तरुणाईमध्ये ‘सेल्फी’ चित्रणाबद्दल वाढत असलेलं आकर्षण म्हणा किंवा आणखी काही; पण भारतीय बाजारपेठेत येत असलेले बहुतांश नवीन स्मार्टफोन ‘सेल्फी’भोवती रेंगाळत असलेले दिसतात. उत्तम सेल्फीची सुविधा देणारा कॅमेरायुक्त स्मार्टफोन हीच वापरकर्त्यांची मुख्य गरज असल्यासारखे हे स्मार्टफोन बनवले आणि बाजारात सादर केले जात आहेत. हा ‘भ्रम’ आता कंपन्यांनी दूर केला पाहिजे..

सध्या भारतीय बाजारात दर आठवडय़ाला २०-३० नवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. यातील काही नामांकित कंपन्यांचे असतात, तर काही कंपन्या नवीन स्मार्टफोननिशी प्रवेश करतात. जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ बनत चाललेल्या भारतात नवनवीन स्मार्टफोनची जंत्री पाहायला मिळत आहे; पण दुर्दैवाने ‘नवीन’ असं म्हणण्यासारखे स्मार्टफोन या भाऊगर्दीत फारच कमी आढळतात. कंपनीचे नाव सोडले तर बहुतांश स्मार्टफोनमध्ये उपलब्ध सुविधा या सारख्याच असतात. अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. एखादा फ्लॅगशिप फोन ग्राहकांची पसंती मिळवून गेला की, त्याच धर्तीवर इतर कंपन्या आपले स्मार्टफोन निर्माण करतात. यशाचे हे सुरक्षित सूत्र केवळ स्मार्टफोनच नव्हे, तर बाजारातील कोणत्याही उत्पादनाबाबत लागू पडते; परंतु अत्यंत झपाटय़ाने प्रगत होत असलेल्या मोबाइल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असे सूत्र राबवणे आणि त्यातून निर्माण केलेल्या उत्पादनांचा ग्राहकांवर मारा करणे, हे न पटण्यासारखे आहे. सध्या स्मार्टफोनच्या बाजारात अशीच परिस्थिती आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत स्मार्टफोनमधील फ्रंट कॅमेरा हा ग्राहक आणि उत्पादक कंपन्या या दोघांच्याही खिजगणतीत नव्हता. मोबाइलमधील अन्य सुविधांसोबत दिलेली एक सुविधा इथपर्यंत त्याचे कौतुक असायचे. मात्र, अचानक ‘सेल्फी’चा ‘शोध’ लागला आणि मोबाइलच्या पुढच्या कॅमेऱ्याला प्रचंड महत्त्व आलं. ज्या कंपन्या पूर्वी स्मार्टफोनला पुढच्या बाजूस ०.३ मेगापिक्सेल इतक्या क्षमतेचा कॅमेरा पुरवायच्या त्या गांभीर्याने पुढच्या कॅमेऱ्यातील छायाचित्रणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. तरुणाईमध्ये सेल्फीचं वेड वाढू लागल्याबरोबर स्मार्टफोनच्या पुढच्या कॅमेऱ्याची क्षमताही वाढू लागली. ती इतकी की, अलीकडे खास सेल्फीसाठी म्हणून विशेष मोबाइलची निर्मिती होऊ लागली आहे. याच पंक्तीत आता ‘जिओनि ए१ लाइट’ या स्मार्टफोनची भर पडली आहे.

जिओनि या कंपनीने गेल्या पाच-सहा वर्षांत भारतीय बाजारपेठेत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या कंपनीने नेहमीच नवनवीन वैशिष्टय़ांचा समावेश असलेल्या स्मार्टफोनच्या निर्मितीवर भर दिला आहे. अगदी ‘एस ५.५’पासून या वर्षी बाजारात आलेल्या ‘ए वन’ आणि ‘ए वन प्लस’ या स्मार्टफोनपर्यंत प्रत्येक स्मार्टफोनमध्ये त्या किंमत श्रेणीतील अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या तुलनेत काही तरी नवीन असेल, यावर जिओनिने नेहमीच लक्ष दिले. त्यामुळे या कंपनीचे स्मार्टफोन बाजारात नेहमीच चर्चेत राहिले. दुर्दैवाने ‘ए वन लाइट’ हा स्मार्टफोन जिओनिच्या वाटचालीत अपवाद ठरू शकतो. पुढच्या बाजूस २० मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन केवळ सेल्फीपुरता आहे व त्यापलीकडे त्यात नवं काही नाही, असं म्हणायला हरकत नाही. १४९९९ रुपये किमतीच्या श्रेणीत हा फोन बाजारात उपलब्ध आहे.

डिझाइन

‘ए वन लाइट’ हा दिसायला बऱ्यापैकी ‘ए वन’सारखाच आहे. धातूनी बनलेले बाह्य़ावरण, उजवीकडे आवाज आणि पॉवरची बटणे, डावीकडे सिमकार्ड ट्रे आणि खालच्या बाजूस हेडफोन जॅक आणि चार्जिग पोर्ट अशी या स्मार्टफोनची मांडणी आहे. मागील बाजूला कॅमेऱ्याखाली फिंगरप्रिंट स्कॅनर आणि त्याखाली स्पीकर अशी रचना यात पुरवण्यात आली आहे.

‘ए वन लाइट’मध्ये ५.३ इंच आकाराची एचडी आयपीएस एलसीडी स्क्रीन पुरवण्यात आली असून त्यावर गोर्रिला ग्लास बसवण्यात आली आहे. या फोनमध्ये जास्त क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली असली तरी, त्यामानाने फोन बऱ्यापैकी ‘स्लिम’ अर्थात हातात सहज मावेल असा आहे.

कॅमेरा आणि कामगिरी

जिओनि ए वन लाइटमध्ये पुढील बाजूस २० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. साहजिकच ‘सेल्फी’प्रेमींसाठी हा स्मार्टफोन आकर्षण ठरू शकतो. फ्रंट कॅमेऱ्यातील छायाचित्रणाचा दर्जाही अतिशय चांगला आहे. फ्रंट कॅमेऱ्याने काढलेली सेल्फी छायाचित्रे अतिशय सुस्पष्ट, उजळ आहेत. मागील बाजूचा कॅमेरा तुलनेने कमी क्षमतेचा असल्याने त्यातून काढलेली छायाचित्रे फार वेगळा अनुभव देत नाहीत.

अँड्रॉइड नोगट अर्थात ७.० ऑपरेटिंग सिस्टमसोबत ‘ए वन लाइट’मध्ये जिओनिची स्वत:ची ‘अमिगो यूआय ४.०’ ही प्रणालीही स्मार्टफोनचे कार्य सांभाळते. तो दर्जा जिओनिच्या अन्य स्मार्टफोनसारखा चांगला आहे. विशेषत: ‘अमिगो’मुळे वापरकर्त्यांला शेकडो वॉलपेपर आणि लॉकस्क्रीनचे पर्याय उपलब्ध होतात.

या फोनमध्ये १.३ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर असून तीन जीबी रॅम पुरवण्यात आली आहे. या फोनमध्ये ३२ जीबीची अंतर्गत साठवण क्षमता उपलब्ध करून देण्यात आली असून ती २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. त्यामुळे वारंवार चार्जिग करण्याची वेळ येत नाही. अर्थात स्मार्टफोनचा वापर जास्त असणाऱ्यांना विशेषत: फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा सतत वापर करणाऱ्यांना दिवसातून दोन-तीन वेळा चार्जिग करावे लागतेच. मात्र हा स्मार्टफोनचा नव्हे तर वापरकर्त्यांच्या सवयीचा दोष आहे, असे म्हणावे लागेल.

अनुभव

‘ए वन लाइट’ हा हाताळण्यास अगदी सोपा व वापरकर्त्यांला पटकन सराव होईल, असा स्मार्टफोन आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे पुढच्या बाजूचा कॅमेरा व्यवस्थित काम करतो. मागील बाजूच्या कॅमेऱ्यात नवीन काही नाही. या स्मार्टफोनची बॅटरी जास्त क्षमतेची असल्याने चार्जिगचा त्रास कमी होतो; परंतु त्यामुळे फोन पटकन तापत असल्याचे दिसून येते. अर्थात अलीकडे बाजारात आलेले बहुतांश स्मार्टफोन ‘ओव्हरहीटिंग’च्या समस्येने युक्त आहेत. त्यामुळे ही तक्रार सार्वत्रिक आहे.

थोडक्यात, ‘जिओनि ए वन लाइट’ हा सध्या बाजारात मिळणाऱ्या अन्य स्मार्टफोनच्या पंक्तीत सहज बसेल, असा स्मार्टफोन आहे. मात्र, या भाऊगर्दीतून उठून दिसावे, अशी कोणतीही लक्षणीय बाब या फोनमध्ये नाही. जिओनिने हा स्मार्टफोन बनवताना सेल्फीप्रेमी ग्राहकांवरच अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते; परंतु एखादी लाट जशी अचानक येते तशी ती अचानक ओसरतेही. याचे भान जिओनिने ठेवले पाहिजे. जिओनिच नव्हे, तर सध्या ‘सेल्फी’च्या स्पर्धेत चढाओढ करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विशेषत: अधिक चांगली कामगिरी, वेगवान ब्राऊजिंग, सुरक्षितता अशा विविध गोष्टींचा विचार ग्राहक मोबाइल खरेदी करताना करू लागले आहेत. अशा वेळी नेहमीची सुरक्षित वाट धरण्यापेक्षा काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न स्मार्टफोन कंपन्यांनी करायलाच हवा.

आसिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com