News Flash

ऑनलाइन सुरक्षिततेसाठी..

इंटरनेट आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.

ऑनलाइन सुरक्षिततेसाठी..

इंटरनेट आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. बहुतांश जणांच्या हातात स्मार्टफोन खेळू लागल्याने त्याद्वारे ते २४ तास इंटरनेटशी जोडलेले असतात. याशिवाय सोशल मीडिया, विविध संकेतस्थळे, कम्युनिकेशन अ‍ॅप्स या माध्यमांतून स्मार्टफोनचा वापर न करणाऱ्यांचाही इंटरनेटवर राबता असतोच. त्यातच अलीकडे ‘डिजिटल वॉलेट’, ‘इंटरनेट बँकिंग’ यांचा वापर करण्याकडे ओढा वाढू लागल्याने वापरकर्त्यांची ‘ऑनलाइन सुरक्षा’ कळीचा मुद्दा ठरत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. स्मार्टफोन हे त्यातील महत्त्वाचे कारण असले तरी, संगणकाची आणि इंटरनेट सेवेची सहज उपलब्धता हेदेखील तितकेच महत्त्वाचे कारण आहे. मुंबईसारख्या मोठय़ा शहरांत तर मोफत वायफाय सुविधेमुळे इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत ‘ऑनलाइन सुरक्षा’ अतिशय महत्त्वाची ठरते. विशेषत: इंटरनेटवर सक्रिय असताना वापरकर्त्यांची माहिती चोरली जाण्याची किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्याची फसवणूक होण्याची शक्यता दाट असते. अनेकदा फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून तुमची माहिती विविध जाहिरात कंपन्या किंवा उत्पादन कंपन्यांकडे जमा होते. या माहितीचा गैरवापर होण्याची भीती नाकारता येत नाही. अशा अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. त्यामुळे इंटरनेटवर आपली कोणती व किती माहिती सार्वजनिक होत आहे, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सुदैवाने, तुम्ही २४ तास ‘ऑनलाइन’ राहूनदेखील स्वत:ची खासगी माहिती आणि डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी काही साध्या, सोप्या परंतु परिणामकारक गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

पासवर्ड संरक्षण

‘पासवर्ड’ ही तुमच्या सर्वच इंटरनेट खात्यांची चावी आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील खाते असो की ई-मेलचे असो की नेटबँकिंगचे, प्रत्येक ठिकाणचा पासवर्ड हा इतरांच्या हाती पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सहजासहजी ओळखता येणार नाही, असा पासवर्ड ठेवला पाहिजे. अनेक जण आपल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट खात्यांना एकच पासवर्ड वापरतात. पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे जावे यासाठी हा प्रयत्न असतो. परंतु तो पासवर्ड इतरांना माहीत पडला तर तुमच्या अन्य खात्यांवरील माहितीही चोरली जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो पासवर्ड स्वतंत्र ठेवावेत. अनेक पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण जात असल्यास तुम्ही ‘पासवर्ड मॅनेजर’ अ‍ॅपचा वापर करू शकता. अशा अ‍ॅपमध्ये विविध पासवर्ड अतिशय गोपनीय पद्धतीने सुरक्षित साठवून ठेवले जातात.

द्विस्तरीय पडताळणी

शक्य असेल त्या वेळी तुमच्या विविध खात्यांच्या द्विस्तरीय पडताळणी अर्थात ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ पद्धतीचा फायदा घ्या. अशा व्यवस्थेमुळे अन्य व्यक्तींना तुमच्या खात्यांमध्ये घुसखोरी करता येत नाही. ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’चा सर्वात साधा मार्ग म्हणजे, इंटरनेट खात्याच्या पासवर्डखेरीज एक ‘व्हेरिफिकेशन कोड’ तुमच्या मोबाइलवर पाठवण्यात येतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी नवनवीन क्रमांक मिळतो व तुमच्या स्मार्टफोनवर येणारा क्रमांक कोणालाही समजू शकत नाही.

‘अनानिमोस ब्राऊजिंग’

अनेकदा तुमचे ‘जीमेल’ खाते सुरू असताना, ‘गुगल सर्च’ वा अन्य कोणत्याही संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या ईमेलसोबत तुमची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी जमा होते. विशेषत: ‘गुगल सर्च’ अशी माहिती साठवून घेत असते. वापरकर्त्यांच्या आधीच्या ‘सर्च’नुसार त्याने मागितलेल्या माहिती पृथक्करण करून ती समोर आणणे, असा ‘गुगल सर्च’चा हेतू असतो. परंतु यामुळे वापरकर्त्यांची माहिती अन्य संकेतस्थळांनाही मिळते. त्यामुळे शक्यतो, ‘अनानिमोस’ अर्थात अज्ञात राहून इंटरनेट ब्राऊजिंग करा.

‘क्लीन अप’ करा

इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांना आपण भेट देतो, तेव्हा त्या संकेतस्थळांवर आपली माहिती जात असतेच; परंतु त्या संकेतस्थळावरील काही फाइल्स आपल्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर जमा होत असतात. यातील काही ‘कूकीज’ तुमच्या माहितीचा माग काढणाऱ्या हेरासारखे काम करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी इंटरनेट वापरानंतर किंवा किमान नवीन संकेतस्थळ हाताळल्यानंतर संगणक/ स्मार्टफोनवरील ‘कूकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाइल्स’ हटवून टाका. ‘सीसीक्लीनर’सारखे प्रोग्रॅम किंवा अ‍ॅप याकामी उपयुक्त ठरू शकतात.

‘अदृश्य’ राहा!

तुम्ही इंटरनेटवर ब्राऊजिंग करताना तुमची ओळख सार्वजनिक होऊ नये, यासाठी विविध ब्राऊजर्सवर सुविधा असते. गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’, फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड’ किंवा मायक्रोसॉफ्टच्या ब्राऊजरवर ‘इनप्रायव्हेट’ या नावांनी ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधा तुमच्या संगणकात शिरकाव करू पाहणाऱ्या ‘हेर’ कूकीजना रोखते. तसेच हे ब्राऊजर्स त्रयस्थ संकेतस्थळांकडून येणाऱ्या ‘कूकीज’नाही ‘ब्लॉक’ करतात.

दुसरीकडे या ब्राऊजर्सच्या माध्यमातून अनेक ‘अ‍ॅडऑन’ किंवा ‘एक्स्टेन्शन’ आपण वापरत असतो. असे ‘अ‍ॅडऑन्स’ प्रामुख्याने ‘जावा’, ‘फ्लॅश’ किंवा ‘सिल्वरलाइट’ यांच्या माध्यमातून कार्यरत असतात. परंतु अशा प्रोग्रॅमच्या माध्यमातून तुमच्या नकळत तुमची माहिती हाताळली जाते. त्यामुळे शक्यतो अशा ‘अ‍ॅडऑन’चा वापर टाळावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 4:33 am

Web Title: steps to protect online security
Next Stories
1 एक‘हाती’ फोन
2 टेक-नॉलेज : व्हीओएलटीई म्हणजे काय?
3 ‘शब्द’खेळ
Just Now!
X