मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. अनेकदा आमच्याकडे वेगवेगळय़ा प्रकारच्या आकृत्या येत असतात. त्यातील काही आकृत्यांचा संदर्भ लागत नाही. तो जर गुगलवर सर्च करायचा असेल तर त्याचे कळशब्द माहिती असणे अपेक्षित आहे. पण ते माहिती नसतील तर छायाचित्रावरून गुगल सर्च करता येऊ शकेल का? – माणिक राऊत, औरंगाबाद.

उत्तर : छायाचित्रावरून गुगल सर्च करणे सहज शक्य आहे. यासाठी तुम्हाला images.google.comया संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे गेल्यावर तुम्हाला शोध चौकट दिसेल. त्या चौकटीवर तुम्ही कळशब्द देऊन शोधू शकता. अन्यथा त्याच्या उजव्या कोपऱ्याला कॅमेराचे चित्र दिलेले आहे. त्यावर क्लिक करा. ते क्लिक केल्यावर तुम्हाला ‘पेस्ट इमेज यूआरएल’ आणि  ‘अपलोड अ‍ॅन इमेज’ असे दोन पर्याय येतात. यात दुसरा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या संगणकात सेव्ह करून ठेवलेले छायाचित्र अपलोड करून ते नेमके कसले छायाचित्र आहे याचा शोध घेऊ शकता.

माझ्या मोबाइलमधील मेमरी कार्ड माझा मोबाइल सोडून इतर मोबाइलमध्ये चालते. पण माझ्या मोबाइलमध्ये चालत नाही काय करता येईल.- कल्पेश पवार

उत्तर : तुमचे मेमरी कार्ड इतर मोबाइलमध्ये चालते याचा अर्थ मेमरी कार्डमध्ये नाही तर मोबाइलमध्ये काही तरी समस्या आहे. तुमच्या मोबाइलमधील मेमरी कार्ड रिडर काम करत नसेल. तसे असेल तर तुम्हाला ते बदलावे लागेल.

माझ्याकडे रेडमी नोट ३ हा फोन आहे. माझे सर्व फोटो गुगल फोटो या अ‍ॅपमध्ये सेव्ह होतात. ते गॅलरीमध्ये पाहायचे असतील तर मला डाउनलोड करावे लागतात. मला तसे नको आहे. तर काय करता येईल. जर ते अ‍ॅप डिलिट केले तर फोटो आणि मेसेज परत मिळू शकतील का? – प्रसाद भिसे

उत्तर : हे अ‍ॅप अनइन्स्टॉल होऊ शकत नाही. ते तुम्ही डिसेबल करू शकता. पण या अ‍ॅपमध्ये फोटो सेव्ह राहिल्यामुळे तुमच्या मोबाइलची मेमरी वाचते व ते फोटो तुम्ही संगणकावरही या अ‍ॅपच्या माध्यमातून पाहू शकता. जर तम्हाला ते नकोच असेल तर सेटिंग्जमध्ये जाऊन डिफॉल्ट स्टोअरेज मधून गुगल फोटोचा पर्याय काढून टाका व तेथे एसडी कार्ड हा पर्याय निवडा. म्हणजे तुमचे फोटो गुगल फोटोमध्ये सेव्ह हाोणार नाहीत. तसेच गुगल फोटोमध्येही सेव्ह करून तुम्ही डाउनलोड न करताही पाहू शकता. यासाठी गुगल फोटोमध्ये सेटिंग्जमध्ये जाऊन फोटो ड्राइव्हमध्ये सेव्ह करण्याचा पर्याय असेल तो डिसएबल करा. म्हणजे तुमचे फोटो ऑफलाइन सेव्ह राहतील.