सर्च करण्यासाठी आणि अन्य गोष्टींसाठी ही व्हॉइस कमांड सुविधा व्यवस्थितपणे आणि वेगाने काम करते. शिवाय, केवळ फोन मालकाच्या आवाजानेच ही सुविधा सुरू करण्याची व्यवस्था या फोनमध्ये आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे याची ‘बॅटरी’. कोणताही वापर न करता हा हॅण्डसेट एका बॅटरीवर पाच दिवस चालू शकतो. तर, मध्यम स्वरूपाच्या वापरानंतर या हॅण्डसेटची बॅटरी किमान २४ तास चालू शकेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
याशिवाय या ‘स्मार्टफोन’मध्ये सध्या बाजारात असलेल्या स्मार्टफोनसारख्या सर्व सुविधा आहेत. पण तरीही गुगलचं हे पहिलं पाऊल अपयशाकडे अधिक झुकणारं आहे. अ‍ॅन्ड्रॉइड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्मार्टफोनच्या बाजाराला रसद पुरवणाऱ्या गुगलचा मोटोरोलासोबतचा पहिला स्मार्टफोन म्हणून ‘मोटो एक्स’कडे मोठय़ा अपेक्षेने पाहिले जात होते. मात्र, अमेरिकेच्या बाजारातील या फोनबद्दलचे विश्लेषण निराशा करणारे आहे. दोन वर्षांची बेगमी करून गुगलने आणलेला हा स्मार्टफोन सॅमसंगच्या गॅलक्सी एस 4 किंवा एचटीसीच्या स्मार्टफोनपेक्षा प्रभावी नाही. दुसरं म्हणजे, गुगलने दर महिन्याला केवळ १ लाख हॅण्डसेट बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे हा आकडा वर्षांला ५० लाख इतका पोहोचेल. पण अ‍ॅपल दर तीन महिन्यांना ३ कोटी मोबाइल बाजारात आणत असताना गुगलचा वेग खूपच मंद म्हणावा लागेल.
‘मोटो एक्स’ ही गुगलच्या नव्या डावाची अगदी यशस्वी सुरुवात म्हणता येणार नाही. पण गुगलसाठी यात सुधारणा करणे, अजिबात कठीण नाही. मुळात ‘स्मार्टफोन’चा सगळा बाजार गुगलच्या अ‍ॅन्ड्रॉइडवर अवलंबून आहे. त्यामुळे स्वत:च्या कंपनीच्या मोबाइलसाठी अधिक चांगली अ‍ॅन्ड्रॉइड सिस्टीम आणणं गुगलला शक्य आहे.
आव्हान खडतर
हार्डवेअर क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट अढळस्थानी आहे, तर ‘सर्च इंजिन’मध्ये गुगलला खाली खेचण्याचा एकही प्रयत्न यशस्वी झालेला नाही. या दोन्ही कंपन्यांत संगणक क्षेत्रात असलेली लढाई िवडोज आणि अ‍ॅन्ड्रॉइड सिस्टीमच्या माध्यमातून मोबाइल क्षेत्रात कधीचीच सुरू झाली आहे. मात्र, आता या दोन्ही कंपन्या खऱ्या अर्थाने मोबाइल बाजारपेठेत उतरल्या आहेत. मायक्रोसॉफ्टची नोकिया खरेदी आणि गुगलचा मोटो एक्स या घडामोडी या तीव्र स्पध्रेची सुरुवात आहे. मात्र, या दोघांना एकमेकांपलीकडे सॅमसंग, सोनी, एचटीसी, अ‍ॅपल या आजघडीच्या मातब्बर मोबाइल कंपन्यांशीही झुंजावे लागणार आहे.

Story img Loader