12 July 2020

News Flash

डिजिटल सोन्याची खाण

या यंत्रणेच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्या

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर मानवाने त्या त्या काळाशी सुसंगत अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला. काहीवेळा हे शोध मुद्दाम लावले गेले तर अनेकदा चुकून. मानवी इतिहासातील सर्वात मोठे आणि त्याचं जीवन बदलवून टाकणारे शोध कुठले, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणे खरोखरच कठीण असेल. प्रागैतिहासिक मानवाला जेव्हा शेतीचा शोध लागला त्यानंतर तो स्थिर झाला. शिकार करून जनावरांसारखे जगणे मागे पडत गेले आणि सिव्हिलायझेशनला सुरुवात झाली. जसा प्रागैतिहासिक मानवासाठी शेतीचा शोध अद्भुत तसाच आगीचा, चाकाचा, ऊर्जेचा, विजेचा आणि इतर अनेक तत्सम जिनसा आणि संकल्पनांचा. मानवाची उत्क्रांती आणि तंत्रज्ञानाची क्रांती या एकमेकांना पूरक अशाच झालेल्या आहेत. काही शोध हे काळाच्या फार पुढे नेणारे असतात. डिजिटायझेशन हा त्यातलाच एक प्रकार. आणि त्याचे ताजे पिल्लू म्हणजे बिटकॉईन. अर्थात बिटकॉईन हे काही फार ताजे उदाहरण नाही. पण या महिन्याच्या सुरुवातीला त्याचा इतका बोलबाला झाला की बिटकॉईन हेच जगातील अंतिम सत्य असल्यासारखा सारा माहौल झाला होता. त्याच्या आर्थिक गणितांकडे काणाडोळा केला तर या संपूर्ण यंत्रणेमागचे तंत्रज्ञान खरोखरच अफाट आहे. त्या तंत्रज्ञानामुळेच देशोदेशीच्या वित्तीय संस्थांनी बिटकॉईनला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या यंत्रणेच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्याआधी हा सगळा प्रकार काय आहे ते थोडक्यात बघू या. मुळात बिटकॉईनबद्दल ठोस अशी पूर्ण माहिती कुणाकडेच नाही. त्याचा निर्माता ही एक व्यक्ती आहे की एक संघटना तेही ठाऊक नाही. सातोशी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने एक अल्गोरिदम तयार केला असं म्हणतात. या अल्गोरिदमच्या आधारावर ही आभासी चलनाची (व्हच्र्युअल क्रीप्टोकरन्सी) टांकसाळ कार्यरत आहे. ज्या प्रमाणे सोने, पेट्रोल किंवा इतर मौल्यवान खनिजे मर्यादित संख्येतच तयार होतात, त्याप्रमाणे बिटकॉईनची सुद्धा मर्यादा ठरवलेली आहे. या अल्गोरिदमनुसार २ अब्ज १० कोटी इतके बिटकॉईन्सच व्यवहारात येऊ  शकतील. त्यापुढे जर का ती तयार करायची असतील तर अल्गोरिदमच्या भागांना डिकोड करावे लागेल. म्हणजेच त्या अल्गोरिदमच्या भागांची उत्तरे शोधावी लागतील. पूर्वी जसे लोक सोन्याच्या खाणी शोधत तसेच या अल्गोरिदमची उत्तरे शोधणाऱ्या लोकांना माइनर्स म्हणतात. बरं हा अल्गोरिदम म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचे आणि भयंकर किचकट असे एक प्रकारचे गणितच असते. नवीन बिटकॉईन्स तयार करणे म्हणजे ही उत्तरे शोधणे. जेव्हा एखाद्या माइनरला नवीन उत्तर सापडते तेव्हा त्याच्या खात्यामध्ये काही बिटकॉईन्स जमा होतात. त्यासाठी मुळात खाते असावे लागते. सारे व्यवहार या खात्यामधून. हे खाते तयार करण्यासाठी एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचे आणि त्यासोबतच ब्लॉकचेनही. ही ब्लॉकचेन म्हणजे खातेवही किंवा पासबुक. या ब्लॉकचेनची साइज ही साधारण ६-७ जीबी इतकी असते. डाऊनलोड-इन्स्टॉलेशन झाल्यावर माइनरला एक खातेक्रमांक मिळतो.

ही ब्लॉकचेन म्हणजे एक प्रकारचे सार्वजनिक पासबुक. जगभरात कुठेही होणारा बिटकॉईनचा व्यवहार हा त्या खातेवहीत नोंदवला जातो. प्रत्येक माइनर म्हणजे खातेधारक. नवीन तयार झालेल्या बिटकॉईन्सला या माइनर्सच्या कम्युनिटीची मान्यता लागते. ती मिळाली की बिटकॉइन्स त्या माइनरच्या खात्यात जमा होतात. पण हे नवीन बिटकॉईन मिळवणे काही सोपे नाही. याचे कारण अल्गोरिदमचे भाग सोडवणे खूप कठीण आहे. त्याचे सोपे भाग आधीच सोडवून झालेले असल्यामुळे आता पेपरमधले कठीण प्रश्न माइनर्सचा पिच्छा पुरवत आहेत. मुळात ज्याने कुणी हा अल्गोरिदम तयार केला त्याने तो तशाच प्रकारे बनवला जेणे करून नवीन बिटकॉईन तयार होण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाईल. असे म्हणतात की २ अब्ज १० कोटींचा पल्ला गाठण्यासाठी २१५० साल उजाडेल.

एव्हाना एक कळले असेल की हा सारा मामला कम्प्युटिंगशी संबंधित आहे. मोठय़ा प्रमाणावर डेटा एन्कोड आणि डिकोड करण्याचा हा प्रकार आहे. आणि त्यामुळेच हे करण्यासाठी माइनर्सना बरीच डोकेफोड करावी लागते. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे कम्प्युटिंगची प्रचंड क्षमता असणारे कम्प्युटर्सही लागतात. त्यामुळे हे काम जबरदस्त खर्चिक आहे. म्हणूनच डेटा सायंटिस्ट्सना सध्या प्रचंड मागणी आहे. काही कंपन्यांनी तर डेटा सायंटिस्ट्सना हाताशी धरून त्यांना डिजिटल-खाण कामगार बनवण्याचा सपाटा लावलाय. या कम्प्युटिंगसाठी माइनर्स वापरत असलेल्या कम्प्युटर सव्‍‌र्हरमधून प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेकांनी आइसलँड, अंटाक्र्टिका, सायबेरियासारख्या प्रचंड थंड हवेच्या ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे.

बिटकॉईनचे होणारे हे सगळे व्यवहार एकेका ब्लॉकमध्ये सेव्ह होत असतात. आणि या व्यवहारांचीच एक श्रुंखला तयार होत असते जिला ब्लॉकचेन असे म्हणतात. हा सगळा डेटाबेस आणि हे रेकॉर्ड्स कधीही डिलिट केले जाऊ  शकत नाहीत किंवा त्यामध्ये बदल करता येत नाहीत असे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीच्या या ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळेच बिटकॉईनचे वेगळेपण अबाधित आहे. हेच तंत्रज्ञान इतर क्षेत्रांमध्ये वापरण्यासाठी जगाभरातील वित्तीय संस्था चाचपण्या करत आहेत. हिरे क्षेत्रामध्ये या ब्लॉकचेनचा वापर सुरू झालेला आहे. आरोग्य आणि सप्लाय चेनमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होईल असे सुतोवाच केले जाऊ  लागले आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होतील अशी आशा आहे.

– पुष्कर सामंत

pushkar.samant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2017 1:36 am

Web Title: what is bitcoin and how does it work
Next Stories
1 ‘जी-मेल’ हॅक झालेय?
2 लिहिते व्हा!
3 मजकुराच्या फोटोतून मजकूर
Just Now!
X