12 July 2020

News Flash

प्रादेशिक मनोरंजनाची लाट

भारतात सध्या १७ कोटी ५० लाख घरांमध्ये टीव्ही आहे.

हिमाचल प्रदेशातील सर्वात उत्तरेकडे असलेल्या लाहौल आणि स्पिती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या केलाँग या १० हजार १०० फूट उंचावरच्या थंड ठिकाणचे जीवन अतिशय खडतर आहे. प्रतिकूल हवामानामुळे विखुरलेल्या ठिकाणी केवळ गवत आणि झुडपे उगवण्याची क्षमता असलेल्या अशा आव्हानात्मक प्रदेशात लोकांना मनोरंजनाचे मोजके पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी सॅटेलाइट टीव्ही किंवा डीटीएच सेवा हा त्यातील महत्त्वाचा पर्याय ठरतो. पण यातही या भागात राहणाऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत तयार केलेले अधिकाधिक कार्यक्रम हवे आहेत. वाहिन्यांवरील मनोरंजन कार्यक्रम त्यांच्या भाषेत असावेत आणि या कार्यक्रमांतून त्यांच्या स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटावे, ही त्यांची मागणी.

आता भारतासारख्या उपखंडात, जेथे अनेक भाषा आणि तितक्याच संस्कृती नांदतात, अशा देशात प्रादेशिक कार्यक्रमांचे प्रसारण ही खरंतर आव्हानात्मक गोष्ट आहे. पण प्रादेशिक वाहिन्या किंवा कार्यक्रमांना प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता वाहिन्यांचा ओढाही प्रादेशिक भाषा किंवा संस्कृतींकडे वाढला आहे.

भारतात सध्या १७ कोटी ५० लाख घरांमध्ये टीव्ही आहे. चीननंतर भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टीव्ही बाजारपेठ आहे. त्यातही भारतातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील टीव्ही असलेल्या घरांची संख्या तब्बल १७ टक्क्यांनी अधिक आहे. ग्रामीण भाग हा शहरी भागापेक्षा जास्त असल्याने ही संख्या जास्त असणे स्वाभाविक आहे. मात्र, असे असले तरी, काही वर्षांपूर्वी प्रादेशिक वाहिन्या किंवा कार्यक्रमांना टीव्हीवर लक्षणीय स्थान नव्हते. हे चित्र अलीकडच्या काळात साफ बदलल्याचे दिसून येते. आता प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांचे प्रमाण वाढत असून विनोदी कार्यक्रमांपासून चित्रपटांपर्यंत आणि जीवनशैलीपासून बातम्यांपर्यंत अनेक प्रकारचे कार्यक्रम प्रादेशिक भाषांतून प्रसारित होऊ लागले आहेत.

आतापर्यंत टीव्ही वाहिन्यांचा मुख्य भर महानगरांतील प्रेक्षकसंख्या वाढवण्यावर राहिला आहे. साहजिकच त्यामुळे वाहिन्यांवर पाश्चिमात्य धर्तीवरील कार्यक्रमांना अधिक महत्त्व होते. मात्र, असे कार्यक्रम लहान शहरे किंवा तिसऱ्या वा चौथ्या श्रेणींतील शहरांतील प्रेक्षकांना रुचणारे नाहीत. हा प्रेक्षक प्रादेशिक भाषेला अधिक प्राधान्य देणारा आहे. या प्रेक्षकांच्या गरजा वेगळय़ा आहेत. लहान शहरापर्यंत पोहोचणाऱ्या डीएएस ३ किंवा ४ यांची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रादेशिक कार्यक्रमांची आवश्यकता वाढणार आहे. त्याचबरोबर त्या त्या प्रांतातील भाषेला अधिक महत्त्व येणार आहे. सध्या तामिळ, तेलुगुल, बंगाली, मराठी, गुजराती, पंजाबी या भाषांतील कार्यक्रमांची प्रेक्षकसंख्या अधिक असून ती आणखी वाढत असल्याचे कार्यक्रम निर्मात्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे येणारा काळ हा प्रादेशिक टीव्हीचा असणार हे निश्चित.

भाषा व संस्कृती या व्यतिरिक्त, शहरी प्रेक्षकांच्या तुलनेत, ग्रामीण भागातील बहुतेकशा प्रेक्षकांच्या टीव्ही पाहण्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. उदा. बहुतांश पंजाबी प्रेक्षकांना संगीत असलेले कार्यक्रम आवडतात, तर गुजराती व मराठी प्रेक्षकांना फॅशन, फूड व जीवनशैली अशा विषयांवर भर देणारे कार्यक्रम आवडतात. दक्षिण भारतातील प्रेक्षकांची पसंती टीव्ही शोंना व अशा प्रकारच्या लहान धाटणीच्या कार्यक्रमांना अधिक असते.

पुरेशी सेवा दिली जात नसलेल्या या प्रादेशिक बाजाराला सेवा देण्यासाठी डब करणे व प्रसारित करणे हे नेहमीचे नेटवर्क्‍सचे धोरण आता मागे पडत आहे. अलीकडच्या काही वर्षांत, विविध नेटवर्क्‍सनी खास प्रादेशिक वाहिन्या सुरू केल्या आहेत व प्रामुख्याने प्रादेशिक प्रेक्षकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम तयार करण्याचे प्रमाण वाढवले आहे.

केंद्र सरकारकडून प्रसारणाची परवानगी मिळवलेले अंदाजे ८९२ खासगी सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स सध्या कार्यरत आहेत. परंतु, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या चॅनलमधली स्पर्धा तीव्र झाली असल्याने व बाजारात साचलेपणा आल्याने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

‘फिक्की केपीएमजी मीडिया अँड एंटरटेन्मेंट रिपोर्ट २०१७’ नुसार, २०१६मध्ये प्रादेशिक भाषांतील एकूण प्रेक्षकसंख्येत दक्षिण भारतीय भाषेच्या प्रेक्षकांचे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश होते. प्रादेशिक चॅनल्समध्ये तेलुगु व तामिळ या चॅनल्सनी २०१६ या वर्षांत प्रादेशिक वाहिन्यांच्या प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक, २३ ते २५ टक्के हिस्सा मिळवला, तर कन्नड व मल्याळम वाहिन्यांनी अनुक्रमे १०-१२ व ६-८ टक्के इतका हिस्सा मिळवला. प्रादेशिक प्रेक्षकांना सेवा देण्याचा प्रयत्न म्हणून, भारतातील डीटीएचमधील एक आघाडीची कंपनी नऊ  पंजाबी, दहा  गुजराती, १६ मराठी, ५९ तामिळ, ४७ कन्नड, २७ तेलुगु, ३३ मल्याळम, २१ बंगाली व १३ ओडिया चॅनल्स देते.

प्रादेशिक भाषांमध्ये आणखी कार्यक्रम मिळावेत, अशी मागणी आधीपासूनच होत असून केलाँगसारख्या उंचावरच्या, दूरवरच्या व आव्हानात्मक प्रदेशातूनही ही मागणी केली जात आहे. म्हणूनच, ग्रामीण भागातील व लहान शहरांतील लोकांचे उत्पन्न जसे वाढते आहे तसे ते अधिक चोखंदळ बनत आहेत व प्रादेशिक भाषांतील कार्यक्रमांची मागणी करत आहेत. त्यांची वाढती क्रयशक्ती विचारात घेता, इतक्या मोठय़ा बाजारपेठेकडे दुर्लक्ष करणे कार्यक्रम पुरवणाऱ्यांना परवडणार नाही. म्हणूनच येत्या काही वर्षांत प्रादेशिकतेवर भर देणाऱ्या  कार्यक्रमांकडे हळूहळू कल वाढणार आहे.

केंद्र सरकारकडून प्रसारणाची परवानगी मिळवलेले अंदाजे ८९२ खासगी सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स सध्या कार्यरत आहेत. परंतु, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या चॅनलमधली स्पर्धा तीव्र झाली असल्याने व बाजारात साचलेपणा आल्याने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

गौतम शिकनीस, डिजिटल स्टॅटर्जिस्ट, टाटास्काय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 12:41 am

Web Title: regional entertainment wave
Next Stories
1 टेक-नॉलेज : मोबाइलवर ट्रेन ड्रायव्हिंगचा गेम हवा आहे
2 ‘डबललॉकर’चे संकट
3 ‘आयओटी’चा प्रभाव
Just Now!
X