News Flash

स्मार्टफोनचा ‘लूक’ बदला!

आपला फोन जलदगतीने काम करावा, त्यात नवनवीन बदल घडावेत, असे आपल्याला अनेकदा वाटत असते.

स्मार्टफोनचं तंत्रज्ञान इतक्या झटपट बदलत आहे की, नवीन फोन घेण्याची आपली इच्छा दर सहा महिन्यांनी उफाळून येते. पण तंत्रज्ञान कितीही वेगाने बदलत असलं तरी प्रत्यक्ष स्मार्टफोनमध्ये फार बदल होतात का, हा कळीचा मुद्दा आहे. विशेषत: नवीन स्मार्टफोनमधील वैशिष्टय़े वरवरची असतील तर? अशा वेळी नवीन फोन घेण्यापेक्षा आपल्या फोनचा ‘इंटरफेस’ बदलून आपण फोनची नवलाई वाढवू शकतो. हेच काम ‘लाँचर’ करतात.

आपला फोन जलदगतीने काम करावा, त्यात नवनवीन बदल घडावेत, असे आपल्याला अनेकदा वाटत असते. हे बदलायचे असेल तर ‘अँड्रॉइड लाँचर’सारखा साधा सरळ पर्याय नाही. या अँड्रॉइड लाँचरमुळे तुमच्या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्सचे, इतर सुविधांचे आणि कॉलिंग ऑप्शन्सचे व्यवस्थित नियोजन करता येते. सध्या अँड्रॉइड लाँचरशी संबंधित अनेक अ‍ॅप्स गुगल प्लेवर पाहायला मिळतात. या अ‍ॅप्सच्या साह्य़ाने तुम्ही तुमचा सध्याचा स्मार्टफोन अधिक कार्यक्षम बनवू शकता. शिवाय स्क्रीनची रंगसंगती, फाँट, फोल्डर्सचे आयकॉन अशा गाष्टी बदलून फोन अधिक आकर्षक दिसण्यासाठीही हे लाँचर्स उपयुक्त ठरतात. अशाच काही लाँचर्सची माहिती.

अपेक्स लाँचर

अपेक्स लाँचर हे सर्वात जुने लाँचर असून स्मार्टफोन वापरणाऱ्यांकडून याचा जास्त वापर केला जातो. हे लाँचर थोडेफार लॉलीपॉप अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसारखे काम करते. या अ‍ॅपमध्ये तुम्ही एकाच वेळेला अनेक अ‍ॅप्सचे आयकॉन नियोजित करू शकता. या अ‍ॅपमध्ये अनेक थीम्स उपलब्ध असून हे अ‍ॅप कोणत्याही स्मार्टफोनमध्ये व्यवस्थित काम करू शकते.

अ‍ॅक्शन लाँचर ३

अ‍ॅक्शन लाँचर ३ हे आतापर्यंतचे सर्वात उत्तम लाँचर आहे. यामध्ये क्विकथीम, शटर्स आणि कव्हर्स असे फीचर आहेत. ‘क्विक थीम’ या फीचरमध्ये तुमच्या स्मार्टफोनच्या वॉलपेपरमधील एखादा रंग उचलून ‘सर्च बार’ त्याच्याशी एकरूप करता येतो. ‘कव्हर’ नावाचे फीचर तुम्हाला एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये जाण्याचे काम सोपे आणि जलद करते. तसेच ‘शटर्स’ हे फीचर तुम्हाला एका अ‍ॅपचा उपयोग झाल्यावर लगेच दुसरे अ‍ॅप वापरण्याची प्रक्रिया सुलभ करते.

होला लाँचर

होला लाँचर हे स्मार्टफोनसाठीच्या उपयोगी वैशिष्टय़ांनी युक्त असे आहे. हे लाँचर तुमचे सर्वात जास्त वापरलेले अ‍ॅप्स स्क्रीनवर नियोजित करण्यास तसेच ते स्क्रीनवर दाखवण्यास मदत करते. या लाँचरमुळे स्मार्टफोन जलदगतीने काम करतो. तुम्ही तुमचे अ‍ॅप अगदी चटकन दाखवू अथवा लपवू शकता. या अ‍ॅपमध्ये किती तरी थीम्स, आयकॉन्स, स्मार्टफोल्डर्स आणि हवामानाचे अंतर्गत अ‍ॅप समाविष्ट आहे.

एरो लाँचर

मायक्रोसॉफ्टचे एरो लाँचर हे त्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे तिसऱ्या स्थानावर आहे. हे लाँचर विण्डोज्सारखे दिसते. शॉर्टकट कीज्बरोबरच तुमचे काहीच वेळापूर्वी डायल केलेले क्रमांक, जास्तवेळा वापरलेले अ‍ॅप्स, रिमायण्डर्स, तुमची कागदपत्रे तुमच्या स्क्रीनवर दिसतात. ज्या लोकांना विण्डोज् वापराची जास्त सवय आहे ते या लाँचरला प्राधान्य देतील हे नक्की.

लाँचर ८

लाँचर ८ हे या यादीतील सर्वात वेगळे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा अँड्रॉइडशी काही संबध नाही. या लाँचरचा मुख्य उद्देश तुमच्या फोनच्या अँड्रॉइडचा लुक विण्डोज्सारखा बनवण्याचा आहे. या अ‍ॅपमुळे तुम्ही तुमच्या विजेट्सला विण्डोज् प्रकारात बदलू शकता. यामुळे तुमचा फोन विण्डोज्सारखा दिसेल पण तो असेल अँड्रॉइड. यामध्ये तुमच्या स्मार्टफोनचे काम सोपे करण्याच्या अनेक सुविधा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:50 am

Web Title: smartphone look change
Next Stories
1 अ‍ॅपची शाळा : शब्दसंपदा वाढवा!
2 रोखरहित व्यवहार
3 स्मरणशक्ती वाढवा
Just Now!
X