स्मार्टफोनच्या लुक आणि डिझाईनला अलीकडे प्रचंड महत्त्व आलं आहे. त्यामुळे स्मार्टफोन विविध वैशिष्टय़ांनी परिपूर्ण बनवतानाच तो दिसायला आकर्षक असेल, याची खबरदारी हॅण्डसेट निर्मात्या कंपन्यांना घ्यावीच लागते. जिओनीचा ‘एम ७ पॉवर’ मात्र वैशिष्टय़ांनी भरलेला आणि दिसायला आकर्षक आहेच, परंतु त्यासोबतच याची तब्बल पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनला २० हजार रुपयांखालील किंमत श्रेणीतील ‘पॉवर’फुल्ल स्मार्टफोन ठरवते.

बाजारात स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांची इतकी भाऊगर्दी झाली आहे की, अनेकदा दोन वेगवेगळ्या कंपन्या एकच असल्याचेही वाटू लागते. देशीविदेशी कंपन्यांकडून दर आठवडय़ाला नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल केले जात असल्याने ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्याच वेळी स्मार्टफोनची ठरलेली चौकट ओलांडून काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होतच असतो. यातलाच एक प्रयत्न म्हणजे ‘बेझेल लेस’ अर्थात चौकटविरहित डिस्प्ले असणारा स्मार्टफोन. स्मार्टफोनचा दर्शनी भाग काठोकाठ व्यापून टाकणारी स्क्रीन हे अलीकडे फोनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरत आहे. सर्वच नामांकित मोबाइल कंपन्या अशा प्रकारचा फोन निर्माण करण्याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. याच पंक्तीत जिओनीचा ‘एम ७ पॉवर’ हा फोन दाखल झाला आहे. ‘बेझेललेस डिस्प्ले’, अतिशय आकर्षक लुक, चार जीबी रॅम असलेल्या या फोनची सर्वात जमेची बाजू ही त्याची पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ह्य़ा फोनची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे.

डिझाईन व रचना – वर म्हटल्याप्रमाणे ‘एम ७ पॉवर’ला १८:९ अ‍ॅस्पेक्ट रेशिओ असलेला एचडी प्लस रेझोल्यूशन असलेला ‘बेझेललेस डिस्प्ले’ पुरवण्यात आला आहे. संपूर्णपणे अ‍ॅल्युमिनियमने घडवलेल्या बाह्य़ भागावर हा डिस्प्ले अगदी काठोकाठ बसवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या दर्शनातच ‘एम ७ पॉवर’ हा लक्ष वेधून घेतो. फोनची पुढची बाजू काचेने व्यापली आहे, तर मागील बाजूलाही चमकदार आवरण पुरवण्यात आले आहे. हा संपूर्ण ‘लुक’ काहीसा भडक वाटणारा असला तरी सध्या स्मार्टफोन हे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले असल्याने ग्राहकांना तो आवडू शकतो. या फोनचा डिस्प्ले १८:९ अ‍ॅस्पेक्ट रेशिओचा आहे. त्यामुळे या फोनवरून सिनेमा पाहण्याचा अनुभव सुखद आहे. थेट सूर्यप्रकाशातही फोनची स्क्रीन सुस्पष्ट दिसते.

फोनच्या पुढील बाजूस होम बटण पुरवण्यात आलेले नाही. त्याउलट डिस्प्लेवरच ही सुविधा पुरवण्यात आली आहे. आवाज आणि पॉवरची बटणे फोनच्या बाजूला आहेत. एकूण १९९ ग्रॅम वजनाचा हा फोन हातात घेतला की त्याच्या मजबूतपणाची आपोआप साक्ष पटते. त्याच वेळी तो जड वा जाड नाही, हेही महत्त्वाचे.

कामगिरी – ‘एम ७ पॉवर’ हा अँड्रॉइड ७.१.१ नोगट ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असून त्याला जिओनीच्या अमिगो ५.० स्क्रीनची जोड देण्यात आली आहे. अमिगोमुळे या फोनवर तुम्हाला वॉलपेपर, थीम्सचे असंख्य पर्याय धुंडाळता व हाताळता येतात. या फोनमध्ये १.४ गिगाहार्ट्झचा ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असून त्याला चार जीबी रॅमची जोड मिळाल्याने फोनची कार्यक्षमता चांगली आहे. ‘एम ७ पॉवर’मध्ये ६४ जीबीची अंतर्गत स्टोअरेज असून ती मायक्रोएसडी कार्डसह २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. त्यामुळे फोनमध्ये जागेची चणचण जाणवत नाही. विविध प्रकारच्या अ‍ॅपनी फोनची निम्मी अंतर्गत जागा व्यापली तरी उरलेल्या ३२ जीबीसह हा फोन व्यवस्थित काम करतो.

या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा व एलईडी फ्लॅश पुरवण्यात आला असून पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याबाबतीत ‘एम ७’ची ‘पॉवर’ काहीशी कमी पडल्याचे जाणवते. गेल्या काही महिन्यांत जिओनीने कॅमेरा हे वैशिष्टय़ केंद्रस्थानी मानून अनेक स्मार्टफोनची निर्मिती केली. त्या स्मार्टफोनमधून काढलेली छायाचित्रे अतिशय सुस्पष्ट व योग्य रंगसंगती असलेली आढळतात. मात्र, ‘एम ७ पॉवर’मध्ये कॅमेऱ्याच्या बाबतीत हे सांगता येत नाही. फोनचा कॅमेरा त्याच्या क्षमतेच्या मानाने व्यवस्थित काम करतो; परंतु त्यात काही वेगळेपण नसल्याने स्मार्टफोनमधील कॅमेराप्रेमी कदाचित या फोनला पसंत करणार नाहीत. विशेषत: ज्या किंमत श्रेणीत हा फोन उपलब्ध आहे, त्या किमतीत उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्यांचा दर्जा अधिक चांगला आहे. त्यामुळे कॅमेऱ्याच्या बाबतीत ‘एम ७ पॉवर’ काहीसा कमकुवत वाटतो. या फोनच्या कॅमेऱ्यात ‘थ्रीडी’ फोटो काढण्याची सुविधाही पुरवण्यात आली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही एखादी वस्तू वा वास्तू यांचे तीन बाजूंनी युक्त छायाचित्र काढताच संबंधित वस्तू थ्रीडीमध्ये दिसू लागते.

‘यूजर इंटरफेस’ हे या फोनचे वेगळेपण आहे. वेगळ्या ‘इंटरफेस’मुळे या फोनवरील अ‍ॅपचे आयकॉन अँड्रॉइडच्या अन्य फोनपेक्षा वेगळे दिसतात. तसेच या फोनमध्ये अनेक अ‍ॅप आधीच इन्स्टॉल केलेले आहेत. त्यात ट्रकॉलरसह, जी स्टोअर, टचपाल, गाना अशा अ‍ॅपचा समावेश आहे. मात्र, काही प्रमाणात हा यूजर इंटरफेस त्रासदायक ठरतो. विशेषत: या फोनच्या लॉक स्क्रीनवर झळकणारे वॉलपेपर आणि त्यासोबत संबंधित दृश्याबद्दल पुरवलेली माहिती हा वापरकर्त्यांसाठी कंटाळवाणा व ‘रॅम’खाऊ भाग वाटू शकतो. एक म्हणजे, वापरकर्त्यांला स्वत:च्या आवडीची छायाचित्रे वॉलपेपर म्हणून लावायला आवडत असतात. अशा वेळी ‘एम ७ पॉवर’ स्वत:च वॉलपेपर निवडत असल्यामुळे हा पर्याय नकोसा वाटू लागतो. अर्थात तो बंद करण्याची व्यवस्था फोनमध्ये आहे; परंतु मुळात हे वैशिष्टय़च अनावश्यक होते, असे वाटते.

बॅटरी – या फोनमध्ये पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर किमान दोन दिवस टिकते. म्हणजे, तुम्ही गेम, गाणी, व्हिडीओ, सोशल मीडिया यांचा सतत वापर करूनही तुम्ही दोन दिवस चार्जिगशिवाय फोन वापरू शकता. सध्या स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि त्या तुलनेत बॅटरी कमजोर असणे हा विरोधाभास ‘एम ७ पॉवर’मधून नाहीसा झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे, हे सर्व अ‍ॅप्स वापरत असताना फोनच्या कार्यक्षमतेतही अजिबात उणीव जाणवत नाही.

आसिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com