ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी संकेतस्थळ क्रॅश झाले अशा बातम्या नित्याच्याच. पण एखादा गेम बाजारात आला आणि तो डाऊनलोड करण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे कंपनीचे सव्‍‌र्हर वारंवार क्रॅश होऊ लागले अशी घटना मागच्या आठवडय़ात पहिल्यांदाच घडली. निमित्त झाले ते निएन्टीक आणि निनटेण्डो या कंपनीने अ‍ॅप बाजारात आणलेल्या पॉकेमॉन गो या गेमचे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या या गेमने अवघ्या सात दिवसांमध्येच लोकप्रियतेचे शिखर गाठले आणि हा गेम डाऊनलोड करण्यासाठी अ‍ॅप बाजारात एकच गर्दी उसळली. यामुळे पुन्हा एकदा ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित गेम्सची चर्चा सुरू झाली. पाहुयात ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित असे कोणते गेम्स आहेत.

पॉकेमॉन गो
मागच्या आठवडय़ात ‘पॉकेमॉन गो’ हा गेम समाज माध्यमांवर चांगलाच वायरल झाला. हा खेळ वास्तवात ‘जिओ कॅचिंग’च्या साहाय्याने चालता चालता आजूबाजूच्या ‘पॉकेमॉन’ पात्रांना आपल्या मोबाइलमध्ये कैद करायचे आहे. हा गेम कंपनीने अधिकृतरीत्या ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि न्यूझीलंड या देशांत लाँच करण्यात आला आहे. इतर देशांतील मोबाइलधारकांना ‘एपीके फाइल’द्वारे हा गेम खेळता येतो. असे असले तरी तो अधिकृतपणे खेळता येत नाही. यामुळे या गेममधील अनेक गोष्टींपासून एपीके फाइलधारकांना उपलब्ध होत नाहीत. या गेमची लोकप्रियता इतक्या मोठय़ा प्रमाणावर झाली की अधिकृतपणे बाजारात दाखल झाल्यावर अवघ्या सात दिवसांमध्ये अनेकांनी हा गेम डाऊनलोड करण्यासाठी गर्दी केली आणि गेमचे सव्‍‌र्हर क्रॅश झाले. यामुळे कंपनीने इतर देशांमधील गेमचे अधिकृत लाँच थांबवून ठेवले. ज्या देशांमध्ये हा गेम उपलब्ध झाला आणि ज्यांनी डाऊनलोड केला असे लोक या गेमसाठी इतके वेडे झाले की अमेरिकेत पॉकेमॉन गो हा गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनधारक दिवसाला ४३ मिनिटे खर्च करू लागला. पण पॉकेमॉनच्या आधी लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम या अ‍ॅपवर वापरकर्ते अनुक्रमे दिवसाला ३० आणि २५ मिनिटे खर्च करतात. गेमच्या लोकप्रियतेमुळे निनटेण्डो आणि निएन्टिक लॅब या दोन्ही कंपनींच्या समभागाचे दर शेअर बाजारात ५० टक्क्यांनी वाढले. अमेरिकेतील आयफोनधारकांकडून या गेमला पहिल्या सात दिवसांतच सोळा लाख डॉलर्सची कमाई झाली. निनटेण्डोच्या गेमिंग कन्सोलवर खेळता येणाऱ्या पॉकेमॉन या गेमची ही पुढची आवृत्ती असून हा गेम मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वप्रथम १९९५ मध्ये हा व्हिडीओ गेम तयार झाला होता. यानंतर या गेमच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली की या गेमवरुन कार्टून मालिका आणि पुस्तके प्रसिद्ध झाली. या गेममध्ये विविध पात्र असून त्याला समकक्ष पात्रे आपण प्रवास करत असताना आपल्याला टिपायची आहेत. ती पात्रे आपल्या जवळ आल्यावर आपल्याला सूचितही केले जाते. हा गेम इतर गेमपेक्षा वेगळा असला तरी हा गेम खेळण्यासाठी बॅटरी आणि डेटा पॅक खूप खर्च होतो. याचबरोबर या गेमच्या सुरक्षिततेचा मुद्दाही आता डोके वर काढू लागला आहे.

इनग्रेस
पॉकेमॉन गो विकसित करणाऱ्या निएन्टिक लॅब्ज या कंपनीनेच इनग्रेस हा पहिला ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित गेम मोबाइल बाजारात आणला होता. या गेममध्ये तुमचे विश्व अनाकलनीय आणि कारस्थान या दोन भागात विभागले जाते. गेमच्या कथेनुसार एक अशी शक्ती सर्वत्र पसरते की ज्याच्यामुळे सजीवसृष्टीत मोठा गोंधळ उडतो. मग आपल्याला यापासून सर्वाचा बचाव करायचा असतो. या गेमच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आसपासच्या अनाकलनीय अशा कृत्रिम गोष्टींचा शोध घ्यायचा असतो. हा शोध घेताना आपल्याला संगणकीय शक्तीचीही मदत होते.

झोम्बी रन
तुम्हाला सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करणारे हे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपरूपी गेममध्ये आपण जेव्हा चालत असतो तेव्हा आपल्या मागे कोणी तरी लागले आहे असे भासवत आपल्याला आपण निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहचण्यास मदत करत असते. यामुळे आपण अधिक चालतो आणि आपला निरोगी राहण्याचा मार्ग मोकळा होतो असा सिद्धांत या गेमच्या मागे मांडण्यात आला आहे. हा गेम प्रामुख्याने ऑडिओ स्वरूपात असून आपण चालत असताना गेम सुरू करून हेडफोन लावून गेम खेळला जाऊ शकतो.

रिअल स्ट्राइक
यी इंटरनॅशनल या कंपनीने हा गेम विकसित केला असून तो लष्करावर आधारित आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या थ्रीडी बंदूक अ‍ॅनिमेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या भोवती युद्धभूमी अवतरल्याचा अनुभव घेऊ शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे २५ हत्यारे असून त्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले लक्ष्य साधायचे आहे. यात बंदुकीतून गोळ्या झाडणे, पुन्हा गोळ्या भरणे अशा विविध गोष्टी अ‍ॅनिमेटेड स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने त्या अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येऊ शकतात. याशिवाय यामध्ये नाइट व्हिजन, थर्मल व्हिजन असे विविध प्रकारही दिसतात.

लाइफ इज क्राइम
गुन्हेगारी जगतात रमविणारा हा थरार गेम आहे. हा गेम पॉकेमॉन गो सारखाच आभासी विश्वात सत्याचा अनुभव देणारा आहे. हा गेम गुन्हेगारी टोळ्या आणि गुन्हेगार यांच्यावर तयार करण्यात आला आहे. ज्यांना चित्रपटांमध्ये हिरोपेक्षा खलनायकाची भूमिका आवडते ती मंडळी हा गेम खूप चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या गेममध्ये तुम्हाला तुमच्या टोळीविरोधात सामना करावयाचा आहे. यात तुम्ही बाहेरील खेळाडूलाही सहभागी करून घेऊ शकता आणि त्याच्याशी लाइव्ह चॅटही करू शकता. हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी जास्तीत जास्त खेळाडू असणे आवश्यक असते.

हे सर्व गेम खेळण्यासाठी चांगल्या दर्जाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असलेले मोबाइल लागतात. मात्र भारतात स्वस्त फोन घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे भारतीय बाजारपेठेत हे गेम्स फारसे लोकप्रिय होऊ शकले नाहीत. भारतीयांसाठीही पॉकेमॉन गो सोडून इतर गेम उपलब्ध असले तरी त्यांना भारतातून फारसे डाऊनलोड्स मिळत नाहीत.
नीरज पंडित – Niraj.pandit@expressindia.com