सार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापरत असताना उपकरणामध्ये कोणती काळजी घ्यायची हे मला माहिती आहे. पण सार्वजनिक वाय-फाय वापरताना कोणती काळजी घेता येईल हे सूचवा.

– निशांत खासनीस 

अँड्रॉइड उपकरण हॅकर्सपासून वाचविण्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे नेटवर्क सुरक्षेची. सध्या अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा दिली जाते. पण मोफत वाय-फायचे नेटवर्क शंभर टक्के सुरक्षित असतेच असे नाही. यामुळे शक्यतो ते वापरणे टाळा. अगदीच तुम्हाला वापरायचे असेल तर त्या नेटवर्कचा वापर करून बँकिंगचे व्यवहार करणे टाळा. कारण अशा ठिकाणी हॅकर सहजपणे तुमच्या फोनमधील माहिती उचलून घेऊ शकतो. यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमची माहिती हाइडनिंजा व्हीपीएनसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून वाचवू शकता. या अ‍ॅप्समुळे तुमच्या माहितीचे आऊटगोइंग कनेक्शन हे नेहमी एनक्रिप्टेड असेल. या अ‍ॅप्समुळे कुणालाही सहजासहजी तुमची माहिती मिळवता येणार नाही.  याचबरोबर तुम्ही वायफाय प्रोटेक्टरसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून खुल्या वायफाय जोडणीतील सुरक्षित जोडणी मिळवू शकता.

माझ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या आयकॉनवरील संदेशांचा आकडा जातच नाही. मी सर्व संदेश वाचले आहेत, तरीही एक आकडा कायम राहतो. त्यावर काय उपाय आहे.

-सोनली पवार, आंबिवली

अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर ही अडचण येते. तो एक प्रकारचा व्हायरसही असू शकतो. अशावेळी तुम्ही सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप मॅनेजरमध्ये जा. तेथे व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप निवडून क्लीअर डेटा हा पर्याय निवडा. यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. तरीही तुमच्या आयकॉनवर तो आकडा झळकत असेल तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन डेव्हलपर ऑप्शन निवडा. तेथे ‘डू नॉट कीप अ‍ॅक्टिव्हिटी’ या पर्यायासमोर टिक करा. जर तुम्हाला ‘डेव्हलपर ऑप्शन’ उपलब्ध नसेल तर मग तुम्ही हे करू शकणार नाहीत. याशिवाय आणखी एक पर्याय म्हणजे सेटिंग्जमध्ये जाऊन ‘बॅज प्रोव्हायडर’चा पर्याय निवडा त्याचा ‘डेटा क्लीअर’ केला तरी तुमच्या आयकॉनवरील आकडे जाऊ शकतील. तरीही नाही झाले तर तुम्ही संपूर्ण व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल करून ते पुन्हा इन्स्टॉल करावे. याने तुमची अडचण दूर होऊ शकते.

या सदरात प्रश्न पाठविण्यासाठी lstechit@gmail.com वर लॉगइन करा.