माहिती देण्यासाठी कोणी उपलब्ध होत नसेल तर गुगल सर्च करून ती माहिती मिळवली जाते. इतकेच काय तर अँड्रॉइड मोबाइल, गुगल मॅप, गुगल ड्राइव्ह, यू-टय़ुब या सर्व अ‍ॅपवर तुम्ही काय करता याचा तपशीलही गुगलकडे साठवलेला असतो. याची पुसटशी कल्पना आपल्याला आहेच. पण हा तपशील एक नाही दोन नाही तर तब्बल २० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा उपलब्ध आहे. आता गुगलने myactivity.google.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेली तुमच्या इंटरनेट वापराबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ही एकाप्रकारे गुगलने आपण केलेल्या इंटरनेट उद्योगांची नोंदवहीच आहे. पाहूयात काय आहे गुगलचे माय अ‍ॅक्टिव्हिटी पान.

काय आहे अ‍ॅक्टिव्हिटी पान?
माय अ‍ॅक्टिव्हिटी पान म्हणजे गेल्या काही वर्षांपासून तुम्ही गुगलच्या मदतीने कोणकोणत्या इंटरनेटवर अ‍ॅक्टिव्हिटी केल्या याची नोंदवही म्हणता येईल. यामध्ये आपण कोणत्या तारखेला गुगलच्या कोणत्या संकेतस्थळाच्या मदतीने काय केले, याचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे आपण अमूक तारखेला गुगल सर्च वापरून बातम्या किंवा इतर कोणत्या तरी ठिकाणाचा शोध घेतला, किती इमेजेस शोधल्या, मॅपचा वापर करून कोणती व किती ठिकाणे शोधली, अ‍ॅप बाजारात काय केले, शॉपिंग केले का, यू-टय़ुबवर कोणते व्हिडीओ पाहिले आदीचा सविस्तर आणि वेळनिहाय तपशील येतो. म्हणजे आपण ब्राऊझरच्या हिस्ट्रीमधून सर्व तपशील डिलिट केला तरी तो तपशील गुगलच्या या अ‍ॅक्टिव्हिटी शीटवर कायम राहतो. या पानावर तुम्ही गेल्यावर तुम्हाला फेसबुकच्या टाइमलाइनप्रमाणे तुम्ही केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी दिसतील. या पानाच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन आडव्या रेषांमधून तुम्ही मेन्यूमध्ये जाऊन हा तपशील बंडल किंवा प्रत्येक उत्पादनानुसार दिसावा हा पर्याय निवडू शकतात. गुगलचे वेब हिस्ट्री टूल आता माय अ‍ॅक्टिव्हिटी या पानात रूपांतरित होणार आहे. यामुळे यात आता काही फरक उरणार नाही. उलट हिस्ट्री टूलपेक्षा जास्तीचा तपशील आपल्याला या अ‍ॅक्टिव्हिटी पानात उपलब्ध होणार आहे.
गुगल या माहितीचा काय वापर करणार?
गुगल आपल्या माहितीचा वापर प्रामुख्याने दोन प्रकारे करतात. यातील एक प्रकार म्हणजे आपल्या माहितीचा वापर करून आपल्याला अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न होतो. उदाहरणार्थ, आपण जर लोकेशन सेवा सुरू ठेवली असेल, तर आपण असलेल्या ठिकाणापासून आसपास कोणकोणत्या सुविधा आहेत याचा तपशील गुगल काही क्षणात आपल्यासाठी उपलब्ध करून देते. याशिवाय दुसरा वापर होतो तो वैयक्तिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणजे आपण गुगल सर्चमध्ये वारंवार ‘लोकसत्ता’ सर्च करत असू, तर आपण सर्च बॉक्समध्ये ‘लो’ हा शब्द मारताच आपल्याला ‘लोकसत्ता’ असा पर्याय दिसतो. याशिवाय गुगल आपली माहिती काही प्रमाणात व्यावसायिक स्वरूपासाठीही वापरते. त्याचा तपशील आपल्याला प्रायव्हसी पेज या वर उपलब्ध करून दिला आहे.
गुगल आपला सर्व तपशील या पानावर दाखवतात का?
गुगलने आपल्याकडून आपल्या संदर्भात मिळवलेली सर्व माहिती या अ‍ॅक्टिव्हिटी पानावर दाखवत नाही. जर ती माहिती कोणती हे तपासायचे असेल तर तुम्हाला माय अ‍ॅक्टिव्हिटी पानाच्या मेन्यू आयकॉनमध्ये जाऊन ‘अदर गुगल अ‍ॅक्टिव्हिटी’ हा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला आणखी गुगल ट्रॅकर दिसतील. ज्यात गुगलशी जोडलेली तुमची उपकरणे, गुगल प्ले साऊंड सर्च हिस्ट्री, यू-टय़ुब व्हिडीओज आदीचा समावेश आहे.
हा सर्व तपशील डिलिट होतो का?
तुम्ही हा सर्व तपशील डिलिट करू शकता. गुगल तुमचा तपशील तुमचा गुगल अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी वापरतो. यामुळे ही माहिती तुमच्यासमोर खुली करून देण्यात आली असून तुम्ही ती डिलिटही करू शकता. जर तुम्हाला एखादी अ‍ॅक्टिव्हिटी डिलिट करायची असेल तर ती अ‍ॅक्टिव्हिटी निवडून तुम्ही तेथे असलेल्या तीन टिंबांचा पर्याय निवडून डिलिट करू शकता. जर तुम्हाला काही कालावधीसाठीचा तपशील डिलिट करावयाचा असेल तर तुम्ही तीन टिंबाच्या पर्यायात जाऊन तुम्हाला पाहिजे त्या कालावधीतील माहिती सुरू करू शकता. त्यानंतर तुम्ही ती माहिती डिलिट करू शकता. याशिवाय तुम्ही उत्पादनांनुसार म्हणजे यू-टय़ुब, इमेज सर्च अशा पर्यायांनुसारही माहिती डिलिट करू शकता. जर तुम्हाला तुमच्या ‘सर्च टर्म’ डिलिट करावयाच्या असतील, तर अ‍ॅक्टिव्हिटी पानावरील सर्च रकान्यात ‘सर्च टर्म’ असा शोध द्या. यानंतर तीन टिंबांवर क्लिक करून डिलिटचा पर्याय निवडा.
अ‍ॅक्टिव्हिटी पानावर नियंत्रण ठेवता येऊ शकते
आपल्याला नेहमी चांगल्या खासगी सेटिंग्ज देणाऱ्या गुगलने याही पानासाठी तशाच सेटिंग्जचा पर्याय दिला आहे. यात मेन्यू आयकॉन अर्थात उभ्या तीन टिंबांवर क्लिक करा. त्यात अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल्स असा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यावर गुगल तुमच्या कोणत्या हालचाली टिपू शकते याची यादी येते. यात वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, लोकेशन हिस्ट्री, उपकरण माहिती, व्हॉइस अँड ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी, यू-टय़ुब हिस्ट्री आदी पर्याय दिसतात. या पर्यायांच्या पुढे तुम्हाला एक टोगल दिसेल. तुम्हाला ज्या अ‍ॅक्टिव्हिटी गुगलने नोंदवू नये असे वाटते त्याचे टोगल बंद करा. याशिवाय तुम्ही कोणत्या उत्पादनावरील माहितीची नोंद ठेवावी व ठेवू नये यासाठीही तुम्ही ‘मॅनेज अ‍ॅक्टिव्हिटी’ या पर्यायाचा वापर करू शकता.
नीरज पंडित-Niraj.pandit@expressindia.com