भारतीय बाजारपेठेसाठी परवडणाऱ्या किंमत श्रेणीतील तसेच आकर्षक वैशिष्टय़े असलेल्या स्मार्टफोनच्या निर्मितीचा सपाटा लावणाऱ्या जिओनी कंपनीचा ‘एम ७ पॉवर’ हा नवीन स्मार्टफोन या आठवडय़ात येऊ घातला आहे. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जिओनीने ‘एम ७ पॉवर’ची झलक दाखवली होती. आता प्रत्यक्षात हा फोन १५ नोव्हेंबर रोजी भारतात दाखल होणार आहे.

१८:९ असा ‘अ‍ॅस्पेक्ट रेशिओ’ असलेला पूर्ण डिस्प्ले हे ‘एम ७ पॉवर’चे प्रमुख वैशिष्टय़ आहे. सुमारे १५ बाय ७ सेमी आकाराच्या या स्मार्टफोनमध्ये सहा इंचांचा डिस्प्ले पुरवण्यात आला असून तो स्मार्टफोनचा पूर्ण दर्शनी भाग व्यापून टाकतो. या स्मार्टफोनला ‘होम’ बटणचीही सुविधा नसून टचस्क्रीनच्या साह्य़ाने वापरकर्त्यांना तो हाताळता येतो. स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर पुरवण्यात आला आहे.

या फोनमध्ये १.४ गिगाहार्ट्झ क्षमतेचा ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर पुरवण्यात आला असून चार जीबी रॅम आणि ६४ जीबी फोन मेमरी यामुळे हा स्मार्टफोन शक्तिशाली बनला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोअरेज क्षमता २५६ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधाही यात पुरवण्यात आली आहे.

‘एम ७ पॉवर’चा मागील कॅमेरा १३ मेगापिक्सेल असून त्यामध्ये फेज डिटेक्शन ऑटो फोकस आणि एलईडी फ्लॅशची सुविधा पुरवण्यात आली आहे, तर पुढील बाजूला आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. या कॅमेऱ्यामध्ये स्लो मोशन, ग्रुप सेल्फी, टाइम लॅप्स, नाइट मोड, कार्ड स्कॅनर अशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

‘एम ७ पॉवर’ हा डय़ूअल सिम स्मार्टफोन असून त्यापैकी एका सिम स्लॉटचा वापर मायक्रो एसडी कार्डसाठी करता येतो. अँड्रॉइड नोगट या अँड्रॉइडच्या अद्ययावत कार्यप्रणालीखेरीज ‘एम७ पॉवर’ जिओनीच्या अमिगो ५.० या कार्यप्रणालीवर संयुक्तपणे काम करतो. या फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे याची बॅटरी तब्बल ५ हजार एमएएच क्षमतेची आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना बराच काळ तो चार्जिगविना वापरता येऊ शकतो. याखेरीज

यूएसबी ओटीजी, एफएम रेडिओ, गायरोस्कोप अशा नेहमीच्या वैशिष्टय़ांनी हा फोन परिपूर्ण बनला आहे. जिओनीने या फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत हा फोन किमतीसह भारतीय बाजारात सादर होणार आहे.

‘व्ही ७ प्लस’ नव्या रंगात

व्हिवो या कंपनीचा ‘व्ही ७ +’ हा स्मार्टफोन बुधवारपासून नव्या निळय़ा रंगात भारतीय बाजारात दाखल होत आहे. बुधवारपासून सर्व दुकानांत उपलब्ध होणार असला तरी १४ नोव्हेंबर, मंगळवापर्यंत तो अ‍ॅमेझॉन या ईकॉमर्स संकेतस्थळावर विक्रीस उपलब्ध आहे. या फोनची किंमत २१९९० रुपये इतकी आहे.

पेटीएमवर ‘भीम’ची सुविधा

पेटीएमने आपल्या मंचावरून भीम यूपीआयचा उपयोग करून पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. वापरकर्ते अ‍ॅपवर स्वत:चा ‘पेटीएम भीम यूपीआय आयडी’ तयार करू शकतील, जो पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारा जारी करण्यात येईल. पेटीएम वापरकर्ते कोणत्याही बँकेतील आपले बचत खाते या अनोख्या पेटीएम भीम यूपीआय आयडीसह संलग्न करून पेमेंटची देवाणघेवाण सुरू करू शकतात. पेटीएम भीम यूपीआय आयडी हे सर्व बँकांमध्ये आणि भीम यूपीआय अ‍ॅपवर स्वीकृत आहे.

वापरकर्त्यांना पेटीएम अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर भीम यूपीआय विभागात जाऊन आपला यूपीआय आयडी तयार करता येईल. हे आयडी वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर असतील. पेटीएम भीम यूपीआयच्या मदतीने वापरकर्ते आता लाभार्थी जोडण्याकरिता वेळ न घालवता दोन बँकांच्या खात्यांत थेट, सहज आणि त्वरित पैसे हस्तांतरित करू शकतात. पैसे स्वीकारण्यासाठी त्यांना आता बँक खात्याचे तपशील आणि आयएफसी कोड कोणाला देण्याची गरज नाही. यामुळे पेटीएमच्या असंख्य वापरकर्त्यांना अधिक विकल्प, अधिक सुगमता आणि सुविधेसह डिजिटल पद्धतीने व्यवहार करता येऊ  शकतील.