‘चॅटिंग’ म्हटलं की ‘व्हॉट्सअ‍ॅप’ असं एक सरळ समीकरण बनलं आहे; पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘चॅटिंग’ = ‘जी चॅट’ असं आणि त्याआधी ‘चॅटिंग’ = ‘याहू’ अशी समीकरणं रूढ झाली होती. सांगायचा अर्थ असा की, ‘चॅटिंग’साठीचे तंत्रज्ञान आज वेगाने बदलत आहे. त्यामुळे ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा पर्यायही कालांतराने कालबाह्य़ ठरू शकतो. अशा वेळी ‘एन-गेज’ नावाचं अ‍ॅप येत्या काळातील चॅटिंगचं प्रभावी माध्यम ठरू शकेल.

‘झटपट संवाद’ किंवा ‘इन्स्टंट मेसेजिंग’ ही संकल्पना आता नवीन राहिलेली नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आणि स्मार्टफोनवरून एकमेकांशी शब्दसंवाद करणं अतिशय सुगम बनलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप, वुईचॅट, फेसबुक मेसेंजर, जीमेल चॅट किंवा अशा अनेक अ‍ॅप्सच्या माध्यमांतून ‘इन्स्टंट मेसेजिंग’ केलं जातं. पाठवण्यास सोपा, झटपट पोहोचण्याची हमी आणि इंटरनेट वापराचा कमी खर्च या गोष्टींमुळे ‘इन्स्टंट मेसेजिंग’ कमालीचं प्रभावी माध्यम ठरत आहे. आजकाल इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या गोष्टीसाठी होत असेल तर ते ‘चॅटिंग’ आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस ‘चॅटिंग’च्या अ‍ॅपमध्ये भर पडत आहे. भारतासारख्या देशात ‘व्हॉट्सअ‍ॅप’ लोकप्रिय होऊ लागलं तसे ‘लाइन’, ‘हाइक’, ‘वायबर’ अशी ‘अ‍ॅप’ उपलब्ध होऊ लागली. यातच आता ‘एन-गेज’ (ल्ल-ॠंॠी) या अ‍ॅपची भर पडली आहे.

वरवर सांगायचं झालं तर हे अ‍ॅप अन्य चॅटिंग अ‍ॅपप्रमाणेच मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाइल्स पाठवण्याचं काम करतं. मात्र, सर्वसामान्य चॅटिंग अ‍ॅपपेक्षाही ‘एन-गेज’ अनेक बाबतीत पुढे असल्याचे त्याच्या वैशिष्टय़ांवर नजर टाकल्यास दिसून येतं.

‘एन-गेज’ अ‍ॅपचं सर्वात मोठं वैशिष्टय़ त्यातील संदेशांची गोपनीयता हे आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ किंवा अन्य कोणतेही चॅटिंग अ‍ॅप असेल तर त्यातून पाठवलेले संदेश इतरांनाही पाहायला मिळतात. मात्र, ‘एन-गेज’ला पासवर्ड संरक्षण असल्याने वापरकर्त्यांचा मोबाइल इतर कुणाच्या हातात पडला तरी त्याला हे संदेश वाचता येणार नाहीत. त्याचप्रमाणे ‘सेफ चॅट’च्या माध्यमातून योग्य व्यक्तीच तुमचा संदेश वाचू शकते, याची हमी तुम्हाला ही सुविधा देते. दुसरं म्हणजे, आपण लोकलमधून किंवा बसमधून प्रवास करत असताना ‘चॅटिंग’ करत असलो की शेजारच्या प्रवाशाची नजर आपल्या मोबाइलवरच खिळलेली असते. अशा वेळी ‘एन-गेज’ तुम्हाला ‘एन्क्रिप्शन’ची अनोखी सुविधा देते. त्यानुसार तुम्ही टाइप करत असलेला संदेश प्रत्यक्ष स्क्रीनवर विचित्र लिपीत दिसतो. त्यामुळे तुम्ही काय टाइप करत आहात, हे इतरांना कळू शकत नाही. या अ‍ॅपचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, एखाद्या वेळी चुकीच्या व्यक्तीकडे तुमचा संदेश गेला किंवा एखाद्यासोबतचा तुमचे संभाषण तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणीत आणू शकणार असेल तर तुम्ही केवळ तुमच्याच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या मोबाइलवरील संबंधित संभाषण किंवा संदेश मिटवून टाकू शकता. ‘सेल्फ डिस्ट्रक्शन’ नावाची ही सुविधा ‘एन-गेज’ने पुरवली आहे. ही सुविधा म्हणजे संदेशांच्या गोपनीयतेबाबत आपल्यापैकी सर्वानाच वाटणाऱ्या चिंतेचे अचूक समाधान आहे. याखेरीज या अ‍ॅपमध्ये ‘शेडय़ूल्ड मेसेज’ अशी सुविधा असून तुम्ही अमुक एका वेळ आधीच निश्चित करून त्या वेळी संदेश संबंधित व्यक्तीपर्यंत जाईल, अशी व्यवस्था करू शकता.

खरं तर ‘एन गेज’बाबत सांगितलेली सुरक्षेची वैशिष्टय़े त्याची उपयुक्तता सिद्ध करण्यास पुरेशी आहेत, पण याही पलीकडे हे अ‍ॅप बऱ्याच सुविधा पुरवते. वापरकर्त्यांना अधिकाधिक चॅटिंगचा आनंद देण्यासाठी या अ‍ॅपमध्ये ‘एन कार्ड्स’, ‘एन स्टिकर्स’, ‘चॅट मेकओव्हर’, ‘डुडल प्लस’ अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुविधांच्या नावानुसार तुम्ही कोणालाही आकर्षक चित्रे, कार्टून, क्लिपआर्ट, स्वत: काढलेले चित्र संदेश म्हणून पाठवू शकता. ‘एन गेज’मध्ये ४५ भाषांची सुविधा उपलब्ध असून ‘ट्रान्स्लेट’ या सुविधेद्वारे तुम्ही कोणत्याही भाषेतील संदेश आपल्याला समजेल त्या भाषेत भाषांतरित करून वाचू किंवा पाठवू शकता.

या अ‍ॅपचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे ‘एन गेज’ अ‍ॅप असो वा नसो तुम्ही त्या व्यक्तीला या अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ संदेशच नव्हे तर व्हिडीओ कॉल किंवा कॉलही लावू शकता. ‘अक्रॉस द प्लॅटफॉर्म’ चालणारे असे हे एकमेव अ‍ॅप असावे. या अ‍ॅपचा ‘इंटरफेस’ अतिशय सुटसुटीत असून तो पटकन हाताळताही येतो. दुसरे म्हणजे, या अ‍ॅपमध्येच बातम्या, चालू घडामोडी, जीवनशैली व आरोग्याशी संबंधित माहिती जाणून घेण्याची आणि ती इतरांसोबत शेअर करण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे.

एवढे सगळे चांगले पुरवणाऱ्या अ‍ॅपमध्ये काही तरी त्रुटी असणारच. ती त्रुटी म्हणजे या अ‍ॅपच्या सुविधांसाठी मोजावे लागणारे शुल्क. वर सांगितलेल्या अनेक सुविधा या अ‍ॅपमध्ये सक्रिय करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. वरील सुविधांवर नजर टाकल्यास अशा उपयुक्त अ‍ॅपसाठी पैसे मोजणे खरे तर चुकीचे नाही. मात्र, जास्तीत जास्त वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘एन गेज’ने नि:शुल्क किंवा अतिशय माफक किमतीत या सुविधा पुरवल्यास हे अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअ‍ॅपने सुरुवातीच्या वर्षभरातच तो निर्णय घेऊन ‘इन्स्टंट मेसेजिंग’च्या दुनियेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ‘एन गेज’ला तसे करणे जमले तर हे भविष्यातील सर्वात प्रभावी चॅटिंग अ‍ॅप ठरेल, यात शंका नाही.

asif.bagwan@expressindia.com