स्मार्ट फोन आज अनेकांच्या हातात आला आहे. पण या सर्वानाच त्याची प्रत्येक उपयुक्तता माहीत असते, असे नाही. त्यामुळे त्याचा तितका स्मार्ट वापर होत नाही. याला स्मार्ट फोनबद्दलची अजाणता असे म्हणता येईल. स्मार्ट फोन म्हणजे काय आणि त्याचा स्मार्ट वापर कसा करावा, यावर प्रकाशझोत पाडणारा हा विशेष लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या बाजारातील सर्वात पसंतीचे तंत्रउपकरण कोणते असेल तर ते स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन हा फोन, संगणक, कॅमेरा, म्युझिक प्लेअर अशा अनेक उपकरणांचे अनोखे मिश्रण आहे. एकाच वेळी अनेक कामे करू शकतो म्हणून त्याला ‘स्मार्ट फोन’ असे म्हणतात. मग व्हीडिओ पाहणे किंवा गाणी ऐकणे असो की इंटरनेट, जीपीएसचा वापर असो स्मार्ट फोन तऱ्हेतऱ्हेची कामे एकाच क्लिकवर करून देतो.  
संगणकाप्रमाणेच या स्मार्टफोनला संस्कारक, स्मृती व माहिती साठवण क्षमता, पडदा, की बोर्ड (कळफलक) हे सर्व असते. स्मार्ट फोनची आपरेटिंग सिस्टीम फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. माणसाचा मेंदू जसे अवयवांच्या हालचालींचे नियंत्रण करतो त्याप्रमाणे आपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोनचे प्रत्येक कार्य नियंत्रित करीत असते. संगणक व स्मार्टफोन यांच्या आकारात, स्मृती, संस्कारक (प्रोसेसर) यामध्ये मात्र फरक असतो.
संगणक व स्मार्टफोन यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमही भिन्न असतात. गुगलची अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, मायक्रोसॉफ्ट िवडोज, अॅपलची आयओएस या स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कार्यचालन यंत्रणा आहेत. आयओएस व अँड्रॉइड या पूर्णपणे भिन्न पद्धती आहेत, त्यात तांत्रिक फरक आहेच, पण त्यांच्या कार्यपद्धतीतही फरक आहे. अॅपलने त्यांची आयओएस प्रणालीची मालकी स्वत:कडे ठेवली आहे. त्यामुळे ती यंत्रणा दुसऱ्या कोणत्याही फोनमध्ये चालवता येत नाही. अॅपलच्या आयफोन, आयपॅडमध्येच ती चालते. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम गुगलने तयार केली असून ती गुगलशिवाय, व्होडाफोन, एलजी, सॅमसंग अशा अनेक कंपन्यांच्या फोनला उपलब्ध करून देण्यात आली आहे. अँड्रॉइड ही ओपन सोर्स म्हणजे खुली प्रणाली आहे. अँड्रॉइडमध्ये बदल करून नवीन आवृत्त्या वापरण्याचीही मुभा आहे.
स्मार्ट फोनवर अॅप म्हणजे उपयोजने (अप्लीकेशन) वापरता येतात. एखादे विशिष्ट काम करणारी आज्ञावली म्हणजे अॅप होय. उदाहरणच द्यायचे तर अँग्रीबर्ड, इमेल अशी अॅप स्मार्ट फोनसाठी उपलब्ध आहेत. अॅप डाऊनलोड करून घेता येते. इंटरनेटवरील अॅप स्टोअरमध्ये ती उपलब्ध असतात. त्यातील काही फुकट काही विकत असतात. अँग्रीबर्डस हा गेम आयओएस व अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध असला तरी त्याच्या आवृत्त्या भिन्न आहेत. ज्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी ते अॅप आहे तेथेच ते वापरता येते. अॅपलची अॅपस त्यांच्या अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत ती तेथूनच घ्यावी लागतात. आयट्यूनस हे त्याचे एक उदाहरण झाले. गुगलच्या अँड्रॉइडचे तसे नाही. गुगलने प्ले स्टोअर उपलब्ध केले आहे, पण गुगल प्लेवरूनच अॅप डाऊनलोड करण्याचे बंधन नाही. थोडक्यात अँड्रॉइडचे धोरण मुक्त आहे तर अॅपलचे धोरण खुले नाही. अॅपलच्या मते हे बंधन चांगलेच आहे कारण त्यात असली नकली अॅप असा प्रश्न नाही पण ग्राहकांना हे बंधन मान्य नाही.
अॅपलने जरी हे सोवळे रूप धारण केले असले तरी त्यांचे हे बंधन झुगारून त्यांची अॅपस डाऊनलोड करता येतात, बंधन मोडण्याच्या या क्रियेला जेल ब्रेक असे म्हणतात. जेलब्रेक केलेल्या अॅपला कुठलीही बंधने नसतात की अन्य अॅपस्टोअरवर हस्तांतरित करता येतात. जेलब्रेक केलेल्या उपयोजनांची जबाबदारी अॅपल कंपनी घेत नाही. अँड्रॉइडमध्ये उपयोजनांबाबत बंधने नाहीत, पण तरीही ती रूट करता येतात, यातही अँड्राइडच्या उपयोजनांचे अधिकार ग्राहकांकडे घेतले जातात. रूट केलेल्या उपयोजनांना ऑपरेटिंग सिस्टीमची बंधने लागू होत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना स्वातंत्र्य असते.
स्मार्टफोनमुळे काही जोखमी आल्या आहेत. स्मार्टफोनवर मॅलवेअरची निर्मिती झाली आहे. मॅलवेअर म्हणजे वाईट हेतूने नुकसान करण्याकरिता तयार केलेली आज्ञावली म्हणजे मॅलवेअर. व्हायरस, वर्म, ट्रोजन हे त्याचे काही प्रकार आहेत. त्यामुळे उपयोजनांचे (अप्लीकेशन) नुकसान होते. स्मार्टफोनची माहिती चोरता येते. खुल्या पद्धतीमुळे अँड्रॉइडला अशा मॅलवेअरचा धोका अधिक असतो. जेलब्रेक किंवा रूट केलेल्या उपयोजनांना (अप्लीकेशन्स) हा धोका जास्त असतो. यावर उपाय म्हणून अँटी मॅलवेअरचा वापर करावा ते बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या वापराचे मूल्यमापन करून अँटीमॅलवेअर कुठले घ्याचे ते ठरवावे म्हणजे आपली माहिती दुसऱ्याच्या हाती जात नाही. स्मार्टफोनवरील माहिती सांकेतिक रूपात साठवता येते त्यामुळे तो हरवला तरी ती माहिती दुसऱ्याला वापरता येत नाही. हरवलेला स्मार्ट फोन शोधणारी अॅपही उपलब्ध आहेत. खात्रीलायक अॅपस्टोअरवरूनच अॅप डाऊनलोड करावे, ई-बँकिंग करताना जेल ब्रेक किंवा रूट केलेली अॅप वापरू नयेत. अनोळखी ठिकाणी वाय-फाय किंवा ब्लू टूथ वापरू नये अशी काही पथ्ये पाळली तर स्मार्ट फोनचा वापर आपण स्मार्टपणे करू शकतो.
(लेखक इसाका या माहिती सुरक्षा संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष आहेत)

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The smart use of smart phone
First published on: 05-09-2014 at 12:28 IST