30 October 2020

News Flash

मोबाइलची ‘गेम’बाजी

मोबाइलमुळे संवाद माध्यमांपासून ते कार्यालयीन कामकाजापर्यंत सर्वामध्येच बदल घडत गेले.

मोबाइलमुळे संवाद माध्यमांपासून ते कार्यालयीन कामकाजापर्यंत सर्वामध्येच बदल घडत गेले. असेच बदल मनोरंजनाच्या माध्यमातही झाले. गाण्यांच्या बाबतीत हा बदल आपल्याला अगदी लगेचच जाणवला. यामुळे मोबाइल कामापासून ते मनोरंजनापर्यंत सर्वासाठी उपयुक्त ठरू लागला आहे. यातच मोबाइलचा सर्वाधिक वापर गेम्स खेळण्यासाठी होत असल्याचे विविध सर्वेक्षणांतून सिद्ध झाले आहे. याची सुरुवात नोकियाच्या मोबाइलमधील सापाच्या खेळापासून झाली. मग अगदी कधीही गेमची आवड नसणारी व्यक्तीही खेळात रस घेऊ लागली. कालांतराने मोबाइलचे गेम्स वाढत गेले. परिणामी गेमिंगचा आगळा अनुभव देणारे असे कन्सोल्स आणि संगणकीय गेम्स मागे पडू लागले. यामुळेच गेल्या आर्थिक वर्षांत मोबाइल गेम्सच्या बाजारपेठेने कन्सोल आणि संगणकीय गेम्सच्या बाजारपेठेला मागे टाकले. बाजाराची मागणी ओळखून केवळ कन्सोल्स किंवा संगणकावर उपलब्ध असलेले अनेक गेम्स आता मोबाइलवर येऊ लागले आहेत. मोबाइल कंपन्यांनीही अशा गेम्सना उपयुक्त हार्डवेअर मोबाइलमध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता कन्सोलवरील गेम्सचा आनंद मोबाइलवर घेता येऊ लागला आहे. कन्सोल्ससाठी पैसे आकारणाऱ्या गेम कंपन्यांनी मोबाइलवरही गेम उपलब्ध करून देताना पैसे आकारले आहेत. पण पैसे भरूनही हे गेम खेळणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पाहू या असे काही निवडक गेम्स आहेत जे कन्सोलवरून मोबाइलवर उपलब्ध झाले आहेत.
ग्रँड थेफ्ट ऑटो व्हाइस सिटी
हा गेम आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही ऑपरेटिंग प्रणालीवर उपलब्ध असून हा गेम बाह्य नियंत्रणावरही चांगल्या प्रकारे काम करतो. कन्सोलवर हा गेम ज्या दर्जामध्ये आणि ज्या वेगात उपलब्ध आहे त्यापर्यंत पोहचण्यात या गेमला यश आले आहे. यामुळे अगदी कन्सोल नसला तरी हा गेम आता मोबाइलवर उपलब्ध आहे. या गेमला कन्सोलवर मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. हा एक रेसिंग गेम असून यामध्ये वेग आणि थरार अनुभवता येतो.
एक्सकॉम एनिमी विदिन
हा गेम म्हणजे एक्सकॉम एनिमी अननोनची सुधारित आवृत्ती आहे. कन्सोलवर अनेक काळ अधिराज्य गाजवणारी एक्सकॉम गेम्सच्या कंपनीने काळ बदलाचा अंदाज घेत त्यांचे सर्व गेम्स टचस्क्रीनवर सर्वप्रथम उपलब्ध करून दिले आहेत. एलियनला मारण्यासाठी तुम्हाला या गेममध्ये तुमच्या सैनिकांचे नियंत्रण करावयाचे आहे. यासाठी विविध नकाशे आणि कथानक गेममध्ये देण्यात आले आहे. हा गेम आयओएस आणि अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.
ट्रान्झिस्टर
2011मध्ये गेमिंग क्षेत्रात वादळ उठवणाऱ्या ट्रान्झिस्टर या गेमने गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक असे अनोखे गेम्स ऑनलाइन खेळाडूंना उपलब्ध करून दिले आहे. हा गेम पीएस फोर आणि संगणकावर उपलब्ध होता. मात्र आता हा गेम आयओएस मोबाइल्सवरही उपलब्ध झाला आहे. या खेळात शत्रूंचे डावपेच हाणून पाडात पुढचे टप्पे गाठायचे असतात. हा गेम म्हणजे चित्र आणि आवाज रचनेचा एक अनोखा नमुना म्हणून ओळखला गेला होता. तोच अनुभव मोबाइलमध्ये कायम ठेवण्यात कंपनीला यश आले आहे.
फायनल फॅन्टसी 7
प्ले स्टेशनवर 20 वर्षांपूर्वी अवतरलेल्या या गेमने पाश्चिमात्य देशांमध्ये अधिराज्य गाजवले. यानंतर तो भारतासारख्या देशांमध्येही लोकप्रिय झाला. संगणकावर उपलब्ध असलेला हा गेम आता आयओएस उपकरणांवर उपलब्ध झाला आहे. हा गेम खेळण्याचा चांगला अनुभव आता आयपॅडवर मिळू लागला आहे. या गेममध्ये गेमप्ले चिट्स वापरण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तुम्हाला नुसतेच कथानक जाणून घ्यायचे असले तरी ते शक्य होते. या गेमच्या समकक्ष असे अनेक गेम्स आता अँड्रॉइडवर उपलब्ध आहेत. मात्र हा गेम अद्याप अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
हार्टस्टोन : हिरोज ऑफ वॉरक्राफ्ट
सर्वाधिक अद्ययावत होणारा गेम म्हणून याची ओळख आहे. अगदी महिनाभराच्या अवधीत आवृत्तीत बदल करुन गेम नव्याने सादर केला जातो. यामुळे या गेमला कन्सोल आणि संगणकावरही खून चांगली मागणी होती. अशीच मागणी आता टचस्क्रीन उपकरणांवरही आहे. अनेक कन्सोल गेम्स मोबाइलवर येताना पैसे आकारत असले तरी हा गेम आयओएस आणि अँड्रॉइडवर मोफत उपलब्ध आहे.
फास्टर दॅन लाइट
अंतराळ विमान चालवण्याचा अनुभव देणाऱ्या या गेमला संगणकावर मोठी मागणी होती. हाच गेम आता मोबाइलवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये आपल्याला अंतराळ विमान चालवायचे असते आणि त्यासाठी आवश्यक असलेला मार्ग दाखवणारे कॉमबॅटही मोबाइल गेममध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. संगणकावर खेळताना की-बोर्ड किंवा माऊसच्या आधारे नियंत्रित केला जाणारा हा गेम मोबाइलवर पूर्णपणे टचस्क्रीनवर अवलंबून असतो. हा गेम आयओएसवर उपलब्ध आहे.
नीरज पंडित -Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2016 4:03 am

Web Title: game in mobile
Next Stories
1 बडा है तो बेहतर है।
2 अस्सं कस्सं? : टेक्नॉलॉजीतलं ‘आरएसएस’चं महत्त्व
3 अ‍ॅपची शाळा : स्मार्टफोनवर अभ्यास
Just Now!
X