जगभरात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलले जात आहे. या सर्वातही भारतीयांनीच बाजी मारली असून जगभरातून भारतीय कृत्रिम बुद्धिमत्तेला मागणी वाढू लागली आहे. देशात याचे महत्त्व अद्याप फारसे जाणले गेले नसले तरी परदेशी कंपन्यांनी त्याचे महत्त्व जाणून या क्षेत्रातील भारतीय नवउद्योग खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात या कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी.

रोबो असेल किंवा एखादे यंत्र असेल, ते अगदी मानवासारखे काम करू लागले आहे. अर्थात या गोष्टीला खूप काळ लोटला असला तरी आजही यामध्ये विविध स्तरांवर संशोधन सुरू असून अगदी मानवी आज्ञा येण्यापूर्वी दिलेले काम चोख करणाऱ्या यंत्रांची निर्मिती झाली आहे. याच संकल्पनेला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जाते. अगदी विज्ञानातील विविध सिद्धांत प्रयोगानुसार सिद्ध करण्यासाठीही या बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. अर्थात याचा सर्वाधिक वापर परदेशात होत होता हे काही नव्याने सांगण्यासारखे नाही; पण भारतातील संगणक विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांनीही त्याच्या आधारावर संशोधन करून विविध यांत्रिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून अ‍ॅपल, गुगल, आयबीएम, फेसबुकसारख्या कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या २० हून अधिक नवउद्योगांना खरेदी केले. ही एक प्रकारे भारतीय कृत्रिम बुद्धिमत्तेची बाजी मानली गेली आहे. देशातील कृत्रिम बुद्धिमत्तेची ताकद सर्वात प्रथम अ‍ॅपलने ओळखली आणि त्यांनी एका कंपनीची खरेदी केली. यानंतर विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने कामाला वेग आणणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या कंपन्यांना फेसबुक, गुगल, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम आणि इतर कंपन्यांनी खरेदी केल्या आहेत. गेल्या दीड वर्षांमध्ये सुमारे सहाहून अधिक कंपन्यांची खरेदी झाली आहे.

देशात या क्षेत्रात काम करणाऱ्या १७० कंपन्या असून त्यामध्ये तीन कोटी ६० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. यात बंगळुरू सर्वात आघाडीवर असून तेथे ६४ कंपन्या कार्य करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मूलभूत सुविधा, व्यासपीठ आणि अ‍ॅप्लिकेशन या तीन रूपांत आपल्यासमोर येते. यापैकी अ‍ॅप्लिकेशनमध्ये भारतीय कंपन्यांचे सर्वाधिक काम असून संगणकाला माणसासारखे काम करण्यापर्यंत या कंपन्यांनी झेप घेतली आहे. विविध क्षेत्रांतील कामांमध्ये मानवी शक्तीला पर्याय म्हणून या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. याचबरोबर ज्या भागात माणसाने जाऊन काम करणे शक्य नसते अशा भागातही या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काम करणे शक्य होणार आहे. भारतात याचा सर्वाधिक वापर हा सध्या वाहननिर्मिती क्षेत्रात होतो; पण परदेशात याचा वापर अगदी घराघरांत पोहोचला आहे. भारतात तो पोहोचण्यासाठी आणखी कालावधी जावा लागणार आहे.

आजमितीस भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक वापर हा माहितीच्या अचूक वापरासाठी होत आहे. ई-कॉमर्स कंपन्या, तेल कंपन्या, विमान कंपन्या यासारख्या कंपन्यांकडे असलेली माहिती चोरी होण्याची दाट शक्यता असते, मात्र ती चोरी होऊ नये यासाठी ही बुद्धिमत्ता काम करत असते. आज अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमध्ये दिवसाला दोन टेराबाइट माहिती जमा होते. अशाच प्रकारची मोठय़ा प्रमाणावरील माहिती विविध कंपन्यांकडे जमा होत असते. या माहितीचे संरक्षण आणि त्याचे सुलभीकरण करण्याचे मोठे काम सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. असे असले तरी आज देशात या क्षेत्रात सुरू असलेले काम हे एक चिमुकले पाऊल समजले जात आहे. जगभरात या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांची संख्या दोन हजार २७७ इतकी आहे, तर याची बाजारपेठ ही १४.२८ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. २०११ मध्ये या क्षेत्रातील नवउद्यमांमध्ये ९ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. तेच प्रमाण वाढून २०१६ मध्ये १.०५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इथपर्यंत पोहोचले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?

संगणक विज्ञानाला विचार करण्यास लावून मानवाप्रमाणे काम करणारी यंत्रणा उभी करणे.

कृत्रिम बुद्धिमत्ता काय करते?

* विविध प्रक्रिया स्वयंचलित करण्यास मदत.

* माहितीचे नियोजन आणि वापर करण्यात मदत.

* धोकादायक क्षेत्रात जाऊन काम करणे.

* शोध यंत्रणा अधिक जलद करणे.

* वैद्यकीय चाचण्या अचूक करणे.