• मला पोर्टेबल चार्जर घ्यायचा आहे. यापूर्वी मी तीन वेळा घेतला मात्र प्रत्येक वेळी दोन महिन्यांच्या आता खराब झाला. नेमका हा चार्जर घेताना काय काळजी घ्यावी हे सांगा.

– मंगेश असोले, संगमनेर.

  • पॉवर बँक घेताना सर्वात महत्त्वाचा भाग तपासणे गरजेचे असते तो म्होणजे त्यानची क्षमता. या चार्जरची क्षमता ही मिली अ‍ॅम्पिअर अवर्स म्हणजेच ‘एमएएच’मध्ये मापली जाते. पॉवर बँक एकदा चार्ज केल्यावर नेमका त्याचा वापर किती वेळा चार्जिगसाठी होऊ  शकतो हे सांगणे तसे कठीण आहे. कारण चार्जिग होत असतानाही आपला फोनचा वापर सुरूच असतो. पण हे घेत असताना जास्त क्षमतेची पॉवर बँक घेणे केव्हाही योग्य ठरते. म्हणजे तुम्हाला किमान १५०० एमएएचची पॉवर बँक ही घ्यावीच लागणार. १५०० एमएएचची पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यावर मोबाइल एकदा पूर्ण चार्ज करू शकते. ५२०० एमएएचची पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यावर मोबाइल दोनदा पूर्ण चार्ज किंवा टॅबलेट ५० टक्के चार्ज करू शकते. १०००० एमएएचची पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यावर मोबाइल चारवेळा पूर्ण चार्ज किंवा टॅबलेट १०० टक्के चार्ज करू शकते. बाजारात याहीपेक्षा जास्त क्षमतेचे पोर्टेबल चार्जर उपलब्ध आहेत.

काही पॉवर बँक्समध्ये यूएसबी चार्जिगची कॉड ही चार्जललाच जोडलेली असते. पण काही पॉवर बँकमध्ये  ही कॉड वेगळी दिलेली असते. यामुळे अनेकदा जर आपण कॉड घ्यायला विसरलो तर नक्कीच चार्जिगची अडचण निर्माण होऊ  शकते. यामुळे शक्यतो इनबिल्ड यूएसबी चार्जिग कॉड असलेले चार्जर घेणे उपयुक्त ठरते. काही ब्रॅण्डेड चार्जरमध्ये एक कनेक्टेड कॉड असते. त्या कॉडला विविध प्रकारचे चार्जिग कनेक्टर दिलेले असतात. याचबरोबर पोर्टेबल चार्जर खरेदी करत असताना त्याच्या दर्जाचा नेहमीच विचार करा. एखाद वेळेस किंमत थोडी जास्त मोजावी लागली तरी चालेल, पण दर्जा मात्र नक्कीच चांगला असायला हवा. काही कमी दर्जाच्या पोर्टेबल चार्जरमुळे फोन खूप जास्त गरम होणे, शॉर्टसर्ट होणे असे प्रकार झालेले आहेत. यामुळे शक्य तो चांगल्या कंपनीचेच चार्जर घेणे योग्य ठरेल. तुम्ही जास्त क्षमतेचे चार्जर कमी पैशांत घेतले तर अनेकदा ते तुमचा फोन नीट चार्ज करत नाही. यामुळे ते एक प्रकारे आपले नुकसानच होते. यामुळे या चार्जरची खरेदी करताना पैशांचा विचार न करता दर्जाचा विचार करणे केव्हाही फायद्याचे ठरेल.

  • माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस3 हा फोन आहे. त्याच्या कॉल लॉगच्या आयकॉनवर सारखे आठ मिसकॉल आहेत असे दाखविले जाते. पण प्रत्यक्षात हे सर्व मिस्ड कॉल मी पाहिलेले आहेत. तरीही हा आकडा जात नाही. तसेच मी सर्व कॉल लॉगही डीलीट केला पण तरीही काही झाले नाही काय करता येईल.

          – देवेश म्हात्रे, डोंबिवली

  • ही अडचण अनेक अ‍ॅण्ड्रॉइड फोन्सना येते. अनेकदा कॉल लॉगमधील मिस्ड कॉलची यादी डीलीट केल्यानंतर तो आकडा जातो. मात्र तरीही तो आकडा गेला नाही तर तुम्ही सेटिंगमध्ये जा. तेथे अ‍ॅप्लिकेशन मॅनेजरमध्ये जा. तेथे ऑल अ‍ॅप्स हा पर्याय निवडा. यात बॅज प्रोव्हायडर हे अ‍ॅप निवडा. त्याचा सर्व डेटा क्लिअर करा. यानंतर तुम्ही म्हणत असलेला कॉल लॉगवरील आकडा निघून जाईल.