आपला साधा टीव्ही स्मार्ट बनवण्याची क्षमता असलेले अनेक डोंगल्स बाजारात उपलब्ध आहेत. याच जोडीला आता गुगलने त्यांची क्रोम ही ऑपरेटिंग प्रणाली असलेला क्रोमबीट असूसच्या मदतीने बाजारात आणला आहे. एचडीएमआय जोडणीद्वारे उपलब्ध असलेला हा क्रोमबीट कसा आहे ते पाहूयात.
आपण गुगलवर अँड्रॉइड डोंगल असे सर्च केले तर अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली असलेल्या डोंगल्सचे शेकडो पर्याय तुम्हाला समोर दिसतात. यामुळे तुमचा जुना टीव्हीही अगदी स्मार्ट होऊ शकतो. पण गुगलचीच दुसरी संगणकीय ऑपरेटिंग प्रणाली म्हणजे क्रोमसाठी गुगलने असूसच्या मदतीने क्रोमबीट बाजारात आणले आहे. यामुळे लॅपटॉपच्या पलीकडे जाऊन क्रोम ऑपरेटिंग प्रणालीचा वापर आपण करू शकतो. एखाद्या एचडीएमआय पोर्ट असलेल्या मॉनिटरला आपण हे क्रोमबीट जोडले की तो मॉनिटर आपल्याला घरगुती वापरासाठीचा संगणक बनू शकतो.

हार्डवेअर
स्वस्तात उपलब्ध करून देण्यात आलेला क्रोमबुक फिल्पच्या आधारावर आपण क्रोमबीटच्या हार्डवेअरचा विचार करू शकतो. यामध्ये क्वाडकोर रॉकचिप आरके३२८८-सीचा चिपसेट बसविण्यात आला आहे. याचबरोबर यामध्ये दोन जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये माली टी७६० जीपीयू आणि १६ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आलेली आहे. हे क्रोमबीट वापरण्यासाठी आपल्याला एचडीएमआय पोर्टची जोडणी देण्यात आली आहे.

असा होतो वापर
ज्या वेळेस आपण हे एखाद्या पॉवर सोर्सला जोडतो तेव्हा पाच ते सहा सेकंदांचा वेळ जातो. हे वापरण्यासाठी सुरुवातीला आपल्याना ब्लूटूथद्वारे माउस आणि कीबोर्ड जोडणी करण्यास सांगितले जाते. ही जोडणी झाल्यानंतर आपण वाय-फाय जोडणी करू शकतो. मग गुगल अकाउंटच्या मदतीने आपण पुढचा वापर सुरू करू शकतो. हे करत असताना आपल्याला नियम व अटी मान्य कराव्या लागतात. हे क्रोमबीट तुम्ही एचडीएमआय पोर्ट असलेल्या टीव्हीला किंवा मॉनिटरला जोडू शकता. ही जोडणी एकदा यशस्वी झाली की तुम्हाला तुमचा टीव्ही हा संगणक म्हणून वापरता येऊ शकतो.

रचना
इंटेलने यापूर्वी विंडोज ऑपरेटिंग प्रणाली असलेली एक स्टिक बाजारात आणली होती. त्याच आधारावर क्रोमबीटपण संगणक चालवणारी एक स्टिक समजली जाऊ शकते. क्रोमबीट म्हणजे इतर पोर्टेबल डोंगल्सपेक्षा लहान आणि बारीक आहे. यामुळे ती हाताळणे सोपे जाते. असूसच्या क्रोमबीटची ही खासियत लक्षात घेऊन त्याला खिशात मावणारा सीपीयू असेही म्हणता येऊ शकते.

कामाचा दर्जा
या डोंगलच्या माध्यमातून आपण केलेली संगणकीय जोडणी ही इतर संगणकांचा वेग साधू शकत नाही. मात्र संगणकाचा वापर नव्याने करणाऱ्यांसाठी हे क्रोमबीट नक्कीच उपयुक्त ठरू शकते. यामध्ये आपल्याला इंटरनेट वापरण्यसाठी क्रोमचे ब्राउझर देण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्याला एका वेळी अनेक गोष्टी करणे तसे अवघड जाते. मात्र एका वेळी एक काम करणे सोपे जाते. कामाला वेगही मिळतो. यामध्ये आपण ई-मेल्स करणे, गाणी ऐकणे अशा सर्व वेबवर उपलब्ध गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो.
थोडक्यात
तुम्हाला संगणकाचा वापर मर्यादित स्वरूपात करावयाचा असेल तर तुम्ही नक्कीच या पर्यायाची निवड करू शकता. मात्र हा पर्याय डेस्कटॉप किंवा लॅपटॉपसाठी पर्याय ठरू शकत नाही.
किंमत : ७९९९ रुपये.

नीरज पंडित – niraj.pandit@gmail.com